चीनकडे भारतावर सायबर हल्ले चढविण्याची क्षमता आहे

- संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत

नवी दिल्ली – ‘भारतावर सायबर हल्ले चढविण्याची क्षमता चीनकडे आहे. या आघाडीवर दोन्ही देशांच्या क्षमतेमध्ये खूप मोठी तफावत आहे’, असे संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी म्हटले आहे. मात्र भारत आपल्या सायबर सुरक्षेसाठी क्षमता विकसित करीत आहे. चीनच्या सायबर हल्ल्यांना प्रभाव कमी कमी रहावा, यासाठी वेगाने प्रयत्न केले आहेत, अशी ग्वाही देखील यावेळी संरक्षणदलप्रमुखांनी दिली आहे.

नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका परिसंवादात जनरल रावत बोलत होते. लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करून इथली सैन्यमाघारीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लवकरच भारत व चीनमध्ये चर्चा सुरू होणार आहे. मात्र चीनने अजूनही लडाखच्या एलएसीवरील काही भागातून लष्कर मागे घेण्याची तयारी दाखविलेली नाही. अशा परिस्थितीत जनरल रावत यांनी चीनच्या संभाव्य सायबर हल्ल्याबाबत केलेली विधाने लक्ष वेधून घेत आहेत. गेल्या वर्षी मुंबईत काही काळासाठी खंडीत झालेल्या वीजपुरवठ्यामागे चीनचा सायबर हल्ला होता, असे दावे प्रसिद्ध झाले होते. तसेच भारतात कोरोनाच्या लसी तयार करणार्‍या कंपन्या देखील चीनच्या सायबर हल्ल्यांचे लक्ष्य ठरल्या होत्या.

हे दोन्ही आरोप चीनने नाकारले होते. पण सायबर सुरक्षेशी निगडीत असलेल्या दुसर्‍या देशातील कंपन्यांनी भारतातील या सायबर हल्ल्यमागे चीनचे हॅकर्स असल्याचा आरोप केला होता. याआधी अमेरिका व युरोपिय देशांनी देखील आपल्यावर चीनमधून सायबर हल्ले होत असल्याचा ठपका ठेवला होता. चीनने आपली सायबर आर्मी तयार ठेवली असून याचा वापर करण्यासाठी चीन नेहमीच सज्ज असल्याची बाब वेळोवेळी उघड झाली होती. त्या पार्श्‍वभूमीवर, संरक्षणदलप्रमुख जनरल रावत यांनी चीनच्या सायबर हल्ले चढविण्याच्या क्षमतेची माहिती देऊन देशाला सावध केल्याचे दिसत आहे.

भारत आणि चीनच्या सायबर क्षेत्रातील क्षमतेमध्ये मोठी तफावत आहे. ही तफावत दूर करण्यासाठी भारताकडून प्रयत्न केले जात आहेत. चीनचा सायबर हल्ला रोखण्यासाठी आवश्यक ती सुरक्षाविषयक खबरदारीही घेतली जात आहे. मात्र ही सुरक्षा भेदून भारताच्या सायबर क्षेत्रात शिरकाव करण्याची क्षमता चीनकडे आहे. त्यामुळे चीनच्या सायबर हल्ल्याचा प्रभाव कमीत कमी काळ रहावा व यामुळे हानी होऊ नये, यासाठी भारत क्षमता विकसित करीत आहे, अशी माहिती जनरल रावत यांनी दिली. तसेच या आघाडीवर इतर देशांचे सहकार्यही भारताकडून घेतले जात आहे, असे जनरल रावत यांनी स्पष्ट केले. देशाच्या सायबर क्षेत्राला चीनपासून असलेल्या धोक्याचा पूर्वविचार करून भारताने इतर प्रगत देशांशी सायबर सुरक्षेशी निगडीत सहकार्य करार केले आहेत. त्याचा दाखला जनरल रावत यांच्याकडून दिला जात असल्याचे दिसते.

दरम्यान, भारत व चीन यांच्या क्षमतेत तफावत असली तरी भारत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही तफावत कमी करीत आहे. यासाठी तिन्ही संरक्षणदलांच्या संयुक्त क्षमतेचा वापर केला जात आहे, अशी माहिती जनरल रावत यांनी दिली. संरक्षणदलप्रमुखपदाची निर्मिती हा देशाच्या संरक्षणाच्या आघाडीवरील अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरतो, असा दावाही यावेळी जनरल रावत यांनी केला.

leave a reply