‘हॉंगकॉंग’वरून चीनची अमेरिकेला धमकी

बीजिंग – हॉंगकॉंगमधील सुरक्षा कायद्याच्या मुद्द्यावर अमेरिकेने चीनविरोधात कारवाईचे पाऊल उचलल्यास, चीनही अमेरिकेला त्याच भाषेत प्रत्युत्तर देईल, अशी धमकी चीनने दिली आहे. चीनच्या संसदेत मांडण्यात आलेल्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्याविरोधात हॉंगकॉंगसह आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अमेरिकेने या मुद्द्यावर चीनविरोधात कठोर कारवाई करण्याचे संकेतही दिले होते.

गेल्या आठवड्यात चीनच्या संसदेत हॉंगकॉंगसाठी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याची घोषणा करण्यात आली होती. या कायद्यातील तरतुदींनुसार, चीनच्या सुरक्षा यंत्रणांना हॉंगकॉंगमध्ये कारवाई करण्याची मोकळीक देण्यात आली आहे. हा नवा कायदा म्हणजे चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीकडून हॉंगकॉंगवर ताबा मिळवण्यासाठी उचलण्यात आलेले अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जाते. चीनच्या कम्युनिस्ट राजवटीकडून सुरू झालेल्या या हस्तक्षेपाच्या विरोधात हॉंगकॉंगसह आंतरराष्ट्रीय पातळीवर तीव्र पडसाद उमटत आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या कायद्याच्या पार्श्वभूमीवर चीन विरोधात कठोर कारवाईचे संकेत दिले होते. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी हॉंगकॉंगचा ‘स्पेशल स्टेटस’ रद्द करण्याचा इशारा दिला होता. त्याचवेळी कायद्याची अंमलबजावणी झाल्यास चीन तसेच हॉंगकॉंगवर निर्बंध लादण्यात येतील, असेही अमेरिकेच्या सल्लागारांनी बजावले होते. अमेरिकेव्यतिरिक्त ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि तैवाननेही हॉंगकॉंगच्या जनतेच्या समर्थनार्थ चीन विरोधात हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर चीनकडून अमेरिकेला देण्यात आलेली धमकी लक्ष वेधून घेणारी ठरते.

‘हॉंगकॉंगमधील कायद्याच्या मुद्द्यावर अमेरिका चीनच्या हितसंबंधांना धक्का देण्याच्या हालचाली करीत आहे. अमेरिकेने अशी कारवाई केल्यास चीन त्या विरोधात आक्रमक भूमिका घेईल व त्याच भाषेत अमेरिकेला प्रत्युत्तर देईल’, असा इशारा चीनच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते झाओ लिजिअन यांनी दिला. दोन दिवसांपूर्वी चीनचे परराष्ट्रमंत्री वॅग यी यांनी अमेरिकेवर टीकास्त्र सोडताना नव्या शीतयुद्धाचा आरोप केला होता. हा आरोप करताना चिनी परराष्ट्रमंत्र्यांनी हॉंगकॉंगचाही उल्लेख केला होता.

शीतयुद्धाचा आरोप व परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यांनी दिलेला इशारा, यापाठोपाठ आता चीनच्या लष्करानेही हॉंगकॉंगच्या वादात उडी घेतली आहे. चीनचे लष्कर हॉंगकॉंगमधील चीनच्या सार्वभौमत्वाच्या संरक्षणासाठी सज्ज आहे, असे हॉंगकॉंगमधील चिनी लष्करी तळाच्या प्रमुखांनी बजावले. चीनच्या सरकारी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कमांडर दाओशिआंग यांनी, राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर हॉंगकॉंगचे संरक्षण करण्यासाठी आमच्याकडे दृढ विश्वास व क्षमता आहे, असे म्हटले आहे.

र्गल्या वर्षी हॉंगकॉंगमध्ये झालेल्या चीनविरोधी आंदोलनातही, निदर्शकांना रोखण्यासाठी चीनच्या सत्ताधारी राजवटीकडून लष्करी तैनातीचे संकेत देण्यात आले होते. कमांडर दाओशिआंग यांच्या वक्तव्यामुळे चीन पुन्हा एकदा लष्कर तैनात करण्याची तयारी करीत असल्याचे दिसत आहे.

leave a reply