ऑनलाईन टीका रोखण्यासाठी चीनच्या कम्युनिस्ट राजवटीची हॉटलाईन

हॉटलाईनबीजिंग – चीनवर अधिराज्य गाजवणार्‍या कम्युनिस्ट पक्षाच्या विरोधात होणार्‍या ऑनलाईन टीकेची तत्परतेने माहिती द्या, असे आवाहन करून चीनने यासाठी हॉटलाईनची घोषणा केली आहे. ‘सायबरस्पेस ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ चायना’द्वारे (सीएसी) ही घोषणा करण्यात आली आहे. आपल्या विरोधात केल्या जाणार्‍या टीकेबाबत चीनची कम्युनिस्ट राजवट दाखवित असलेली ही पराकोटीची असहिष्णूता व अतिसंवेदनशीलता, ही राजवट अधिकाधिक असुरक्षित बनल्याचे संकेत देत आहे.

चीनमध्ये आधीपासूनच इंटरनेटवर कडक निर्बंध लादण्यात आलेे आहेत. इतर देशांमध्ये मुक्तपणे वापरला जाणारा सोशल मीडिया चीनमध्ये नाही. चीनने आधीपासूनच सोशल मीडिया कंपन्यांना आपल्या देशात प्रवेश करण्यापासून रोखलेले आहे. चीनच्या कम्युनिस्ट राजवटीचा स्वतंत्र सोशल मीडिया असून यावर चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या विरोधात कुठल्याही स्वरुपाची टीका किंवा शेरे खपवून घेतले जात नाहीत. असे असताना सीएसीने हॉटलाईन सुरू करून आपल्या विरोधात उठणारा प्रत्येक आवाज चिरडण्याची तयारी केली आहे.

हॉटलाईनचीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेला जुलै महिन्यात १०० वर्षे पूर्ण होणार आहे. याच्या आधी आपल्या विरोधात कुठल्याही प्रकारची टीका केली जाऊ नये, यासाठी ही अतिसंवेदनशीलता दाखविली जात असल्याचे दिसत आहे. कम्युनिस्ट पक्षाचा इतिहास व आत्तापर्यंत कम्युनिस्ट पक्षाने केलेल्या कामगिरीच्या विरोधात अपप्रचार करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. यासाठी इंटरनेटचा वापर करणार्‍या सर्वांनी सहकार्य करावे आणि अशा अपप्रचाराची माहिती हॉटलाईनवर द्यावी, असे आवाहन सीएसीने केले आहे.

गेल्याच आठवड्यात चीनच्या गान्शू प्रांतातील १९ वर्षाच्या तरुणाला देशविरोधी विधाने केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्याच्याही आधी लडाखच्या एलएसीवर भारताबरोबर झालेल्या संघर्षात चीनने नक्की किती जवान गमावले व या जवानांना राष्ट्रीय सन्मान का दिला नाही, असा सवाल करणार्‍यांना तुरुंगात डांबण्यात आले होते. लडाखच्या गलवान खोर्‍यात झालेल्या संघर्षात शहीद झालेल्या आपल्या सैनिकांना भारताने राष्ट्रीय सन्मान दिला. पण चीनने तसे केले नाही, यावर या तरुणांनी चीनच्या सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली होती.

हा या तरुणांनी केलेला फार मोठा गुन्हा असल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. पुढच्या काळात चीनमध्ये अशा कारवायांची तीव्रता अधिकच वाढविली जाईल, असे या हॉटलाईनच्या घोषणेवरून स्पष्ट झाले होते. चीनसारखा आर्थिक, राजकीय व लष्करीदृष्ट्या स्वतःला प्रबळ मानणारा देश, इंटरनेटवरच्या टीकेने असुरक्षित बनत असल्याचे अत्यंत विसंगत चित्र यामुळे जगासमोर येत आहे.

चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या राजवटीविरोधात उठणारे आवाज तीव्र झाले तर त्याचे रुपांतर उठावात होईल, या भीतीने सदर राजवटीला ग्रासलेले आहे, हे ही या निमित्ताने पुन्हा एकदा जगजाहीर झाले आहे. चीनमध्ये कम्युनिस्ट राजवटीचे प्रशासन इतर देशांपेक्षा खूपच वेगळे आहे. कम्युनिस्ट पक्षाची राजवट म्हणजेच देश, असा या राजवटीने समज रूढ केला आहे. इतकेच नाही तर इतर देशांमध्ये रुजलेली लोकशाही चीनमध्ये येऊ नये, यासाठी कम्युनिस्ट राजवटीकडून पोलादी व्यवस्था उभारण्यात आली आहे. चीनचे लष्कर कम्युनिस्ट राजवटीशी एकनिष्ठ राहिल, अशी रचना करण्यात आलेली आहे. या व्यवस्थेवर कुणीही टीका करू नये तसेच त्यातील दोष व विसंगती यावर बोलू नये, अशीच चीनच्या कम्युनिस्ट पक्षाची अपेक्षा आहे. याला तडे जातील याची कम्युनिस्ट पक्षाच्या राजवटीला वाटत असलेली भीती या देशात सारे काही सुरळीत नाही, असे स्पष्टपणे दाखवून देत आहे.

leave a reply