लडाखच्या एलएसीवर चीनचा हेका कायम

नवी दिल्ली – लडाखच्या एलएसीवरील गोग्रा, हॉट स्प्रिंग आणि डेप्सांग इथून आपले लष्कर मागे घेण्याचे चीनने मान्य केले होते. पण दोन्ही देशांच्या लष्करी अधिकार्‍यांमधील चर्चेच्या ११ व्या फेरीत चीनने इथून माघार घेण्याचे नाकारून, चीनने विश्‍वासघातकी देश ही आपली प्रतिमा कायम राखली आहे. या चर्चेचे तपशील आता माध्यमांसमोर येऊ लागले आहेत. त्याचवेळी चीन लडाखच्या एलएसीवर भारतावर दडपण आणण्याचे नवे प्रयत्न करीत असल्याचेही उघड झाले आहे. यासाठी चीन तिबेटी तरुणांची आपल्या लष्करात भरती करीत असल्याचे दिसत आहे.

उभय देशांच्या लष्करी अधिकार्‍यांच्या चर्चेनंतर लडाखच्या सीमावादाची तीव्रता कमी करण्याबाबत?झालेल्या प्रगतीवर भारताने समाधान व्यक्त करावे, असा अनाहूत सल्ला चीनकडून दिला जात आहे. इथला तणाव अधिक चिघळला असता, तर ते भारतासाठी घातक ठरले असते, असा संदेश याद्वारे चीनकडून दिला जात आहे. त्याचवेळी चीनने लडाखच्या एलएसीवर तैनात करण्यासाठी तिबेटमधील तरुणांची आपल्या लष्करात भरती सुरू केली आहे. या भरतीची प्रक्रिया या वर्षाच्या आरंभापासून सुरू झाल्याचे दावे केले जातात. चीनच्या जवानांना लडाखच्या एलएसीवरील कडक हिवाळा सहन करता आला नव्हता. इथे चीनचे जवान थंडीने गारठले होते आणि त्यांना वारंवार रुग्णालयात दाखल करावे लागले होते. लडाखच्या एलएसीवर कडक हिवाळ्यातही तैनाती ठेवावी लागेल, याची तयारी चीनने केलेली नव्हती. त्याचा फार मोठा फटका चिनी लष्कराला बसला होता.

चीनचे जवान इथल्या थंडीत गारठल्याच्या बातम्या जगजाहीर झाल्याने, चीनच्या लष्करी सामर्थ्याचे दावे फोल ठरले होते. लडाखच्या एलएसीवर भारतीय सैन्य वर्चस्व गाजवित असल्याची बाब पाश्‍चिमात्य निरिक्षकांनीही मान्य केली होती. यामुळे इथला सीमावाद हा चीनच्या प्रतिष्ठेचा विषय बनला होता. भारताला युद्धाच्या धमक्या देऊनही काहीही हाती लागत नाही, हे पाहून चीनने लडाखच्या पँगॉंग सरोवर क्षेत्रातून माघार घेण्याचे मान्य केले. यानुसार चीनने काही भागातून माघार घेतली देखील. पण अजूनही गोग्रा, हॉट स्प्रिंग आणि डेप्सांग या ठिकाणाहून माघार घेण्यास चीन तयार नाही. उलट या क्षेत्रात नवी तैनाती करून त्यासाठी तिबेटच्या तरुणांचा वापर करण्याचा डाव चीनने आखला आहे.

लडाखच्या क्षेत्रात वावरण्याचा सराव चीनच्या लष्कराला नाही. विशेषतः इथल्या हिवाळ्यात चीनचे सैन्य टिकू शकत नाही. म्हणूनच यासाठी तिबेटी तरुणांचा वापर करण्याची तयारी चीनकडून केली जात आहे. तिबेटमध्ये चीनने मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे तसेच क्षेपणास्त्रे तैनात केल्याच्या बातम्या याआधीच आल्या होत्या. मात्र चीनच्या या सार्‍या कारवायांकडे भारताची करडी नजर रोखलेली आहे. लष्करप्रमुख जनरल नरवणे व संरक्षणदलप्रमुख जनरल रावत यांनी वेळोवेळी तशी ग्वाही दिली होती. त्याचवेळी भारतीय नेते व संरक्षणदलांचे अधिकारी उघडपणे चीनला सज्जड इशारे देऊ लागले आहेत. यामुळे चीनच्या अस्वस्थतेत अधिकच भर पडत आहे.

leave a reply