अमेरिकन माध्यमांवरील चीनचा प्रभाव घातक ठरेल

- अमेरिकन स्तंभलेखक गॉर्डन चँग यांचा इशारा

वॉशिंग्टन – चीनवर एकाधिकारशाही गाजविणार्‍या कम्युनिस्ट पक्षाचा शंभरावा वर्धापनदिन नुकताच पार पडला. याला अमेरिकन माध्यमांनी दिलेली प्रसिद्धी, ही फार मोठ्या चिंतेची बाब ठरते, असा इशारा विख्यात अमेरिकी स्तंभलेखक गॉर्डन चँग यांनी दिला आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या चीनवरील हुकूमशाहीचे उद्दात्तीकरण करण्याचा हा प्रयत्न अत्यंत घातक ठरेल, असे सांगून चँग यांनी यामागे अमेरिकन माध्यमांंचे व्यावसायिक हेतू असल्याचा ठपका ठेवला. या आरोपांना दुजोरा देणारी माहिती अमेरिकेच्या न्याय विभागाने प्रसिद्ध केली. गेल्या सहा महिन्याच्या कालावधित चीनच्या कम्युनिस्ट राजवटीशी जोडलेल्या ‘चायना डेलि’ या वर्तमानपत्राने अमेरिकन माध्यमांना लक्षावधी डॉलर्सचा निधी पुरविल्याचा अहवाल अमेरिकेच्या न्याय विभागाने दिला आहे.

अमेरिकन माध्यमांवरील चीनचा प्रभाव घातक ठरेल - अमेरिकन स्तंभलेखक गॉर्डन चँग यांचा इशाराअमेरिकेसह पाश्‍चिमात्य माध्यामांवरील आपला प्रभाव वाढविण्यासाठी चीन नियोजनबद्ध प्रयत्न करीत असल्याचे याआधी उघड झाले होते. काही विश्‍लेषकांनी याबाबत सावधानतेचा इशारा दिला होता. विशेषतः पाश्‍चिमात्य माध्यमांसमोर खड्या ठाकलेल्या आर्थिक संकटाचा चीनने संधी म्हणून वापर करून पाश्‍चिमात्य माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू केली होती. याच कारणामुळे मानवाधिकारांचे हनन आणि जनतेच्या आकांक्षा पायदळी तुडविणार्‍या चीनच्या कम्युनिस्ट राजवटीविरोधात पाश्‍चिमात्य जगतातील माध्यमे मवाळ धोरण स्वीकारत आहेत. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेला 100 वर्षे झाल्यानंतर अमेरिकन माध्यमांमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या उद्दात्तीकरणाचा प्रयत्न झाला, असे सांगून स्तंभलेखक गॉर्डन चँग यांनी त्यावर खंत व्यक्त केली.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी चीनच्या शत्रूंना दिलेल्या इशार्‍यालाही अमेरिकन माध्यमांनी अवास्तव महत्त्व दिले. कम्युनिस्ट पक्षाच्या राजवटीबाबत यथोचित माहिती देण्याचे सोडून त्याचे विपर्यास्त चित्रण अमेरिकन माध्यमांनी केले, त्यामागे त्यांचे व्यावसायिक हेतू असल्याचा ठपका चँग यांनी केला. अमेरिकन माध्यमांचे चीनमध्ये व्यावसायिक हितसंबंध गुंतलेले आहेत, त्याच्या प्रभावामुळे हे घडत असल्याचा आरोप चँग यांनी केला. अमेरिकेच्या न्याय विभागाने दिलेल्या अहवालात चँग यांच्या आरोपांना दुजोरा देणारी माहिती नमूद करण्यात आली आहे. चीनच्या कम्युनिस्ट राजवटीकडून चालविला जाणार्‍या ‘चायना डेलि’ या वर्तमानपत्राद्वारे गेल्या सहा महिन्यात अमेरिकन वर्तमानपत्रे तसेच नियतकालिकांना लक्षावधी डॉलर्सचा निधी पुरविण्यात आल्याचे हा अहवाल सांगतो. हा निधी स्वीकारणार्‍यांच्या यादीत अमेरिकेतील अग्रगण्य वर्तमानपत्र तसेच मासिकांचा आणि इतर नियतकालिकांचा समावेश आहे.

यापैकी काही वर्तमानपत्र तसेच नियतकालिकांनी गेल्या काही महिन्यात भारताला लक्ष्य केल्याची बाब समोर आली होती. विशेषतः करोनाच्या दुसर्‍या लाटेने भारताची यंत्रणा कोलमडली, अशा स्वरुपाचे विपर्यास्त दावे करून या अमेरिकन वर्तमानपत्रांनी भारताची प्रतिमा मलिन करण्याचा शक्य तितका प्रयत्न केला होता. काश्मीरच्या प्रश्‍नावर व मानवाधिकारांच्या मुद्यावर सातत्याने या अमेरिकन वर्तमानपत्रांकडून भारताला लक्ष्य केले जात आहे. यामागे चीनचा प्रभाव असल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले असून त्यामुळे या अमेरिकन माध्यमांची विश्‍वासार्हता संपुष्टात आली आहे.

leave a reply