चीनच्या विमानवाहू युद्धनौकेचा साऊथ चायना सीमध्ये सराव

- फिलिपाईन्सची चीनवर टीका

बीजिंग/मनिला – चीनच्या नौदलातील ‘शँदॉंग’ या विमानवाहू युद्धनौकेने आपल्या विनाशिकांच्या ताफ्यासह साऊथ चायना सीमधील सराव केला. आपल्या सार्वभौमत्वाच्या सुरक्षेसाठी हा युद्धसराव केला असून यापुढेही असे सराव होत राहतील, अशी घोषणा चीनच्या नौदलाने केली. चिनी जहाजांच्या या सरावावर फिलिपाईन्सकडून प्रतिक्रिया आली आहे. फिलिपाईन्सच्या सागरी हद्दीतील चीनच्या नौदलाच्या हालचाली आपल्या सागरी सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचा आरोप फिलिपाईन्सने केला. तसेच आपले नौदलही आपली गस्त सुरू ठेवणार असल्याचे फिलिपाईन्सच्या परराष्ट्र मंत्रालयाने ठणकावले.

Advertisement

पिपल्स लिबरेशन आर्मीने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, साऊथ चायना सीमध्ये आयोजित सरावात शँदॉंग या युद्धनौकेने सहभाग घेतला होता. ‘सदर सराव चीनच्या वार्षिक कार्यक्रमाचा भाग आहे. देशाचे सार्वभौमत्व आणि सुरक्षेसंदर्भातील नौदलाची क्षमता तपासून पाहण्यासाठी हा सराव आयोजित करण्यात आला होता व सदर सराव पूर्णपणे कायदेशीर होता’, असा दावा चीनच्या नौदलाचे प्रवक्ते गाओ श्यूचेंग यांनी केला.

‘हा सराव साऊथ चायना सी क्षेत्रातील शांतता आणि स्थैर्य अबाधित राखण्यासाठी आवश्यक होता. आंतरराष्ट्रीय समुदयाने देखील याकडे तटस्थ व व्यवहार्य दृष्टीकोनातून पहावे. चीनचे नौदल यापुढेही असे सराव आयोजित करीत राहील’, असा इशारा गाओ यांनी दिला. गेल्या महिन्यातही चीनने ईस्ट व साऊथ चायना सीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सरावांचे आयोजन करणार असल्याची घोषणा केली होती. या सागरी क्षेत्रातील अमेरिकन नौदलाच्या हालचाली वाढल्या आहेत. अमेरिकी युद्धनौकांच्या येथील तैनातीमुळे अस्वस्थ झालेल्या चीनने, सदर सरावांचे आयोजन करून अमेरिकेला इशारा दिल्याचा दावा चिनी व आंतरराष्ट्रीय माध्यमे करीत आहेत. अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने चीनच्या या युद्धसरावांवर प्रतिक्रिया दिलेली नाही. पण चीनच्या नौदल तसेच तटरक्षक दलांच्या वाढत्या हालचालींवर फिलिपाईन्सने कोरडे ओढले आहेत.

पॅग-असा आणि बाजो दे मॅसिनलॉक या फिलिपाईन्सच्या हद्दीत येणार्‍या द्वीपसमुहाच्या हद्दीतील चिनी गस्तीनौका व तटरक्षक जहाजांच्या वाढत्या हालचाली चिंताजनक आहेत. चिनी जहाजांच्या या व्यूहरचनात्मक हालचालींमुळे आपल्या देशाचे सार्वभौमत्व धोक्यात येत असल्याची टीका फिलिपाईन्सच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली. चीनने आंतरराष्ट्रीय सागरी नियमांचे पालन करावे, असे आवाहन फिलिपाईन्सने केले.

तर फिलिपाईन्सच्या संरक्षण मंत्रालयाने अधिक कठोर भूमिका स्वीकारली आहे. आपल्या सागरी क्षेत्रात घुसखोरी करणार्‍या चीनच्या मिलिशिया जहाजांवरील गस्त यापुढेही सुरू राहणार असल्याची घोषणा फिलिपाईन्सच्या संरक्षण मंत्रालयाने केली. सदर जहाजे आपल्याच सागरी हद्दीत असल्याचा दावा चीनने केला होता. तसेच फिलिपाईन्सने या क्षेत्रातील गस्त बंद करावी, असे चीनने धमकावले होते. पण चीनच्या धमक्यांसमोर झुकणार नसल्याचे फिलिपाईन्सच्या संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले आहे.

leave a reply