चीनची माऊंट एव्हरेस्टवर ‘सेपरेशन लाईन’ आखण्याची तयारी

बीजिंग – ज्या चीनमधून कोरोनाची साथ जगभरात पसरली तो चीन आता माऊंट एव्हरेस्टमध्ये येणार्‍या गिर्यारोहकांच्या मार्फत आपल्या देशात कोरोना येऊ नये यासाठी ‘सेपरेशन लाईन’ आखण्याची तयारी करीत आहे. नेपाळची सीमा भिडलेल्या या भागात चीन आखत असलेली ही लाईन म्हणजे नेपाळची भूमी बळकावण्याचा चीनचा नवा डाव असल्याचे दिसते. सध्या नेपाळमध्ये राजकीय संकट खडे ठाकले असून पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचे सरकार कोसळले आहे. याचा लाभ घेऊन चीनने यासाठी पुढाकार?घेतल्याचे समोर येत आहे.

माऊंट एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी येणार्‍या परदेशी गिर्यारोहकांच्या मार्फत चीनमध्ये कोरोनो पसरण्याच धोका संभवतो, असे हास्यास्पद कारण चीनने पुढे केले आहे. हा फैलाव रोखण्यासाठी तिबेटमधील गाईडस्चा वापर करून चीन ही सेपरेशन लाईन आखणार आहे. यासाठी नेपाळची सहमती घेतली जाईल का, ते जाहीर करण्याची तसदी चीनने घेतलेली नाही. त्यामुळे ही सेपरेशन लाईन एकतर्फी असेल आणि आपल्याला वाटेल तो भाग चीन याद्वारे आपल्याशी जोडून घेऊ शकतो. यावर नेपाळची प्रतिक्रिया आलेली नाही. सध्या या देशात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथींच्या पार्श्‍वभूमीवर, याकडे लक्ष पुरविणे नेपाळला शक्यही नाही.चीनची माऊंट एव्हरेस्टवर ‘सेपरेशन लाईन’ आखण्याची तयारी

नेपाळचे पंतप्रधान केपी ओली शर्मा यांच्या सरकारने बहुमत गमावले असून त्यांचे सरकार कोसळले आहे. नवे सरकार सत्तेवर येऊन कारभार सुरू करेपर्यंत बराच काळावधी जाऊ शकतो. त्यातच नेपाळमध्ये कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. चीनच्या सरकारी माध्यमांनी याच्या बातम्या उचलून धरल्या होत्या, त्यामागे चीनची रणनीति असल्याचे आता उघड होत आहे. नेपाळमधला कोरोना चीनमध्ये माऊंट एव्हरेस्टमधील गिर्यारोहकांच्या मार्फत दाखल होईल, असे सांगून चीन आखत असलेली ही सेपरेशन लाईन व्यवहार्य बाब ठरत नाही, असे नेपाळच्याच एका गिर्यारोहक तज्ज्ञाने म्हटले आहे.

पर्वतराजीमध्ये अशा प्रकारची रेषा मारणे अशक्य कोटीतली बाब ठरते, असे या तज्ज्ञाचे म्हणणे आहे. त्यामुळे चीनच्या या हालचालींवरील संशय अधिकच बळावत आहे. मात्र नेपाळच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. काही महिन्यांपूर्वी चीनने नेपाळच्या काही गावांचा ताबा घेऊन ही गावे आपल्या भूभागाला जोडून टाकली होती. मात्र त्यावेळी पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी चीनला विरोध करण्याचे टाळले होते. शर्मा ओली हे चीनचे हस्तक म्हणून काम करीत असल्याचा आरोप नेपाळमध्ये होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर, त्यांनी चीनच्या अतिक्रमणाकडे केलेली डोळेझाक लक्षणीय बाब ठरते.

चीनच्या घुसखोरीकडे दुर्लक्ष करणारे ओली शर्मा भारताबरोबर सीमावाद छेडायला तयार झाले होते. पण कालांतराने चीनपासून असलेला धोका बळावल्यानंतर पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी भारताबरोबरील संबंध सुधारण्यासाठी पावले उचलली होती. पण चीनबरोबरच्या त्यांच्या अतिरेकी सहकार्याची गंभीर किंमत नेपाळला चुकती करावी लागणार असल्याचे आता स्पष्टपणे दिसत आहे. माऊंट एव्हरेस्टबाबत चीनने केलेली घोषणा याचीच साक्ष देत आहे.

leave a reply