चीनने ऑस्ट्रेलियाविरोधात घेतलेले निर्णय सूडभावनेचा भाग

- ऑस्ट्रेलियन राजदूतांचा आरोप

कॅनबेरा/बीजिंग – चीनकडून ऑस्ट्रेलियन उत्पादनांवर लादण्यात येणार निर्बंध व यासंदर्भातील मोहीम चीनच्या सूडभावनेचा भाग आहेत, असा घणाघाती आरोप ऑस्ट्रेलियाचे चीनमधील राजदूत ग्रॅहम फ्लेचर यांनी केला. ऑस्ट्रेलिया व्यापारी भागीदार म्हणून चीनवर विश्‍वास ठेवू शकणार नाही, हे चीनच्या निर्णयांमधून उघड झाले आहे, अशा शब्दात राजदूत फ्लेचर यांनी चीनला फटकारले. गेल्या वर्षभरात चीनने ऑस्ट्रेलियातून आयात होणार्‍या बार्ली, कोळसा, लाकूड यासह अनेक उत्पादनांवर निर्बंध लादले आहेत. काही दिवसांपूर्वी, चीनने ऑस्टे्रलियाबरोबरील महत्त्वपूर्ण आर्थिक कराराच्या चर्चेला अनिश्‍चित काळासाठी स्थगिती देत असल्याचे जाहीर केले होते. या पार्श्‍वभूमीवर राजदूत फ्लेचर यांनी केलेले आरोप ऑस्ट्रेलियाच्या आक्रमक भूमिकेचे संकेत देत आहेत.

चीनने ऑस्ट्रेलियाविरोधात घेतलेले निर्णय सूडभावनेचा भाग - ऑस्ट्रेलियन राजदूतांचा आरोप‘ऑस्ट्रेलिया-चायना बिझनेस कौन्सिल’च्या एका कार्यक्रमात राजदूत फ्लेचर यांनी, चीनने लादलेल्या व्यापारयुद्धाच्या मुद्यावर आपली भूमिका मांडली. ‘चीनने घेतलेल्या निर्णयांमुळे ऑस्ट्रेलियासह आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनची किती हानी होत आहे, याची त्यांना जाणीव झालेली नाही. शिक्षा करीत असल्याप्रमाणे चीनने एकापाठोपाठ लादलेल्या निर्बंधांनंतर ऑस्ट्रेलियाला अनेक देशांकडून सहानुभूती व सहकार्याचे संदेश आले आहेत. त्याचवेळी जागतिक समुदायाचा चीनकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिकाधिक कठोर होत चालल्याचे दिसत आहे’, असे ऑस्ट्रेलियन राजदूत म्हणाले.

यावेळी फ्लेचर यांनी, ऑस्ट्रेलियन उद्योजकांना सावधगिरीचा इशाराही दिला. ‘पुढील काळात चीनची राजवट ऑस्ट्रेलियाला योग्य संदेश देण्यासाठी नवी पावले उचलू शकते. केवळ या कारणामुळे चीनच्या बाजारपेठेवर अवलंबून असणारे ऑस्ट्रेलियन उद्योजक ही बाजारपेठ गमावू शकतात’, असे चीनमधील ऑस्ट्रेलियन राजदूतांनी बजावले. दोन आठवड्यांपूर्वी, चीनने ऑस्ट्रेलियाकडून आयात होणार्‍या नैसर्गिक इंधनवायूचे प्रमाण कमी करण्याचा निर्णय घेतला असून त्याऐवजी मध्य आशियातील तुर्कमेनिस्तानकडून आयात वाढविण्याचे जाहीर केले होते. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियातून सर्वाधिक आयात होणार्‍या कच्च्या लोखंडासाठीही चीनने नव्या पर्यायांची चाचपणी सुरू केल्याचे वृत्त समोर आल आहे.चीनने ऑस्ट्रेलियाविरोधात घेतलेले निर्णय सूडभावनेचा भाग - ऑस्ट्रेलियन राजदूतांचा आरोप

चीनकडून सध्या आवश्यक लोखंडापैकी जवळपास 80 टक्के लोखंड आयात करण्यात येते. एकूण आयातीपैकी तब्बल 60 टक्के आयात ऑस्ट्रेलियातून होते. ऑस्ट्रेलियातून आयात होणार्‍या लोखंडाचा दर्जा चांगला असून त्याला पर्याय शोधणे चीनला अजूनही शक्य झालेले नाही. मात्र पुढील काळात मंगोलिया, रशिया, मध्य आशियाई देश, आफ्रिका व लॅटिन अमेरिकेतून लोखंडाची आयात वाढविण्यासाठी चीनने प्रयत्न सुरू केले आहेत.

चीन हा ऑस्ट्रेलियाचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश म्हणून ओळखण्यात येतो. 2019 साली ऑस्ट्रेलियाच्या एकूण व्यापारात चीनचा वाटा तब्बल 29 टक्के इतका होता. यामागे दोन देशांमध्ये 2015 साली झालेला व्यापारी करार व चीनकडून सुरू असलेले प्रयत्न कारणीभूत ठरले होते. याच काळात चीनकडून ऑस्ट्रेलियाच्या विविध क्षेत्रांमध्ये प्रभाव वाढविण्यात आला असून त्या जोरावर हस्तक्षेपही सुरू झाला आहे. हा हस्तक्षेप रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन व सरकारने आक्रमक निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे.चीनने ऑस्ट्रेलियाविरोधात घेतलेले निर्णय सूडभावनेचा भाग - ऑस्ट्रेलियन राजदूतांचा आरोप

ऑस्ट्रेलियाच्या संसदेत चीनविरोधात अनेक विधेयके मंजूर करण्यात आली असून त्यात चीनकडून असलेल्या धोक्यांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. मॉरिसन सरकारकडून सुरू असणार्‍या या कारवाईमुळे चीन प्रचंड अस्वस्थ झाला असून आपल्या आर्थिक व व्यापारी ताकदीचा वापर करून ऑस्ट्रेलियावर दडपण टाकण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षात ऑस्ट्रेलिया व चीनमधील संबंध चिघळण्यास सुरुवात झाली असून चीनचे नवे प्रयत्न त्याचाच भाग असल्याचे दिसत आहे.

leave a reply