कोरोनाच्या आडून चीन आर्थिक युद्ध खेळत आहे – अमेरिकेचा आरोप

वॉशिंग्टन/बीजिंग – कोरोना साथीच्या संकटाचा वापर करून चीन अमेरिकेविरोधात आर्थिक युद्ध खेळत असल्याचा आरोप अमेरिकेच्या संरक्षण विभागाने केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व प्रशासनाने कोरोना साथीच्या मुद्द्यावर चीनविरोधात राजनैतिक युद्ध छेडले असून अनेक मोठे व आक्रमक निर्णय घेतले आहेत. चिनी कंपन्या व गुंतवणूक या अमेरिकेच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याची भूमिका यामागे असून चीनकडून आर्थिक बळाच्या जोरावर या भूमिकेला शह देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

आर्थिक युद्ध, चीन

कोरोनाची साथ व त्यामुळे अमेरिकेसह जगाचे झालेले नुकसान यासाठी चीनच जबाबदार असल्याचा आक्रमक पवित्रा ट्रम्प प्रशासनाने घेतला आहे. चीनच्या या कारवायांसाठी त्याला धडा शिकवण्याचे इशारेही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व सहकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. त्यासाठी गेल्या दोन महिन्यात अमेरीकेने काही मोठे व आक्रमक निर्णय घेतले असून व्यापार तसेच अर्थव्यवस्थेतील चीनचा प्रभाव कमी करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचवेळी चीननेही त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केल्याचे समोर येत आहे.

कोरोना साथीमुळे जागतिक व्यापार व अर्थव्यवस्थेला मोठे धक्के बसले आहेत. अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधार असणाऱ्या अनेक उद्योग क्षेत्रांना जबरदस्त आर्थिक फटका सहन करावा लागला असून भांडवलाची चणचण जाणवू लागली आहे. याचा फायदा उचलून चीनच्या राजवटीने वेगवेगळ्या माध्यमातून संवेदनशील उद्योग तसेच कंपन्यांमध्ये गुंतवणूक सुरू केली आहे. चीनची ही गुंतवणूक नजीकच्या काळात संरक्षण क्षेत्रासह राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित अनेक क्षेत्रांमध्ये अमेरिकेला अडचणीत आणू शकते, असा इशारा संरक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिला आहे.

आर्थिक युद्ध, चीन

काही दिवसांपूर्वी, अमेरिकेच्या संरक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी एलन लॉर्ड यांनी चीनचे थेट नाव न घेता काही शत्रूदेश साथीच्या काळात अमेरिकेविरोधात आर्थिक युद्ध खेळण्याचा प्रयत्न करीत आहेत असा आरोप केला होता. त्यांच्या या आरोपाला आता संरक्षण विभागातील इतर अधिकारी तसेच विश्लेषकांकडूनही दुजोरा मिळत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे व्यापारी सल्लागार पीटर नॅव्हारो यांनीही नुकताच चीन कोरोना साथीचा वापर सामरिक हितसंबंधांसाठी करत असल्याचा ठपका ठेवला होता.

चीनच्या या आर्थिक युद्धाचा धोका रोखण्यासाठी अमेरिकेच्या संरक्षण विभागाने राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित सर्व क्षेत्रांमधील कंपन्यांची चौकशी सुरू केली आहे. या कंपन्यांमध्ये झालेली गुंतवणूक अथवा संभाव्य गुंतवणूक चीनशी संबंधित आहे का याचा शोध याद्वारे घेतला जात आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियानेही आपल्या अर्थव्यवस्थेवरील चीनचा प्रभाव व हस्तक्षेप कमी करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ब्रिटनबरोबर मुक्त व्यापार करारासाठी लवकरच चर्चा सुरू करण्यात येईल अशी माहिती ऑस्ट्रेलिया सरकारने दिली. या वर्षाच्या अखेरपर्यंत कराराची बोलणी पूर्ण झालेली असतील, असे संकेतही ऑस्ट्रेलियाकडून देण्यात आले. चीन हा ऑस्ट्रेलियाचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश असून कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर ठाम भूमिका घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाला चीनकडून सातत्याने धमकावण्यात येत आहे.

leave a reply