संपूर्ण ‘माउंट एव्हरेस्ट’वर चीनचा दावा; नेपाळमधून विरोध

नवी दिल्ली – जगातील सर्वोच्च शिखर असलेला ‘माउंट एव्हरेस्ट’च्या संपूर्ण क्षेत्रावर चीनने दावा सांगितला आहे. चीनची सरकारी वाहिनी असलेल्या ‘चाइना ग्लोबल टेलीविजन नेटवर्क’ने (सीजीटीएन) शनिवारी ‘माउंट एव्हरेस्ट’चे काही फोटो प्रसिद्ध केले व त्याखाली चीनच्या तिबेट या स्वायत्त प्रातांत वसलेले जगातील सर्वोच्च शिखर अशी फोटो कॅप्शन दिले आहे. तिबेट आणि ‘माउंट एव्हरेस्ट’वरील आपला दावा मजबूत करण्याचा चीनचा प्रयत्न म्हणून याकडे पहिले जाते. नेपाळमधून आता या विरोधात आवाज उठू लागले आहेत.

काही दिवसांपूर्वीच चीनने नेपाळला न कळवताच ‘एव्हरेस्ट’ ‘ची उंची मोजण्याची मोहीम हाती घेतली होती. तसेच नुकतेच चीनच्या हूवेई कंपनीने एव्हरेस्टवर तीन ठिकाणी ५जी मोबाईल टॉवर बसवले आहेत. येथील दुर्गम वातावरणीय परिस्थितीत हायस्पीड नेटवर्क पुरवणे इतकाच यामागील उद्देश नसल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. याचे लष्करी महत्वही असून या तंत्रज्ञानाचा फायदा चीन उठवू शकतो, असा दावा चीनविषयक तज्ज्ञ करीत आहेत.

शनिवारी ‘माउंट एव्हरेस्ट’च्या छायाचित्राखाली चीनच्या सरकारी वाहिनीने केलेला उल्लेख चीनच्या ‘माउंट एव्हरेस्ट’ शिखरावर आपला दावा मजबूत करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पहिले जात आहे. सोशल मीडियावरील ही पोस्ट ‘सीजीटीएन’ने नंतर काढून टाकली असली तरी चीनच्या सरकारच्या आदेशाशिवाय चिनी सरकारी वाहिनीने ही पोस्ट लिहली नसल्याचे स्पष्ट होते. आपल्या सीमा रुंदावण्यासाठी चीनच्या ‘सलामी स्लायसिंग’ धोरणाचा हा भाग ठरतो, असाही विश्लेषकांचा दावा आहे.

या पर्वताची उंची मोजण्यासाठी नेपाळला न कळवताच चीनने हाती घेतलेली मोहीम, एव्हरेस्टवर बसविलेले ५जी टॉवर आणि आता एव्हरेस्टवरील अप्रत्यक्ष दावा या गोष्टी पुढील काळात चीन आणि नेपाळ संबंधात दुरावा वाढवू शकतात असेही विश्लेषकांचे म्हणणे आहे. माउंट एव्हरेस्ट’ हा नेपाळ आणि तिबेटमध्ये विभागलेला आहे. मात्र बहुतांश पर्यटक ‘माउंट एव्हरेस्ट’ पाहण्यासाठी नेपाळलाच भेट देतात. तसेच नेपाळमधूनच एव्हरेस्टवर बहुतांश गिर्यारोहक चढाई करतात. कारण तिबेटमध्ये माउंट एव्हरेस्ट चढाई करण्यासाठी खूप कठीण आहे. चीन एव्हरेस्टचा उल्लेख ‘माउंट चोमोलुंगमा’ असा करतो. नेपाळमध्ये चीनच्या या हालचालींचा विरोध सुरु झाला आहे. तसेच ‘माउंट चोमोलुंगमा’चा तिबेटकडील भाग असे लिहून ‘सीजीटीएन’ने आपली चूक सुधारावी असे नेपाळी लेखक कनक मणी दीक्षित यांनी म्हटले आहे.

leave a reply