सीमावाद छेडणाऱ्या चीनची भारतातील आयात घटली

नवी दिल्ली – गलवानमध्ये चीनशी झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने चिनी मालावर टाकलेल्या बहिष्काराचा परिणाम दिसू लागला आहे. चालू वित्तीय वर्षाच्या एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांमध्ये चीनमधून भारतात होणारी आयात गेल्या वर्षीच्या तुलनेत २७.६३ टक्क्यांनी घटल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत चीनकडून होणारी आयात २१.४२ अब्ज डॉलर्स होती. यावर्षी ही आयात १६.५५ अब्ज डॉलर्सपर्यंत घसरली आहे. केंद्रीय व्यापार व उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी लोकसभेत ही माहिती दिली.

सीमावाद छेडणाऱ्या चीनची भारतातील आयात घटलीदोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या सीमावादाचा परिणाम या आयातीवर दिसून आला आहे, असे व्यापार व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला त्यांनी ही माहिती दिली. ऑगस्ट महिन्यात चीनमधून भारतात झालेली आयात ४.९८ अब्ज डॉलर्सवर आली आहे. जुलै महिन्यात हीच आयात ५.५८ अब्ज डॉलर्स इतकी होती. चीनवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीने केंंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करीत असल्याचेही गोयल यांनी सांगितले.

२०१७-१८ पासूनच भारताकडून होणाऱ्या चिनी आयातीत घसरण सुरू आहे. २०१७-१८ च्या वित्तीय वर्षात भारताने चीनकडून ७६.३८ अब्ज डॉलर्सची आयात केली होती. २०१८-१९ या वित्तीय वर्षात हीच आयात ७०.३१ अब्ज डॉलर्स इतकी होती. तर २०१९-२० या वर्षात आयात ६५.२६ अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली होती.

भारताने चीनमधून आयात कमी करण्यासाठी डम्पिंग ड्युटीमध्ये वाढ केली असून नियमही बदलले आहेत. त्याचवेळी जवळपास २००हुन अधिक वस्तूंच्या आयातीवर बंदी आणली आहे. त्यामुळे येत्या काळात चीनमधून आयात आणखी घटेल, असे दावे करण्यात येत आहे. भारत चीनकडून सर्वाधिक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने, टेलिकॉम उपकरणे, कॉम्प्युटर हार्डवेअर, औषधे, खते, स्टील व इतर अभियांत्रिकी साहित्यांची आयात करतो.

leave a reply