चीन व्यापाराचा शस्त्रासारखा वापर करीत आहे

- ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अ‍ॅबॉट यांचा इशारा

लंडन/कॅनबेरा/बीजिंग – चीन व्यापाराचा सामरिक शस्त्रासारखा वापर करीत असल्याचा इशारा ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अ‍ॅबॉट यांनी दिला. चीन हा धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा स्पर्धक असून ‘सोव्हिएत युनियन’पेक्षा अधिक घातक असल्याचेही अ‍ॅबॉट यांनी बजावले. ब्रिटनने अ‍ॅबॉट यांची विशेष व्यापार सल्लागार म्हणून नियुक्ती केली असून, ब्रिटन व सहकारी देशांनी व्यापाराच्या मुद्यावर चीनपासून सावधगिरी बाळगावी असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

चीन व्यापाराचा शस्त्रासारखा वापर करीत आहे - ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अ‍ॅबॉट यांचा इशाराटोनी अ‍ॅबॉट 2013 ते 2015 असे दोन वर्षे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान होते. याच कालावधीत ऑस्ट्रेलिया व चीनमध्ये व्यापारी करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. या व्यापारी कराराचा वापर चीनने ऑस्ट्रेलियावरील आपली पकड घट्ट करण्यासाठी केल्याचे कालांतराने समोर आले होते. याच व्यापारी प्रभावाचा वापर करुन चीन सध्या ऑस्ट्रेलियाला धमकावण्याचा व दडपण आणण्याचा प्रयत्न करीत आहे. या पार्श्‍वभूमीवर माजी पंतप्रधान अ‍ॅबॉट यांनी दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

‘पाण्याचा नळ चालू व बंद करीत असल्याप्रमाणे चीन व्यापाराचा सामरिक शस्त्रासारखा वापर करीत आहे. चीनच्या भूराजकीय हितसंबंधांना साथ देण्यास नकार दिल्याने ऑस्ट्रेलियाविरोधात व्यापारयुद्ध छेडण्यात आले आहे. याच व्यापारयुद्धाअंतर्गत ऑस्ट्रेलियाच्या उत्पादनांवर कर लादून शिक्षा दिली जात आहे’, असे अ‍ॅबॉट यांनी बजावले. चीन अत्यंत आक्रमकपणे आपला प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न करीत असून हा नव्या शीतयुद्धाचाच भाग आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. सध्याच्या काळात आपण ऑस्ट्रेलियाच्या नेतेपदी असतो तर चीनबरोबर व्यापारी करार करण्याचा विचारही केला नसता, असे वक्तव्यही माजी पंतप्रधान अ‍ॅबॉट यांनी केले.

ब्रिटनकडून ऑस्ट्रेलियाला मुक्त व्यापार कराराचा प्रस्तावब्रिटनमधील एका अभ्यासगटाच्या कार्यक्रमात बोलताना, अ‍ॅबॉट यांनी ब्रिटन व सहकारी देशांनाही चीनच्या व्यापारी कारवायांबाबत सावधगिरी बाळगण्याचा इशाराही दिला. ब्रिटन व सहकारी देशांनी चीनला प्रगत तंत्रज्ञानाची विक्री करू नये, असे त्यांनी यावेळी बजावले. चीनच्या एका कंपनीने ब्रिटनमधील ‘कॉम्प्युटर चिप फर्म’ खरेदी केली आहे. ऑस्ट्रेलियात हे घडले नसते, असा दावा अ‍ॅबॉट यांनी यावेळी केला. ब्रिटन व ऑस्ट्रेलियाने एकत्र येऊन पर्यायी ‘सप्लाय चेन’ उभारण्यासाठी हालचाली कराव्यात, असा सल्लाही ऑस्ट्रेलियाच्या माजी पंतप्रधानांनी यावेळी दिला.

ब्रिटीश अभ्यासगटाच्या कार्यक्रमात ब्रिटनच्या व्यापारमंत्री लिझ ट्रुसही उपस्थित होत्या. त्यांनीही अ‍ॅबॉट यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला असून, ब्रिटन व सहकारी देशांनी चीनच्या व्यापारी कारवायांना आव्हान द्यायला हवे, असे म्हंटले आहे. गेल्या काही वर्षात ब्रिटन व ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांबरोबरील चीनचे संबंध चांगलेच चिघळले आहेत. 5जी तंत्रज्ञान, कोरोनाची साथ, साऊथ चायना सी, तैवान, हाँगकाँग यासारख्या अनेक मुद्यांवरून चीन व या दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर, ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान अ‍ॅबॉट यांची ब्रिटनमध्ये सल्लागार म्हणून झालेली नियुक्ती व त्यांनी दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

leave a reply