एलएसीवरील चर्चेच्या अपयशाला चीनच्या एकतर्फी कारवाया जबाबदार

- भारतीय लष्कराचा आरोप

नवी दिल्ली – लडाखच्या एलएसीवर भारत व चीनच्या लष्करामध्ये पार पडलेली चर्चा अपयशी ठरली. चीन एकतर्फी कारवायांद्वारे इथली यथास्थिती बदलण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप करून भारतीय लष्कराने या चर्चेच्या अपयशाला चीनच जबाबदार असल्याचे दावे केले. तर भारत एलएसीवरील हा वाद सोडविण्यासाठी करीत असलेल्या मागण्या अवास्तव असल्याचे सांगून या चर्चेच्या अपयशाचे खापर चीनच्या लष्कराने भारतावर फोडले आहे. सदर चर्चेनंतर चीनच्या सरकारी मुखपत्राने भारताला पुन्हा एकदा युद्धाची धमकी दिली.

एलएसीवरील चर्चेच्या अपयशाला चीनच्या एकतर्फी कारवाया जबाबदार - भारतीय लष्कराचा आरोपरविवारी भारत आणि चीनच्या लष्करी अधिकार्‍यांची लडाखच्या एलएसीवर चर्चा पार पडली. या चर्चेत भारताने लडाखच्या सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी रचनात्मक उपाययोजना सुचविल्या होत्या. पण चीनच्या लष्कराने त्याला नकार दिला. या क्षेत्रात चीन एकतर्फी बदल घडविण्याचा प्रयत्न करीत आहे. ही बाब लडाखच्या एलएसीवरील तणवामागे असलेली मूळ समस्या ठरते, असे सांगून भारतीय लष्कराने या अपयशी ठरलेल्या चर्चेची माहिती दिली. तसेच पुढच्या काळातही इथला तणाव कमी करण्यासाठी चर्चा करीत राहण्यावर दोन्ही देशांच्या लष्कराचे एकमत झाले आहे, असे भारतीय लष्कराने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

भारतीय लष्कर हे दावे करीत असताना, चीनच्या लष्कराने मात्र भारताच्या अवास्तव मागण्यांमुळे ही चर्चा अपयशी ठरल्याचा ठपका ठेवला. त्याचवेळी लडाखच्या एलएसीवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी चीन मात्र प्रमाणिक प्रयत्न करीत असल्याचा दावा चिनी लष्कराने केला आहे. अशारितीने परिस्थितीचा चुकीचा अंदाज घेऊन हटवादी भूमिका स्वीकारण्यापेक्षा भारताने आत्तापर्यंत एलएसीवर शांतता प्रस्थापित करण्याच्या आघाडीवर मिळालेल्या यशावर समाधान व्यक्त करावे, असे चिनी लष्कराचे कर्नल लॉंग शाओहुआ यांनी म्हटले आहे.

याआधीही चीनच्या लष्कराने सीमावादाबाबत अशाच स्वरुपाची भूमिका स्वीकारली होती. भारत आणि चीनच्या सीमेवर संघर्ष होत नाही, ही भारतासाठी फार मोठी जमेची बाजू ठरते, असा तर्क चीनच्या लष्कराकडून केल्या जाणार्‍या या विधानांमागे आहे. दरम्यान, चीनचे सरकारी मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने भारताला युद्धाची धमक दिली आहे. लडाखच्या एलएसीवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत करीत असलेल्या अवास्तव मागण्या इथली परिस्थिती व भारताची ताकद यांच्याशी सुसंगत नाही, असे ग्लोबल टाईम्सने बजावले आहे.

लडाखच्या एलएसीवर भारताने युद्ध छेडलेच, तर त्यात भारताचा पराभव झाल्यावाचून राहणार नाही, अशी धमकी ग्लोबल टाईम्सने दिली. तसेच कोरोनाची साथ व अर्थव्यवस्थेसमोरील समस्या सोडविण्यात आलेल्या अपयशाकडून आपल्या जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी भारत चीनबरोबर सीमावाद छेडत असल्याचे दावे या मुखपत्राने ठोकले आहेत. मात्र भारतीय विश्‍लेषक चीनची कम्युनिस्ट राजवट आपल्या अंतर्गत आव्हानांवर मात करण्यासाठी इतर देशांबरोबर सीमावाद छेडत असल्याचा आरोप करीत आहेत. आंतरराष्ट्रीय विश्‍लेषकांनीही चीनसमोरील आर्थिक व सामाजिक समस्या वाढल्यानंतर, या देशाच्या आक्रमकतेत वाढ होते, याची नोंद केलेली आहे. केवळ भारतच नाही तर तैवान, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेलाही या चिनी मुखपत्राकडून युद्धाचे इशारे दिले जात आहेत. त्याचवेळी चीनला अन्नटंचाई, वीजटंचाई आणि महापूरासारख्या भीषण समस्यांचा सामना करावा लागत आहे. इतकेच नाही तर या देशात पुन्हा एकदा कोरोनाची जबरदस्त साथ थैमान घालत असून यामुळे काही शहरे लॉकडाऊन करावी लागली आहेत. मात्र याच्या बातम्या जगासमोर येऊ नये, यासाठी चीनच्या राजवटीने कठोर धोरणे राबविली आहेत.

leave a reply