चीनने तालिबानवर विश्‍वास ठेवू नये

- चीनमधील अफगाणी राजदूताचा इशारा

विश्‍वासबीजिंग – ईस्ट तुर्कमेनिस्तानला चीनपासून स्वतंत्र करण्यासाठी संघर्ष करणार्‍या ‘ईटीआयएम’च्या दहशतवाद्यांना अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करू देणार नाही, असे आश्‍वासन तालिबानने चीनला दिले आहे. पण ‘ईटीआयएम’सारखीच विचारधारा आणि मानसिकता असणार्‍या तालिबानच्या आश्‍वासनांवर चीनने अजिबात विश्‍वास ठेवू नये, तालिबानपासून सावध रहावे, असा सल्ला चीनमधील अफगाणिस्तानचे राजदूत जावेद अहमद कईम यांनी दिला. त्याचबरोबर चीनने अफगाणिस्तान सरकार किंवा तालिबानपैकी एकाची निवड करावी, असे अफगाणिस्तानच्या राजदूतांनी चीनला बजावले आहे.

गेल्या आठवड्यात चीनने तालिबानच्या वरिष्ठ कमांडर्सची विशेष बैठक आयोजित केली होती. चीनच्या तियांजिन येथे पार पडलेल्या या बैठकीत तालिबानचा नेता मुल्ला बरादर सहभागी झाला होता. ‘तालिबान ही महत्त्वाची लष्करी आणि राजकीय संघटना असून अफगाणिस्तानच्या पुनर्बांधणीत ते महत्त्वाची भूमिका बजावतील’, असे चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई यावेळी म्हणाले होते. चीनच्या झिंजियांग प्रांताला तोडून स्वतंत्र ईस्ट तुर्कमेनिस्तानसाठी संघर्ष करणार्‍या ‘ईस्ट तुर्कीस्तान इस्लामिक मुव्हमेंट-ईटीआयएम’चा मुद्दा चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी मांडला होता. तालिबानने या दहशतवादी संघटनेला अफगाणिस्तानात आश्रय देऊ नये, अशी मागणी वँग ई यांनी केली होती.

विश्‍वासमुल्ला बरादर याने देखील चीनच्या झिंजियांग प्रांतात उघुर इस्लामधर्मियांवर सुरू असलेल्या अत्याचारात दखल देणार नसल्याचे या बैठकीत जाहीर केले. त्याचबरोबर अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर चीनविरोधी कारवायांसाठी होऊ देणार नसल्याचे आश्‍वासन बरादर याने दिले होते. पण अफगाणिस्तानातील आपल्या जुलमी राजवटीला चीनचा पाठिंबा मिळावा यासाठी तालिबानने हे आश्‍वासन दिले आहे. त्यामुळे चीनने दहशतवादी संघटनेच्या या आश्‍वासनांपासून सावध रहावे, असा सल्ला अफगाणिस्तानचे चीनमधील राजदूत जावेद अहमद कईम यांनी दिला.

‘तालिबान, ईटीआयएम आणि इतर दहशतवादी संघटनांची विचारधारा एकसमान आहे. त्यामुळे एकाच विचारधारेचे दोन गट परस्परांविरोधात लढतील, असा चीनने विचार तरी कसा केला?’ असा सवाल अफगाणी राजदूत कईम यांनी आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेशी बोलताना केला. यासाठी अफगाणिस्तानच्या राजदूतांनी गेल्या महिन्यात संयुक्त राष्ट्रसंघाने प्रसिद्ध केलेल्या अहवालाची आठवण करून दिली.

विश्‍वासदोहा येथील समझौत्यामध्ये तालिबानने अल कायदासह इतर कुठल्याही दहशतवादी संघटनेबरोबर सहकार्य करणार नसल्याचे मान्य केले होते. पण आजही तालिबान अल कायदा, ईटीआयएम तसेच पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांबरोबर सहकार्य करीत असल्याचे राष्ट्रसंघाने आपल्या अहवालात म्हटले होते. त्यातच ईटीआयएम ही अल कायदासंलग्न संघटना असून तालिबान त्यांच्याबरोबरचे सहकार्य तोडणे अवघड असल्याचा दावा कईम यांनी केला.

तालिबानबरोबर चर्चा करण्याआधी चीनने अफगाणी सरकारला याची माहिती दिली होती. पण एकाचवेळी अफगाणी सरकार आणि तालिबानशी चर्चा करणार्‍या चीनने या दोघांपैकी एकाची निवड करावी, असे अफगाणिस्तानच्या राजदूतांनी बजावले आहे. तसेच अफगाणिस्तानात शांतता हवी असेल तर चीनने तालिबानला सहाय्य करणार्‍या पाकिस्तानला रोखावे आणि पाकिस्तानला अफगाणी सरकारचा विश्‍वास कमावण्याची सूचना करावी, असे कईम यांनी सुचविले आहे.

दरम्यान, चीनच्या सीमेजवळील अफगाणिस्तानच्या बडाकशान प्रांतात ‘ईटीआयएम’ या संघटनेचे तळ असल्याचा दावा केला जातो. या ठिकाणी ईटीआयएमचे दहशतवादी प्रशिक्षण घेत असल्याचा व्हिडिओ नुकताच समोर आला होता.

leave a reply