पाश्‍चात्यांनी लादलेल्या निर्बंधांविरोधात चीनकडून ‘वुल्फ वॉरिअर डिप्लोमसी’चा वापर – विश्‍लेषकांचा दावा

बीजिंग – काही आठवड्यांपूर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या देशाची प्रेमळ व विनम्र देश अशी प्रतिमा उभी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले होते. मात्र या आवाहनानंतर काही दिवसातच चीनच्या संसदेत पाश्‍चात्य देशांकडून लादण्यात येणार्‍या निर्बंधांना प्रत्युत्तर देणारा कायदा संमत करण्यात आला. हा कायदा म्हणजे चीनच्या ‘वुल्फ वॉरिअर डिप्लोमसी’चा भाग आहे, असा दावा विश्‍लेषक जिआन्ली यांग यांनी केला आहे.

गेल्या काही वर्षात चीनच्या कम्युनिस्ट राजवटीकडून जगभरात वर्चस्ववादी कारवायांना वेग देण्यात आला आहे. त्यात गेल्या वर्षी जगभरात फैलावलेली कोरोनाची साथ व उघुरवंशियांवरील अत्याचारांची भर पडली आहे. या प्रकरणांमुळे आंतरराष्ट्रीय समुदायात तीव्र असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. चीनची आक्रमकता व विस्तारवादी धोरणांविरोधात पाश्‍चात्य देशांनी पावले उचलण्यास सुरुवात केली असून त्यात चीनविरोधातील व्यापक निर्बंधांचा समावेश आहे.

पाश्‍चात्यांकडून लादण्यात येणार्‍या निर्बंधांमुळे चीनची राजवट अस्वस्थ झाली असून त्याला आक्रमक प्रत्युत्तर देण्याची मागणी जोर धरत असल्याचे सांगण्यात येते. ‘जी७’च्या बैठकीपूर्वी चीनच्या संसदेने घाईत मंजूर केलेला ‘लॉ ऑन काऊंटरिंग फॉरेन सँक्शन्स’ त्याचाच भाग ठरला आहे. ‘जी७’ व त्यानंतर झालेल्या नाटो बैठकीच्या माध्यमातून अमेरिकेच्या पुढाकाराने निर्बंध लादले जाण्याची भीती असल्यानेच चीनने घाईघाईत कायदा मंजूर केल्याचा दावा विश्‍लेषकांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी, कम्युनिस्ट पार्टीचे नेते व राजनैतिक अधिकार्‍यांना उद्देशून केलेल्या वक्तव्यात, चीनची प्रतिमा बदलण्याची गरज असल्याचे सुचविले होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनविषयी तिरस्काराची भावना असून, निर्दयी देश अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. ही प्रतिमा बदलून चीनने अधिकाधिक मित्र बनवायला हवेत, असे जिनपिंग यांनी म्हटले होते. मात्र जिनपिंग यांचे हे वक्तव्य म्हणजे पोकळ बुडबुडा असल्याचे संसदेने मंजूर केलेल्या कायद्यातून दिसून येते, असा सूर विश्‍लेषक जिआन्ली यांग यांनी आपल्या लेखात व्यक्त केला आहे.

राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनीच चीनच्या राजकीय वर्तुळात ‘वुल्फ वॉरिअर डिप्लोमसी’ची सुरुवात केली होती, याकडे यांग यांनी लक्ष वेधले. गेल्या काही वर्षात चीनचे परदेशातील राजदूत, वरिष्ठ राजनैतिक अधिकारी व नेते अत्यंत आक्रमक भाषेचा वापर करीत आहेत. पाश्‍चात्य देशांसह इतर कोणत्याही देशाने चीनविरोधात निर्णय घेतल्यास त्यावर आक्रमक शब्दात टीकास्त्र सोडून धमकावले जात आहे. यामागे जिनपिंग यांची आग्रही भूमिकाच कारणीभूत आहे. चीनकडे आता इतरांना प्रत्युत्तर देण्याची ताकद आहे, असा समज राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनीच करून दिला असल्याचे यांग यांनी म्हटले आहे. जिनपिंग यांनी आपली पकड घट्ट करण्यासाठी व अपयश लपविण्यासाठी चीनच्या जनतेत प्रखर राष्ट्रवादाला उत्तेजन देण्याचे प्रयत्न केले व ‘वुल्फ वॉरिअर डिप्लोमसी’चे मूळ त्यातच असल्याचा दावा यांग यांनी लेखात केला आहे.

‘वुल्फ वॉरिअर डिप्लोमसी’ शब्दाचा वापर चीनमध्ये २०१५ साली प्रदर्शित झालेल्या ‘वुल्फ वॉरिअर’ या चित्रपटानंतर सुरू झाल्याचे सांगण्यात येते. या चित्रपटात चीनच्या लष्कराचे एक पथक परदेशी हस्तकांच्या ताब्यात असलेल्या ‘ड्रग माफिया’ला ताब्यात घेण्यासाठी संघर्ष करते, असे दाखविण्यात आले आहे.

leave a reply