लडाखच्या एलएसीजवळ चीनचा हवाई सराव

लडाख – लडाखमधील एलएसीच्या पलिकडील क्षेत्रात चीनचा हवाई सराव सुरू आहे. भारतीय लष्कर व वायुसेनेची याकडे करडी नजर रोखलेली आहे. या सरावाद्वारे चीन भारताला नवा इशारा देण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र लडाखच्या एलएसीवर भारताची वायुसेना चीनपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात भक्कम स्थितीत आहे. त्यामुळे चीनच्या या सरावाची चिंता करण्याची फारशी गरज नाही, असे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

हवाई सरावचीनच्या हवाई दलाची सुमारे 21 ते 22 ‘जे-11’ लढाऊ विमाने आणि ‘जे-16’ विमान या सरावात सहभागी झाले आहे. हा सराव भारताच्या हद्दीत नाही तर लडाखच्या एलएसीपलिकडे असलेल्या क्षेत्रात सुरू आहे. त्यामुळे भारताला त्यावर आक्षेप घेता येणार नाही. तरीही भारत चीनच्या या सार्‍या हालचालींकडे अत्यंत गांभीर्याने पाहत आहे. भारतीय वायुसेनेची लढाऊ विमाने लडाखमध्येच नाही तर चीनलगतच्या एलएसीवर वर्चस्व गाजवित असल्याचे वायुसेनाप्रमुख आरकेएस भदौरिया यांनी जाहीर केले होते. काही दिवसांपूर्वीच भारताने लडाखच्या एलएसीवरील धावपट्ट्या व हवाई तळ नव्याने कार्यान्वित केल्याच्या बातम्याही आल्या होत्या. चीनच्या आगळिकीला मुखभंग करणारे प्रत्युत्तर देण्यासाठी भारत पूर्णपणे सुसज्ज असल्याचा संदेश याद्वारे देण्यात आला होता.

लडाखच्या एलएसीवर आपल्या ताब्यातील भूभागाच्या भौगोलिक रचनेमुळे भारतीय वायुसेनेला चीनच्या हवाई दलावर सहजपणे मात करता येणे शक्य आहे, असे दावे केले जातात. विश्‍लेषक सातत्याने याची आठवण करून देत आहेत. त्याचवेळी भारतीय वायुसेनेची क्षमता चीनच्या हवाई दलापेक्षा कितीतरी अधिक असल्याचे पाश्‍चिमात्य विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. यामुळे कुठल्याही परिस्थितीत चीन भारताच्या विरोधात हवाई कारवाई करण्याची शक्यता नाही. तरीही आपले सामर्थ्य प्रदर्शित करण्यासाठी चीन हा हवाई सराव करीत असल्याचे समोर येत आहे.

दरम्यान, चीनच्या झिंजियांग व तिबेटच्या हवाई क्षेत्रात चीन करीत असलेला हा युद्धसराव भारतीय लष्कर व वायुसेना अत्यंत बारकाईने पाहत आहे. भारतीय उपग्रह या भागातील चीनच्या सात लष्करी तळांची नजर रोखून आहेत, अशी माहिती माध्यमांमध्ये आली आहे. लडाखच्या एलएसीवरील काही क्षेत्रांमधून चीनने माघार घेतली असली तरी या क्षेत्रात तैनात केलेल्या हवाई सुरक्षा यंत्रणा चीनने तशाच ठेवलेल्या आहेत. याकडे सामरिक विश्‍लषेक लक्ष सामरिक विश्‍लेषक लक्ष वेधत आहेत. चीनने भारतावर दबाव टाकण्याचे प्रयत्न अजूनही सोडलेले नाही, हे यातून समोर येत असल्याचे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात आलेली रफायल लढाऊ विमाने चीननजिकच्या हवाई तळांवर तैनात करण्यात आली आहेत. याच्या बरोबरीने सुखोई-30 व मिग-29 लढाऊ विमानांची अतिरिक्त प्रमाणात या तळांवर तैनाती करण्यात आली आहे. चीन आकस्मिक हालचालींद्वारे भारताला चकीत करू शकत नाही, असे वायुसेनाप्रमुखांनी काही महिन्यांपूर्वी स्पष्ट केले होते. वायुसेनेने केलेली ही तैनाती त्याची साक्ष देत आहे.

leave a reply