शीतयुद्धकालिन मानसिकतेचा आरोप करून चीनने ऑस्ट्रेलियाबरोबरील आर्थिक करार रोखला

आर्थिक करारबीजिंग/कॅनबेरा – चीनने ऑस्टे्रलियाबरोबरील महत्त्वपूर्ण आर्थिक कराराच्या चर्चेला अनिश्‍चित काळासाठी स्थगिती देत असल्याचे जाहीर केले आहे. ऑस्ट्रेलिया शीतयुद्धकालिन मानसिकता बाळगणारा देश असून चीनला भेदभावाची वागणूक देत आहे, असा आरोप चीनने केला आहे. चीनचा हा निर्णय दुर्दैवी असल्याचे ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाने चीनच्या महत्त्वाकांक्षी ‘बेल्ट ऍण्ड रोड’ योजनेला जबरदस्त दणका दिला होता. चीनचा हा निर्णय त्याला प्रत्युत्तर देणारा असल्याचे सांगण्यात येते.

चीन हा ऑस्ट्रेलियाचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश म्हणून ओळखण्यात येतो. २०१९ साली ऑस्ट्रेलियाच्या एकूण व्यापारात चीनचा वाटा तब्बल २९ टक्के इतका होता. यामागे दोन देशांमध्ये २०१५ साली झालेला व्यापारी करार व चीनकडून सुरू असलेले प्रयत्न कारणीभूत ठरले होते. मात्र गेल्या दोन वर्षात ऑस्ट्रेलिया व चीनमधील संबंध वेगाने चिघळण्यास सुरुवात झाली असून चीनचा नवा निर्णय त्याचाच भाग आहे.

चीनकडून ऑस्ट्रेलियाच्या विविध क्षेत्रांमध्ये प्रभाव वाढविण्यात आला असून त्या जोरावर हस्तक्षेपही सुरू झाला आहे. हा हस्तक्षेप रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन व सरकारने आक्रमक निर्णय घेण्याचा सपाटा लावला होता. ऑस्ट्रेलियाच्या संसदेत चीनविरोधात अनेक विधेयके मंजूर करण्यात आली असून त्यात चीनकडून असलेल्या धोक्यांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. मॉरिसन सरकारकडून सुरू असणार्‍या या कारवाईमुळे चीन प्रचंड अस्वस्थ झाला असून आपल्या आर्थिक व व्यापारी ताकदीचा वापर करून ऑस्ट्रेलियावर दडपण टाकण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

चीन-ऑस्ट्रेलिया इकॉनॉमिक डायलॉग अनिश्‍चित काळासाठी स्थगित करून ऑस्ट्रेलियाची कोंडी करण्यासाठी पावले उचलत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी चीनने ऑस्ट्रेलियातून आयात होणार्‍या अनेक उत्पादनांवर वाढीव कर लादले असून काहींवर अघोषित बंदीही घातली आहे. चीनने ऑस्ट्रेलियन मंत्र्यांबरोबरील संवादही बंद केला आहे. नवा निर्णय जाहीर करताना चीनने ऑस्ट्रेलियाच्या प्रशासनावर शीतयुद्धकालिन मानसिकतेचा आरोप करून, दोन देशांमध्ये सध्या शीतयुद्धच सुरू असल्याचे संकेत दिले आहेत.

चीनच्या निर्णयानंतर ऑस्ट्रेलियन डॉलरच्या मूल्यात ०.६ टक्क्यांची घसरण झाल्याचे समोर आले आहे.

leave a reply