लडाखच्या ‘एलएसी’वरुन चिनी लष्कर माघार घेण्यास तयार झाले

- भारतीय माध्यमांचे दावे; ‘ग्लोबल टाईम्स’चा इन्कार

नवी दिल्ली – अखेर लडाखच्या ‘एलएसी’वरुन गेल्या सात महिन्यांपासून सुरू असलेला भारत-चीनमधील वाद निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन्ही देशांमध्ये या संबंधात पार पडलेल्या आठव्या फेरीतील चर्चेत सैन्यमाघारीवर एकमत झाले व ही सैन्यमाघार तीन टप्प्यात होईल, यावरही दोन्ही देशांच्या लष्करी अधिकार्‍यांची सहमती झाल्याचे भारतीय माध्यमांचे म्हणणे आहे. मात्र, चीनचे सरकारी मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाईम्स’ने भारतीय माध्यमांचे हे दावे खोडून काढले आहेत. तर भारताचे माजी लष्करी अधिकारी कुठल्याही परिस्थितीत चीनवर विश्वास ठेवता येणार नाही, असे सरकारला बजावत आहेत.

चिनी लष्कर

लडाखच्या पँगोग सरोवराच्या क्षेत्रात दक्षिणेकडील भागात शिरकाव करण्याचा प्रयत्‍न करुन चीनने भारताला आव्हान दिले होते. त्यानंतर गलवान व्हॅलीत झालेल्या संघर्षात भारताचे २० सैनिक शहीद झाले होते आणि येथे ठार झालेल्या चिनी सैनिकांची संख्या यापेक्षाही कितीतरी मोठी होती. यानंतर खवळलेल्या भारतीय लष्कराने चीनच्या तोडीस तोड तैनाती करुन चीनला धक्का दिला होता. भारतीय वायुसेनेने या क्षेत्रात दाखविलेली सक्रीयता चीनसाठी धक्कादायक बाब ठरली होती. त्यातच लडाखच्या कडक हिवाळ्यात चीनचे जवान हास्पिटल गाठू लागल्याच्या बातम्या येऊ लागल्या. अमेरिका, फ्रान्ससह जगातील सर्व प्रमुख देशांनी या संघर्षात आपण भारताच्या बाजूने असल्याचे संकेत दिले होते. यामुळे चीन लडाखच्या ‘एलएसी’वरुन माघार घेण्यास तयार झाल्याचे दावे भारतीय माध्यमे करीत आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या लडाखच्या सीमावादावरुन चर्चेच्या आठव्या फेरीत चीनने भारताला सैन्यमाघारीचा प्रस्ताव दिल्याचे माध्यमांचे म्हणणे आहे. यावर भारतानेही सहमती दर्शविल्याचे काही वृत्तसंस्थांनी म्हटले आहे. ही सैन्यमाघार तीन टप्प्यात पार पडेल. याच्या पहिल्या टप्प्यात दोन्ही देशांचे आर्मड्‍ व्हेहिकल, लांब पल्ल्याच्या तोफा मागे घेतल्या जातील. दुसर्‍या टप्प्यात दर दिवशी ३० टक्के या वेगाने सैनिक मागे घेतले जातील. तर तिसर्‍या टप्प्यात चीन आपले लष्कर ‘फिंगर ८’ क्षेत्रापर्यंत मागे घेईल व भारतीय सैन्य मेजर धनसिंग थापा पोस्टपर्यंत मागे येईल, या माघारीत दोन्ही देश एकमेकांच्या सैन्य माघारीची खातरजमा घेऊन मगच पुढील कारवाई करणार असल्याचे लष्करी अधिकार्‍यांच्या चर्चेत ठरले होते. मात्र, असे असले तरी भारताचे माजी लष्करी अधिकारी, सामरिक व राजनैतिक विश्लेषक भारताला सावधानतेचा इशारा देत आहेत.

चिनी लष्कर

लडाखच्या ‘एलएसी’वर घुसखोरी करुन सात महिने उलटल्यानंतर चीन माघार घेण्याचे औदार्य दाखवित असला तरी भारताने चीन अजिबात विश्वास ठेवता कामा नये. कारण चीन कुठल्याही क्षणी पुन्हा घुसखोरी करुन भारताच्या पाठीत खंजीर खुपसू शकतो. त्यामुळे भारताने सैन्य माघारीची घाई करू नये, असे माजी लष्करी अधिकारी व विश्लेषकांचे म्हणणे आहे. मुख्य म्हणजे लडाखचा हिवाळा चिनी लष्कराला सहन होणारा नाही, यामुळे चीनला माघारीची गरज भासू लागली आहे. पण चिनी जवानांना थंडीत कुडकूडण्यास भाग पाडून या घुसखोरीची किंमत चुकती केल्याखेरीज भारताने या देशाला कुठल्याही प्रकारच्या सवलती देऊ नयेत, असा सल्ला माजी लष्करी अधिकारी देत आहेत. भारतीय लष्कर लडाखच्या ‘एलएसी’वर याक्षणी वर्चस्व गाजवित आहे आणि चीनची अवस्था बिकट बनली आहे, हे ध्यानात घेतले तर सैन्य माघारीचा चीनला अधिक लाभ होईल, याकडेही हे माजी लष्करी अधिकारी लक्ष वेधत आहेत.

तर आधी घुसखोरी करणारा चीन आता भारताच्या मागणीनुसार, ‘फिंगर ८’पर्यंत मागे जाण्यास तयार झाला, हे भारताल मिळालेले फार मोठे यश ठरते, असे दावे काहीजणांकडून केले जात आहेत. मात्र, भारतीय माध्यमांमध्ये येत असलेल्या या बातम्या निराधार असल्याचे व भारत आणि चीनमध्ये असा कुठल्याही प्रकारचा समझौता झालेला नाही, असे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे. तसेच सैन्य माघारीच्या काही मुद्यांवर सहमती झाली असली तरी अद्याप याच्या सार्‍या तपशीलांवर अजूनही चर्चा झालेली नाही. सैन्यमाघारीची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी चार-पाच महिन्यांहून अधिक कालावधी लागू शकतो, असे भारतीय वृत्तसंस्थांनी दिलेल्या बातम्यांमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नजिकच्या काळात उभय देशांमधील तणाव कमी होण्याची चिन्हे दिसत नाही. तर सध्या केवळ तशी एक शक्यता सस्मोर येत आहे, याकडे जबाबदार पत्रकार लक्ष वेधत आहेत. मुख्य म्हणजे, चीनवर कधीही विश्वास ठेवता येणार नाही, याची जाणीव भारतीय लष्कराला असल्याने चीनच्या प्रत्येक हालचालींवर लष्कराची करडी नजर रोखलेली असेल, याची ग्वाही माजी सेनाधिकार्‍यांकडून दिली जात आहे. लडाखमधील सैन्यमाघारीची चर्चा सुरू असतानाच, लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांनी उत्तराखंडमधील चीनलगतच्या सीमेला भेट देऊन इथल्या सुरक्षेचा आढावा घेतला. याद्वारे भारत चीनला आवश्यक तो संदेश देत असल्याचे दिसत आहे.

leave a reply