लडाखच्या एलएसीवरील तणावाला चीन जबाबदार नाही

- चीनच्या संरक्षण मंत्रालयाचा दावा

बीजिंग – पूर्व लडाखच्या एलएसीवर चीनने लष्करी बळाचा वापर करून इथली स्थिती बदलण्याचा प्रयत्न करून पाहिला, असा आरोप भारताचे संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी केला होता. त्यावर चीनची प्रतिक्रिया आली आहे. भारताच्या संरक्षणदलप्रमुखांनी केलेले हे दावे चुकीचे असल्याचे चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते सिनिअर कर्नल वु क्विआन यांनी म्हटले आहे. लडाखच्या एलएसीवरील परिस्थितीबाबतची चीनची भूमिका अतिशय स्पष्ट आहे आणि इथल्या परिस्थितीला चीन जबाबदार नाही, असा दावा क्विआन यांनी केला आहे.

१५ एप्रिल रोजी नवी दिल्ली येथील रायसेना डायलॉग या सुरक्षाविषयक परिषदेत बोलताना, जनरल बिपीन रावत यांनी सार्‍या जगाचे लक्ष वेधून घेणारी विधाने केली होती. पूर्व लडाखमध्ये घुसखोरी करून आपले लष्करी सामर्थ्य आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान याच्या बळावर भारताला मागे ढकलता येईल, असे चीनला वाटत होते. आपल्या दडपणासमोर भारत झुकेल, असा समज चीनने करून घेतला होता. पण भारतीय सैन्य या क्षेत्रात चीनच्या लष्करासमोर कणखरपणे उभे राहिले. भारतीय सैन्याला मागे हटविता येणार नाही, हे यामुळे सिद्ध झाले, असे जनरल रावत म्हणाले होते.

त्यांच्या या उद्गारांचा दाखला देऊन चीनच्या संरक्षण मंत्रालयाकडून आयोजित केल्या जाणार्‍या पत्रकार परिषदेत यावर काहीजणांनी प्रश्‍न उपस्थित केले होते. त्याला सिनिअर कर्नल वु क्विआन यांनी उत्तर दिले. भारताच्या संरक्षणदलप्रमुख जनरल रावत यांनी केलेले हे दावे निराधार आहेत, लडाखच्या एलएसीवरील परिस्थितीची जबाबदारी चीनवर टाकता येणार नाही, असे कर्नल क्विआन यांनी म्हटले आहे. सध्या एलएसीवरील परिस्थिती सामान्य बनली असून भारताने यावर समाधान व्यक्त करायला हवे, असेही क्विआन पुढे म्हणाले. याआधीही लडाखच्या एलएसीवरील तणाव निवळला आहे, यावर भारताने समाधान व्यक्त करावे, असा सल्ला चीनकडून देण्यात आला होता.

दरम्यान, चीनच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने यासंदर्भात केलेल्या विधानांमध्ये फार मोठा विरोधाभास असल्याचे समोर येत आहे. लडाखच्या एलएसीवरील क्षेत्रात चीनच्या लष्कराने घुसखोरी केली नाही, असे चीनचे म्हणणे असेल तर मग भारतीय सैन्याने आपल्या भूभागावर अतिक्रमण केले, असा दावा चीनला करावा लागेल. पण भारतावर तसा आरोप करायला चीन तयार नाही. केवळ भारतीय संरक्षणदलप्रमुखांचा दावा निराधार असल्याचे सांगून चीन पळवाट शोधण्याचा प्रयत्न करीत आहे, हे यामुळे पुन्हा एकदा उघड झाले आहे.

दरम्यान, अजूनही लडाखच्या एलएसीवरील काही भागांमध्ये चीनचे जवान तैनात आहेत. त्यांनीही इथून माघार घेतल्याखेरीज एलएसीवरील तणाव कमी होणार नाही, असे भारताने वारंवार बजावले होते. त्याला चीनने नकार दिला आहे. त्यानंतर भारताने या क्षेत्रात चीनला इशारा देणार्‍या हालचाली सुरू केल्या आहेत. भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांनी पूर्व लडाख व सियाचिनला भेट देऊन इथल्या युद्धसज्जतेचा आढावा घेतला. याद्वारे भारताकडून चीनला योग्य तो संदेश दिला जात आहे. मात्र चीन त्यावर आक्रमक प्रतिक्रिया देऊन भारताला दुखावण्याचे सध्या तरी टाळत आहे.

संरक्षणदलप्रमुख जनरल रावत यांच्या विधानांवरही चीनच्या संरक्षण मंत्रालयाने जहाल प्रतिक्रिया दिलेली नाही, ही देखील विशेष नोंद घेण्याजोगी बाब ठरते. आधीच्या काळात चीनने एलएसीवर घुसखोरी केल्यानंतर, भारताने चीनच्या विरोधात आक्रमक भाषेचा प्रयोग करण्याचे टाळले होते. पण लडाखच्या एलएसीवरील गलवान खोर्‍यातील संघर्षानंतर भारताने आपल्या भूमिकेत बदल केला असून, भारतीय नेते, लष्करी अधिकारी थेट चीनला इशारे देऊ लागले आहेत. तर चीन सीमावादाचा द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करीत आहे. तर एलएसीवर घुसखोरीचे प्रयत्न सुरू ठेवून चीनला भारताबरोबर सहकार्य कायम राखता येणार नाही, याची जाणीव भारताकडून करून दिली जात आहे.

leave a reply