दलाई लामा यांच्या वाढदिवसाने चीन अस्वस्थ

- एलएसीवर चिनी जवानांनी निषेध नोंदविला

नवी दिल्ली – भारताच्या पंतप्रधानांनी बौद्ध धर्मगुरू व तिबेटी नेते दलाई लामा यांना फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. भारतीय माध्यमांनी ही बातमी उचलून धरून याद्वारे भारत सरकारने चीनला संदेश दिल्याचे दावे केले होते. चीनच्या सरकारी मुखपत्राने भारताच्या हलक्या डावपेचांचा चीनवर काहीच परिणाम होणार नाही, असे शेरे मारले होते. पण प्रत्यक्षात दलाई लामा यांच्या वाढदिवसाला भारतात व भारताच्या बाहेर मिळालेल्या महत्त्वामुळे चीन अस्वस्थ झाला आहे. म्हणूनच लडाखच्या एलएसीवरील डेमचोक येथी चीनच्या जवानांनी दलाई लामा यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी घुसखोरीचा प्रयत्न करून फलक प्रदर्शित केल्याच्या बातम्या आल्या आहेत.

दलाई लामा यांच्या वाढदिवसाने चीन अस्वस्थ - एलएसीवर चिनी जवानांनी निषेध नोंदविला6 जुलै रोजी ही घटना झाल्याची माहिती लष्करातील सूत्रांनी दिल्याचा दावा केला जातो. लडाखच्या एलएसीजवळील गावांमध्ये दलाई लामा यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. त्याला विरोध करण्यासाठी चिनी जवान पोस्टर्स व बॅनर्स घेऊन डेमचोकपर्यंत पोहोचले होते. त्यांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. पाच वाहनांमधून डेमचोकच्या हद्दीजवळ आलेल्या या चिनी जवानांनी जवळपास अर्धा तास इथे पोस्टर्स व बॅनर्स प्रदर्शित केले आणि त्यानंतर ते माघारी फिरले, असा दावा केला जातो.

याच्या पलिकडे चिनी जवानांनी विशेष हरकती केल्या नाहीत. मात्र दलाई लामा यांच्या वाढदिवसाला भारतात मिळत असलेले महत्त्व चीनला सहन झालेले नाही, हे यामुळे पुन्हा एकदा उघड झाले आहे. दलाई लामा तिबेटी जनतेच्या आकांक्षा आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडणारे नेते असून चीनच्या तिबेटवरील अत्याचारांना दलाई लामा यांनी नेहमीच वाचा फोडली होती. यामुळे दलाई लामा यांना जगभरात मिळणारे महत्त्व चीनला खुपत आले आहे. दलाई लामा यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळणारा आदर व त्यांना दिले जाणारे सन्मान हा चीनविरोधी कटाचा भाग असल्याचे आरोप चीनमधून सातत्याने केले जातात.

भारताच्या पंतप्रधानांनी दलाई लामा यांच्या 86 व्या वाढदिवशी फोनवरून त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनीही दलाई लामा यांच्याशी चर्चा करून त्यांना शुभेच्छा दिल्या, ही बाब चीनला अधिकच खटकली होती. भारत व अमेरिका आता तिबेटचे कार्ड वापरून आपल्याला अडचणीत आणण्याचा डाव खेळत असल्याची चिंता चीनला वाटू लागली आहे. लडाखच्या एलएसीजवळील तैनाती वाढवून चीन भारताच्या सुरक्षेला आव्हान देत असताना, भारतान तिबेटचा मुद्दा उपस्थित करावा आणि चीनवरील दडपण वाढवावे, अशी मागणी सामरिक विश्‍लेषक करीत आहेत. तिबेटचा प्रश्‍न आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित करण्याची नामी संधी भारतासमोर असल्याचा दावा या विश्‍लेषकांनी केला आहे.

धरमशाला येथील तिबेटींचे निर्वासित सरकार देखील भारताकडे तसा आग्रह धरीत आहे. भारताला चीनची सीमा भीडलेली नसून तिबेट हा भारत व चीनच्या मध्ये असलेला देश आहे. यापुढच्या काळात भारत सरकारने भारत-चीन सीमा असा उल्लेख न करता, भारत-तिबेट सीमा अशारितीने एलएसीचा उल्लेख करावा, अशी मागणी तिबेटींचे भारतातील नेते करीत आहेत.

leave a reply