नव्या धक्क्यांमुळे चीनची अर्थव्यवस्था मंदावण्याचे संकेत

बीजिंग – कोरोना साथीच्या काळात आर्थिक विकासदर नोंदविलेली एकमेव प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून मिरविणार्‍या चीनला नवे धक्के बसू लागले आहेत. गेल्या काही महिन्यात चीनमधील डिफॉल्टर कंपन्यांचे प्रमाण वाढत असून काही कंपन्या दिवाळखोर घोषित होऊ शकतात, असे संकेत मिळाले आहेत. त्याचवेळी जगभरात कच्च्या मालाच्या किंमतींमध्ये वाढ होत असल्याने चीनमधील कंपन्यांची नफ्याची टक्केवारी घसरत चालली आहे. त्याचवेळी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या धोरणांमुळे चीनमधील आर्थिक चमत्काराचे दिवस संपुष्टात आले, असा दावा ‘फोर्ब्स’ या अमेरिकी वेबसाईटवरील लेखात करण्यात आला आहे.

नव्या धक्क्यांमुळे चीनची अर्थव्यवस्था मंदावण्याचे संकेतकोरोनाने जगभरात उडविलेल्या हाहाकाराची व्याप्ती अद्यापही कमी झालेली नाही. या जागतिक साथीमुळे गेल्या वर्षी अनेक आघाडीच्या अर्थव्यवस्थांना मोठा फटका बसला होता. अमेरिका व युरोपिय देशांसह अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांनी नकारात्मक विकासदर नोंदविला होता. त्याचवेळी चीनने मात्र आपल्या अर्थव्यवस्थेने दोन टक्क्यांहून अधिक गतीने प्रगती केल्याची माहिती दिली होती. मात्र चीनचे हे प्रगतीचे चित्र फसवे व तकलादू असल्याचे गेल्या काही महिन्यातील घटनांवरून सिद्ध होत आहे.

या वर्षाच्या सुरुवातीलाच, चीनमधील कर्जाचा बोजा प्रचंड प्रमाणात वाढत असून खाजगी क्षेत्राची पतही घसरत असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने बजावले होते. तरीही कर्जाचा बोजा व त्याच्याशी निगडीत धोके कमी करण्यासाठी चीनच्या राजवटीने कोणतीही पावले उचलली नाहीत. 2021 सालच्या पहिल्या चार महिन्यातच चिनी कंपन्यांकडून कर्जाची परतफेड न करण्याचे प्रमाण वाढल्याचे एका अहवालामुळे स्पष्ट झाले. ‘ब्लूमबर्ग’ने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या चार महिन्यात चिनी कंपन्यांनी तब्बल 18 अब्ज डॉलर्सच्या कर्जाची परफेड केलेली नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण जवळपास 70 टक्क्यांनी वाढल्याचे सांगण्यात आले आहे.

एप्रिल महिन्यात चीनमधील औद्योगिक उत्पादन 4.1 टक्क्यांनी घसरले आहे. मार्चमध्ये उत्पादन वाढीचा दर 14.1 टक्के होता. मात्र एप्रिलमध्ये तो 9.8 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. चीनच्या रिटेल क्षेत्रातील विक्रीतही जबरदस्त घसरण झाली आहे. मार्चमध्ये 34 टक्क्यांवर असणारे रिटेल सेल्स एप्रिल महिन्यात 17.7 टक्क्यांपर्यंत खाली आले आहेत. चीनच्या औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांच्या नफ्यातही लक्षणीय घट नोंदविण्यात आली आहे.

मार्च महिन्यात औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना मिळणारे नफ्याचे प्रमाण 92 टक्क्यांहून अधिक होते. एप्रिलमध्ये त्यात 57 टक्क्यांपर्यंत घसरण नोंदविण्यात आली. औद्योगिक क्षेत्रातील घसरणीमागे कच्च्या मालाच्या किंमतीमध्ये झालेली वाढ कारणीभूत असल्याचे सांगण्यात येेते. पोलाद व तांबे यासारख्या प्रमुख धातूंच्या किंमतींमध्ये 50 टक्के वाढ झाली आहे.

नव्या धक्क्यांमुळे चीनची अर्थव्यवस्था मंदावण्याचे संकेतदरम्यान, चीनच्या अर्थव्यवस्थेतील चमत्काराचे दिवस संपले असून त्यासाठी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची धोरणे कारणीभूत असल्याचा दावा ‘फोर्ब्स’ या अमेरिकी वेबसाईटवरील लेखात करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षात जिनपिंग यांच्याकडून अर्थव्यवस्थेवरील पकड अधिक घट्ट करण्याचे प्रयत्न सुरू असून हे प्रयत्न भविष्यातील विकासाची गती कमी करणारे आहेत, असे मायकल शुमन या विश्‍लेषकांनी म्हटले आहे.

जिनपिंग यांनी चीनची सत्तासूत्रे स्वीकारल्यानंतर खाजगी क्षेत्राऐवजी सरकारी कंपन्यांना होणारे कर्जवाटप वाढल्याचा दावा निकोलस लार्डी या विश्‍लेषकांनी केला. या कंपन्या राजकीय धोरणांना अधिक महत्त्व देणार्‍या असल्याने अर्थव्यवस्थेची कार्यक्षमता व मनुष्यबळाची उत्पादनक्षमता घटल्याची जाणीवही लार्डी यांनी करून दिली.

उद्योजक जॅक मा व त्यांच्या कंपनीविरोधात झालेली कारवाई हे जिनपिंग व कम्युनिस्ट पार्टीच्या एकाधिकारशाहीचे ठळक उदाहरण असल्याकडेही लेखात लक्ष वेधण्यात आले आहे. चीनच्या राजवटीवर केलेल्या मामुली टीकेमुळे जॅक मा यांच्यावर कारवाई झाली होती. त्यानंतर ते कुठे आहेत, याचा बराच काळ पत्ता लागला नव्हता. मध्येच एखाद्या कार्यक्रमात उपस्थित राहून जॅक मा आपल्याविषयी निर्माण झालेले गूढ संपविण्याचा प्रयत्न करतात खरे. पण आधीच्या तुलनेत त्यांच्या वावरावर प्रचंड प्रमाणात निर्बंध आल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.

leave a reply