आफ्रिकेतील चीनच्या वाढत्या वर्चस्वाचा अमेरिकेला गंभीर धोका

- अमेरिकेच्या आफ्रिका कमांडचे प्रमुख

आफ्रिका कमांड

वॉशिंग्टन – चीनने अटलांटिक महासागर क्षेत्रातील आफ्रिकी देशांमध्ये लष्करी तळ प्रस्थापित करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. चीनची ही लष्करी हालचाल अमेरिकेला घेरणारी आहे. चीनपासून अमेरिकेच्या सुरक्षेला असलेला धोका पॅसिफिक महासागरातूनच नाही तर अटलांटिक महासागर क्षेत्रातूनही समोर येऊ शकतो, असा इशारा अमेरिकेच्या आफ्रिका कमांडचे प्रमुख जनरल स्टिफन टाऊनसेंड यांनी दिला. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेशी जनरल टाऊनसेंड बोलत होते.

जनरल टाऊनसेंड यांनी बायडेन प्रशासनाला आफ्रिकेकडे दुर्लक्ष करू नये, येथील चीनच्या गुंतवणुकीवर बारीक नजर ठेवावी, असे आवाहन गेल्या महिन्यातच केले होते. आफ्रिकेतील चीनची आर्थिक व लष्करी गुंतवणूक अमेरिकेसाठी धोकादायक बनल्याचे जनरल टाऊनसेंड यांनी बजावले होते. जिबौतीच्या व्यतिरिक्त पूर्वेकडील देशांमध्ये चीन आपले लष्करी व नौदल तळ उभारीत असल्याचे टाऊनसेंड यांनी लक्षात आणून दिले होते. सदर लष्करी व नौदल तळ आपले ‘फिफ्थ आयलँड चेन’ असल्याचे चीनने जाहीर केले होते, याकडेही जनरल टाऊनसेंड यांनी लक्ष वेधले होते.

आफ्रिका कमांडया ‘फिफ्थ आयलँड चेन’प्रमाणे आफ्रिकेच्या पश्‍चिमेकडील चीनची लष्करी हालचाल व त्यामुळे आफ्रिकी देशांमधील चीनचा वाढते वर्चस्व अमेरिकेसाठी धोक्याचे ठरू लागल्याचे जनरल टाऊनसेंड यांनी अधोरेखित केले. अटलांटिक महासागर क्षेत्राच्या कक्षेतील पश्‍चिम आफ्रिकी देशांमध्ये, चीन विमानवाहू युद्धनौका किंवा पाणबुडी तैनात होतील, असे नौदलतळ उभारण्यासाठी प्रयत्न करीत आहे. यासाठी चीनने मॉरिशियाना ते नामिबियापर्यंतच्या देशांशी चर्चा सुरू केल्याचा दावा जनरल टाऊनसेंड यांनी केला. असे झाले तर पॅसिफिक महासागरापासून ते अटलांटिक महासागरापर्यंत चीनच्या नौदलाचा प्रभाव विस्तारेल, असे जनरल टाऊनसेंड यांनी बजावले आहे.

‘आपल्या युद्धनौकांची दुरूस्ती, देखभाल आणि शस्त्रसज्जतेसाठी नौदलतळ वापरण्याचे कारण चीन पुढे करीत आहे. पण संघर्षाच्या काळात चीन या तळांचा लष्करी वापरही करू शकतो. चीनने अशाचप्रकारे जिबौतीमध्ये आपला नौदलतळ प्रस्थापित केला. आता आफ्रिकेच्या पश्‍चिम किनार्‍यावरील देशातही चीनला असेच तळ उभारायचे आहेत’, असे जनरल टाऊनसेंड म्हणाले. ‘आफ्रिकी देशांमध्ये आर्थिक आणि लष्करी गुंतवणूक वाढवून चीन डावपेचांमध्ये अमेरिकेवर मात करू पाहत आहे. बंदरनिर्मिती प्रकल्प, आर्थिक सवलती, पायाभूत सुविधा आणि वेगवेगळे करार-कंत्राटे यांच्या मार्फत चीन आफ्रिकेत खोलवर शिरकाव करीत आहे’, अशी चिंता अमेरिकेच्या आफ्रिका कमांडच्या प्रमुखांनी व्यक्त केली.

आफ्रिका कमांड‘चीनने आफ्रिकेच्या पूर्वेकडील टांझानियामध्ये लष्करी तळ उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्याच्या चर्चा सुरू होत्या. चीनचे तसे प्रयत्न सुरू असतील तर तो काही अमेरिकेच्या चिंतेचा विषय ठरत नाही. कारण टांझानियातील तळ हिंदी महासागर क्षेत्रात असेल. पण चीनने अटलांटिक क्षेत्रात तळ उभारला तर ते मात्र आपल्यासाठी चिंतेचे कारण ठरेल’, असे सांगून जनरल टाऊनसेंड यांनी हिंदी महासागर क्षेत्रातील चीनच्या तळाशी अमेरिकेचे घेणेदेणे नसल्याचे स्पष्ट केले.

चीनचा टांझानियातील तळ हा अमेरिकेच्या चिंतेचा विषय नसला तरी हिंदी महासागर क्षेत्राशी निगडीत असलेला चीनचा हा तळ भारताचे सुरक्षाविषयक हितसंबंध धोक्यात आणणारा ठरू शकतो.

चीन योजनाबद्धरित्या सागरी क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे. अमेरिकेसारख्या महासत्तेला थेट आव्हान न देता सावधपणे सागरी क्षेत्रातील आपला प्रभाव वाढविण्याच्या योजनेवर चीन गेल्या काही वर्षांपासून काम करीत आहे. पण आता मात्र चीनचे हे डावपेच जगासमोर आले असून जगभरातील प्रमुख देश चीनच्या विस्तारवादी धोरणांमुळे सावध झाले आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या आफ्रिका कमांडच्या प्रमुखांनी दिलेला इशारा चीनचे आव्हान अधिक गंभीर बनल्याचे दाखवून देत आहे.

leave a reply