चीन येत्या दशकभरात अण्वस्त्रांची संख्या दुप्पट करणार

- अमेरिकेच्या संरक्षण विभागाचा इशारा

वॉशिंग्टन – अमेरिका व रशियाप्रमाणे ‘न्यूक्लिअर ट्रायड’ क्षमता मिळविण्यासाठी चीन जोरदार हालचाली करीत असून येत्या दशकभरात चीनकडील अण्वस्त्रांचा साठा दुपटीहून अधिक वाढलेला असेल, असा इशारा अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिला आहे. अण्वस्त्रांची संख्या मर्यादित करण्यासंदर्भातील करारात रशियाबरोबर चीननेही सहभागी व्हावे यासाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अमेरिका व रशियाच्या तुलनेत आपल्याकडील अण्वस्त्रांची संख्या खूपच कमी असल्याने या करारासाठी आपल्यावर दबाव टाकला जाऊ नये, असे प्रत्युत्तर चीनकडून देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या संरक्षण विभागाचा अहवाल लक्ष वेधून घेणारा ठरतो.

अण्वस्त्रांची संख्या

अमेरिकेच्या संरक्षण विभागाने नुकताच ‘मिलिटरी अँड सिक्युरिटी डेव्हलपमेंट इन्व्हॉल्व्हिंग द पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना २०२०’ नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. अमेरिकी संसदेला सादर केलेल्या या अहवालात, गेल्या २० वर्षात चीनने संरक्षणक्षेत्रात केलेली प्रगती, त्यांच्या योजना व भविष्यातील महत्त्वाकांक्षा यांचा उल्लेख करण्यात आला आहे. यात ‘न्यूक्लिअर डिटरन्स’साठी चीनकडून चालू असलेल्या हालचालींकडे लक्ष वेधण्यात आले आहे. चीनकडे सध्या २०० अण्वस्त्रे असल्याचे मानले जात असून, संरक्षणदलांच्या आधुनिकीकरणाचा वेग पाहता येत्या दशकभरात ही संख्या दुपटीहून अधिक झालेली असेल, असा इशारा अमेरिकेच्या संरक्षणविभागाने दिला आहे.

 

अण्वस्त्रांची संख्याअण्वस्त्रांच्या संख्येबाबत इशारा देतानाच चीन ‘एअर लॉन्चड् न्यूक्लियर बॅलिस्टिक मिसाईल’ विकसित करीत असल्याची माहिती ही अहवालात देण्यात आली आहे. त्याचवेळी चीनकडे सध्या अमेरिकेला लक्ष्य करू शकतील, अशी किमान १०० आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे असून, येत्या पाच वर्षांत त्याची संख्या २०० वर जाईल, असेही बजावण्यात आले आहे.

गेले काही महिने अमेरिका व रशिया या दोन्ही देशांमध्ये नव्या अण्वस्त्रांची संख्या मर्यादित ठेवण्याबाबतच्या ‘स्टार्ट’ (स्ट्रॅटेजिक आर्म्स रिडक्शन ट्रिटी) करारावर चर्चा सुरू आहे. या ऐतिहासिक करारात चीनला सहभागी करून घेण्यावरही दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये विचारविनिमय झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र अमेरिका व रशियाने सर्वात आधी आपल्या अण्वस्त्रांची संख्या कमी करावी आणि मगच इतर देशांना त्याबाबत सल्ला द्यावा, असा टोला चीनने लगावला होता. तर, आपल्या संरक्षणसज्जतेबाबत चीन खरी माहिती उघड करीत नसून चीनकडे घोषित संख्येपेक्षा अधिक अण्वस्त्रे असल्याचा दाट संशय अमेरिकेने व्यक्त केला होता.

ही चर्चा सुरू असतानाच काही महिन्यांपूर्वी, अमेरिकेच्या सामरिक महत्त्वाकांक्षा रोखण्यासाठी चीनने किमान हजार अण्वस्त्रांसह सज्ज रहावे, असा सल्ला ‘ग्लोबल टाईम्स’ या चिनी दैनिकाने दिला होता. तर एप्रिल महिन्यात अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या अहवालात, चीनने गुप्तपणे आण्विक चाचण्या केल्याचे नमूद करण्यात आले होते. यासंदर्भातील माहिती दडविल्याने अमेरिकेने चीनच्या हेतूंवर संशयही उपस्थित केला होता.

leave a reply