चीनकडून डिजिटल युआनचा वापर वाढविण्याच्या हालचाली

बीजिंग – चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने डिजिटल करन्सीच्या क्षेत्रात आघाडी मिळविण्यासाठी हालचालींना वेग दिला आहे. चीनच्या मध्यवर्ती बँकेने राजधानी बीजिंगमधील रहिवाशांना चार कोटी ‘डिजिटल युआन करन्सी’ लॉटरीच्या माध्यमातून भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षभरात चीनने आपल्या नागरिकांना डिजिटल करन्सी भेट स्वरुपात देण्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी शेन्झेन व चेंगडू शहरातील नागरिकांनाही डिजिटल युआनची भेट देण्यात आली होती. गेल्याच महिन्यात चीनने बँका व इतर वित्तसंस्थांवर ‘क्रिप्टोकरन्सी’शी निगडित सेवा पुरविण्यासंदर्भात बंदीची घोषणा केली होती.

चीनकडून डिजिटल युआनचा वापर वाढविण्याच्या हालचालीराजधानी बीजिंगमधील नागरिकांना दोन बँकिंग अ‍ॅप्सच्या माध्यमातून ‘डिजिटल युआन’ जिंकण्याची संधी देण्यात येणार आहे. प्रत्येक नागरिकाला किमान 200 डिजिटल युआन लॉटरीच्या माध्यमातून मिळू शकतात, अशी माहिती ‘बीजिंग लोकल फायनान्शिअल सुपरव्हिजन अ‍ॅण्ड अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ब्युरो’कडून देण्यात आली. 7 जूनपर्यंत लॉटरीत सहभागी होण्याची संधी असून काही निवडक दुकानांमध्ये डिजिटल युआनचा वापर करता येईल, असे सांगण्यात आले आहे.

चीनकडून 2014 सालापासून ‘डिजिटल युआन’चा चलन म्हणून वापर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एप्रिल महिन्यात चीनच्या मध्यवर्ती बँकेच्या वरिष्ट अधिकार्‍यांनी ‘डिजिटल युआन’चा वापर फक्त स्थानिक पातळीवरच करण्यात येणार असून, अमेरिकी डॉलरला आव्हान देण्याची कोणतीही योजना नसल्याचे स्पष्ट केले होते. त्याचवेळी 2022 साली चीनमध्ये येणार्‍या परदेशी पर्यटकांनाही त्याचा वापर करण्याची संधी देण्यात येईल, असेही संकेत दिले होते.चीनकडून डिजिटल युआनचा वापर वाढविण्याच्या हालचाली

जगातील दुसर्‍या क्रमाकांची अर्थव्यवस्था असणार्‍या चीनकडून ‘डिजिटल करन्सी’च्या क्षेत्रात आघाडी मिळविण्याच्या हालचाली सुरू आहेत. काही महिन्यांपूर्वी चीनने ‘युएई’ व थायलंड यासारख्या देशांबरोबरही डिजिटल करन्सीच्या वापराबाबत बोलणी सुरू केल्याचे समोर आले होते. इतर देशांबरोबर डिजिटल करन्सीचा वापर सुरू झाल्यास, आपल्या आर्थिक व तांत्रिक सामर्थ्याच्या बळावर चीन त्यात वर्चस्व मिळवू शकेल, असा विश्‍लेषकांचा दावा आहे.

काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक व्यवहाराची जबाबदारी सांभाळणार्‍या ‘बीआयएस’ने ‘डिजिटल करन्सी’बाबत एक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यात जगातील 55 मध्यवर्ती बँका ‘डिजिटल करन्सी’च्या योजनेवर काम करीत असल्याची माहिती देण्यात आली होती. यातील काही बँकांनी पुढील सहा वर्षात ‘डिजिटल करन्सी’चा व्यापक प्रमाणात वापर सुरू होईल, असे संकेतही दिले होते. या पार्श्‍वभूमीवर चीनकडून ‘डिजिटल युआन’संदर्भात सुरू असणार्‍या हालचाली लक्ष वेधून घेणार्‍या ठरतात.

leave a reply