‘लोकशाहीवादी तैवान’वरून चीनचा जपानला इशारा

टोकिओ/बीजिंग – तैवानच्या मुद्यावरुन जपान अधिकाधिक व्यापक भूमिका स्वीकारू लागला आहे. गेल्या आठवड्यात जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी तैवानची सुरक्षा आपल्या देशाच्या सुरक्षेशी जोडलेली असल्याचे म्हटले होते. तर आत्ता जपानच्या उपसंरक्षणमंत्र्यांनी तैवान हा लोकशाही असलेला ‘देश’ असल्याचे सांगून इतर लोकशाहीवादी देशांनी तैवानच्या सुरक्षेसाठी जागे होण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन केले. तैवानचा लोकशाही देश म्हणून जपानने केलेला उल्लेख चीनला चांगलाच झोंबला आहे. तसे करून जपानने गंभीर चूक केली, असा इशारा चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिला.

लोकशाहीवादीदोन दिवसांपूर्वी चीन आणि रशियाकडून फ्रेंडशिप ट्रिटीच्या विस्ताराची घोषणा झाली. पाश्चात्य देशांच्या वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर, सदर सहकार्याच्या विस्ताराची आवश्यकता असल्याचे उभय देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी म्हटले होते. जपानचे उपसंरक्षणमंत्री योशिहिदे नाकायामा यांनी हडसन इन्स्टिट्युट या अमेरिकन अभ्यासगटाच्या व्हर्च्युअल बैठकीत बोलताना, चीन आणि रशियातील या सहकार्यावर टीका केली. विशेषत: 1970च्या दशकापासून तैवानच्या लोकशाहीला समर्थन देण्यापेक्षा, चीनच्या ‘वन चायना’ धोरणाला पाठिंबा देणार्‍या अमेरिका तसेच जपानच्या निर्णयावर नाकायामा यांनी प्रश्न उपस्थित केले.

लोकशाहीवादी‘‘‘वन चायना’ धोरणाला पाठिंबा देणारे नेते आपल्या ह्या निर्णयासाठी येणार्‍या पिढ्यांसमोर उत्तरदायी ठरतील. लोकशाहीवादी देशांना परस्परांची सुरक्षा करावी लागेल व तैवान ही लोकशाही देशांसाठी ‘रेड लाईन’ असली पाहिजे. लोकशाही देश तैवानच्या सुरक्षेसाठी इतर देशांनी जागे होण्याची आवश्यकता आहे’’, असे नाकायामा यांनी बजावले. त्याचबरोबर ‘जपान आणि तैवान भौगोलिकदृष्ट्या निकटतम देश असून तैवानची सुरक्षा धोक्यात आल्यास त्याचा थेट परिणाम जपानच्या ओकिनावा बेटाच्या सुरक्षेवर होईल. यामुळे ओकिनावा बेटावरील अमेरिकी जवान आणि त्यांच्या परिवाराची सुरक्षा धोक्यात येईल’, याची आठवण नाकायामा यांनी करुन दिली.

जपानचे संरक्षणमंत्री नोबुआ किशी यांच्याप्रमाणे नाकायामा देखील तैवानचे मोठे समर्थक मानले जातात. तर काही आठवड्यांपूर्वी नाकायामा यांनी भारतातील तिबेटी सरकारचे पंतप्रधान लॉबसंग संगेय यांच्याशीही चर्चा केली होती. याशिवाय गेल्या वर्षी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या जपान भेटीलाही नाकायामा यांनी विरोध केला होता.

दरम्यान, जपानचे उपसंरक्षणमंत्री नाकायामा यांनी तैवानचा ‘लोकशाही देश’ म्हणून उल्लेख केल्यानंतर चीनने त्यावर ताशेरे ओढले. तैवान हा चीनचा सार्वभौम भूभाग असून जपानच्या उपसंरक्षणमंत्र्यांनी केलेली विधाने साफ चुकीची आणि चीनच्या वन चायना धोरणाचे गंभीर उल्लंघन करणारी असल्याची टीका चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली.

leave a reply