अफगाणिस्तानातील ‘रेअर अर्थस्‌’वर ताबा मिळविण्यासाठी चीन तालिबानशी सहकार्याची भूमिका घेऊ शकतो

- विश्‍लेषकांचा इशारा

सहकार्याची भूमिकाबीजिंग/काबुल – अफगाणिस्तानात असणाऱ्या ट्रिलियन्स डॉलर्सच्या ‘रेअर अर्थ मिनरल्स’च्या साठ्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी चीन तालिबानबरोबर सहकार्याची भूमिका घेऊ शकतो, असा इशारा अमेरिकी विश्‍लेषिकेने दिला आहे. चीनकडे आधीच जगातील 30 टक्क्यांहून अधिक ‘रेअर अर्थ मिनरल्स’चे साठे असल्याचे मानले जाते. अफगाणिस्तानमधील साठ्यांवर नियंत्रण मिळविल्यास चीन त्याचा वापर करून आंतरराष्ट्रीय समुदायावर दडपण आणण्याचे प्रयत्न करु शकतो.

तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदाय तीव्र चिंता व्यक्त करीत असतानाच चीनने तालिबानी राजवटीला मान्यता देण्याचे संकेत दिले होते. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी, अफगाणिस्तानमधील नव्या राजवटीशी मैत्रीपूर्ण व सहकार्याचे संबंध ठेवण्यास चीन उत्सुक असल्याची प्रतिक्रिया दिली होती. या पार्श्‍वभूमीवर चीनचे तालिबानला मान्यता देण्यामागील हेतूंबाबत चर्चा सुरू झाली असून, त्यातून ‘रेअर अर्थ मिनरल्स’च्या साठ्यांचा मुद्दा समोर आला आहे.

सहकार्याची भूमिकाअमेरिकी यंत्रणा व माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानात सुमारे एक ते तीन ट्रिलियन डॉलर्सचे ‘रेअर अर्थ मिनरल्स’चे साठे आहेत. अमेरिकी दूतावासातील अफगाणिस्तानचे माजी राजनैतिक अधिकारी अहमद शाह कतावझाई यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. अफगाणिस्तानात असलेल्या ‘रेअर अर्थ मिनरल्स’मध्ये ‘लॅन्थॅनम’, ‘सेरियम’, ‘निओडायमिअम’, ‘लिथिअम’ यांचा समावेश आहे. या ‘रेअर अर्थ मिनरल्स’चा वापर इलेक्ट्रॉनिक्स, संरक्षण तसेच अंतराळक्षेत्रात होत असल्याने ती अत्यंत संवेदनशील मानली जातात.

‘तालिबानशी आघाडी करून चीन अफगाणिस्तानमधील दुर्मिळ खनिजांच्या साठ्यांवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करणार असेल, तर या मुद्यावर आंतरराष्ट्रीय दबाव तयार होणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन होणार नाही, यासाठी हे आवश्‍यक ठरते. तालिबान व चीन परस्परांच्या फायद्यासाठी अफगाणिस्तानातील खनिजांचा वापर करणार असतील तर मानवाधिकारांसह सर्व बाबींचे योग्य पालन होते का याचीही काळजी घ्यावी लागेल व त्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने पुढाकार घ्यायलाच हवा’, असा इशारा शमैल खान यांनी दिला. शमैला खान या ‘अलायन्स बर्नस्टेन’ या आंतरराष्ट्रीय मालमत्ता व्यवस्थापन कंपनीत संचालक म्हणून कार्यरत आहेत.

सहकार्याची भूमिकाचीनने यापूर्वी जपानविरोधात ‘रेअर अर्थ मिनरल्स’चा शस्त्रासारखा वापर केल्याचे समोर आले होते. अमेरिका-चीन व्यापारयुद्धातही चीनच्या सत्ताधाऱ्यांनी अमेरिकेविरोधात ‘रेअर अर्थ मिनरल्स’चा वापर करण्याचे संकेत दिले होते. ही पार्श्‍वभूमी लक्षात घेता चीनने अफगाणिस्तामधील खनिजांवर मिळविलेला ताबा आंतरराष्ट्रीय समुदायासाठी धोक्याची घंटा ठरु शकतो. त्यामुळे अमेरिकी विश्‍लेषिकेने दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

एकीकडे चीन तालिबानला मान्यता देऊन आपले हेतू साध्य करण्यासाठी पावले उचलत असतानाच, अफगाणिस्तान हा चीनच्या महत्त्वाकांक्षांना धक्का देऊ शकतो, असे दावे अमेरिकी माध्यमांकडून करण्यात येत आहेत. ‘ब्लूमबर्ग’ने दिलेल्या एका वृत्तात, अफगाणिस्तानमधील सहभाग वाढविणे व तालिबानी राजवटीला सहकार्य करणे चीनच्या ‘बेल्ट ॲण्ड रोड इनिशिएटिव्ह’ योजनेसाठी धोकादायक ठरु शकते, असे बजावले आहे. अफगाणिस्तानात तालिबान स्थिर झाल्यास पाकिस्तानमधील दहशतवादी गटांना बळ मिळेल व पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढेल, असे सांगण्यात येते.

काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानमधील एका ऊर्जा प्रकल्पाच्या चिनी कर्मचाऱ्यांवर झालेला हल्ला व त्यापूर्वी झालेले काही प्रयत्न याला दुजोरा देणारे ठरतात, असे ‘ब्लूमबर्ग’ने म्हटले आहे. चीनने ‘बेल्ट ॲण्ड रोड इनिशिएटिव्ह’ अंतर्गत पाकिस्तानमध्ये 60 अब्ज डॉलर्सहून अधिक गुंतवणूक केली आहे. त्याचवेळी ‘बेल्ट ॲण्ड रोड इनिशिएटिव्ह’ अंतर्गत चीनच्या बँकांनी जगभरात जवळपास 282 अब्ज डॉलर्सहून अधिक कर्जाचे वाटप केले आहे. पाकिस्तान अस्थिर झाल्यास चीनच्या ‘बेल्ट ॲण्ड रोड इनिशिएटिव्ह’चा पाया हादरू शकतो व परिणामी संपूर्ण योजना कोसळू शकते, असा दावा अमेरिकी वेबसाईटने आपल्या लेखात केला आहे.

leave a reply