कोरोनाच्या तपासाला सहकार्य न केल्यास चीन आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाकी पडेल

- अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचा इशारा

वॉशिंग्टन – कोरोनाच्या उगमस्थानाबाबतच्या तपासाला सहकार्य करण्याचे चीनने नाकारले, तर चीनची आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाकी पडेल, असा इशारा अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी दिला आहे. याआधी जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाच्या तपासाला चीनने पुरेसे सहकार्य केले नव्हते. त्यामुळे हा तपास अर्धवट राहिला, अशी तक्रार होत आहे. याबाबतच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालावर गंभीर प्रश्‍न उपस्थित होऊ लागल्यानंतर कोरोनाच्या उगमाचा नव्याने तपास करण्याची मागणी होत असून त्यासाठी चीनने संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन जगभरातील प्रमुख देश करीत आहेत. मात्र चीनने या तपासाला विरोध केला असून त्याच्याशी सहकार्य न करण्याचे संकेत दिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवन यांनी चीनला हा इशारा दिल्याचे दिसते.

‘जर कोरोनाबाबतच्या तपासाला चीनने सहकार्य केले नाही, तर चीन आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाकी पडल्यावाचून राहणार नाही. ही अमेरिकेने चीनला दिलेली धमकी अथवा इशारा नाही. मात्र कोरोनाच्या तपासाला चीनकडून देण्यात येणारा नकार अमेरिका अजिबात खपवून घेणार नाही. चीने या तपासासाठी पूर्ण सहकार्य करावे अथवा आंतराष्ट्रीय पातळीवर स्वतःची कोंडी करून घेण्याची तयारी ठेवावी, असे दोन पर्याय चीनसमोर आहेत. यासाठी अमेरिका आपल्या सहकारी व भागीदार देशांबरोबर चीनवर दडपण टाकून याचा पाठपुरावा करीत राहिल’, असा इशारा जॅक सुलिवन यांनी दिला. अमेरिकन वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुलिवन यांनी दिलेला हा इशारा बायडेन प्रशासनाची चीनबाबतची भूमिका बदलू लागल्याचे संकेत देत आहे.

नुकत्याच लंडनमध्ये पार पडलेल्या जी७ परिषदेत कोरोनाच्या उगमाचा तपास करण्याची मागणी प्रमुख देशांनी केली होती. तसेच यासाठी चीन आवश्यक प्रमाणात सहकार्य करीत नाही, याचीही गंभीर दखल या परिषदेत सहभागी झालेल्या देशांनी घेतली होती. या परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी चीनच्या विरोधात कठोर भूमिका स्वीकारली होती. तसेच प्रमुख देशांना चीनच्या विरोधात एकत्र येण्याचे आवाहन करून त्यांनी चीनवरील दडपण वाढविले होते, याकडे सुलिवन यांनी लक्ष वेधले. यासाठी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची सुलिवन यांनी प्रशंसा केली आहे.

दरम्यान, कोरोनाचा विषाणू नैसर्गिक असून तो मानवनिर्मित नाही, असे दावे ठोकणारे संशोधक आता अडचणीत सापडले आहेत. कोरोनाचा विषाणू प्रयोगशाळेतच तयार करण्यात आला, असा निष्कर्ष नोंदविणार्‍या काही जबाबदार मंडळींची खिल्ली उडविण्याचे काम या संशोधकांनी केले होते. यातील काहीजणांनी आपले सोशल मीडियावरील अकाऊंट बंद करून टाकल्याच्या बातम्या वृत्तवाहिन्या देत आहेत. कोरोनाची साथ जाणीवपूर्वक पसरविण्यात आली व त्यामागे चीनचे कारस्थान होते, या दाव्याला आता आंतरराष्ट्रीय पातळीवर दुजोरा मिळू लागला आहे. याचा प्रभाव इतर देशांबरोबरच अमेरिकेच्या प्रशासनावरही पडत असून अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी चीनला दिलेला इशारा याचे संकेत देत आहे.

leave a reply