अरुणाचल प्रदेशच्या तवांगमधील एलएसीवर चिनी लष्कराच्या घुसखोरीचा कट उधळला

नवी दिल्ली – दहा दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशच्या तवांग येथील एलएसीवर चीनच्या जवानांनी घुसखोरीचा प्रयत्न करून पाहिला. मात्र भारतीय सैनिकांनी चिनी जवानांना रोखले आणि इथे त्यांच्यात झटापट झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. यावेळी चीनच्या जवानांना भारतीय सैनिकांनी काही काळासाठी ताब्यात घेतले होते, अशी माहिती काही वृत्तसंस्थांनी दिली. पण याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. या घटनेबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगून चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियांनी यांनी वेळ मारून नेली. दरम्यान, लडाखच्या एलएसीजवळ चीनने तैनात केलेला वरिष्ठ लष्करी अधिकारी इथले हवामान सहन न झाल्याने आजारी पडून दगावल्याच्या बातम्या आल्या आहेत.

अरुणाचल प्रदेशच्या तवांगमधील एलएसीवर चिनी लष्कराच्या घुसखोरीचा कट उधळलालडाखच्या एलएसीवरील वाद कमी करण्यासाठी भारत व चीनच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांची चर्चा लवकरच पार पडेल. अशा प्रकारच्या चर्चेच्या आधी चीनच्या लष्कराकडून भारताच्या हद्दीत घुसखोरी करून वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न केला जातो. दहा दिवसांपूर्वी चीनच्या लष्कराने अरुणाचल प्रदेशमधील तवांगच्या सीमेत घुसखोरीचा प्रयत्न करून पाहिला. इथे भारतीय सैन्याने उभारलेले बंकर्स नष्ट करण्याचा चिनी जवानांचा डाव असल्याचे काही वृत्तसंस्थांनी म्हटले आहे. मात्र यात त्यांना यश मिळाले नाही. भारतीय सैनिकांनी चीनच्या जवानांना रोखले व त्यांच्यात यावेळी झटापट झाली. काही वृत्तसंस्थांनी केलेल्या दाव्यानुसार भारतीय सैन्याने चीनच्या जवानांना काही काळासाठी ताब्यात ठेवले होते. पण काही काळाने त्यांची सुटका करण्यात आली, अशी माहिती या वृत्तसंस्थांनी दिली आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांना यासंदर्भात माध्यमांनी प्रश्‍न विचारले होते. पण याबाबत आपल्याला काहीच ठाऊक नसल्याचे सांगून लिजिआन यांनी वेळ मारून नेली. यामुळे चीन याबाबत लपवाछपवी करीत आहे किंवा याचा उल्लेख करून चीनला आपल्या पिछेहाटीची माहिती उघड करायची नसल्याचे स्पष्ट होत आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस चीनच्या जवानांनी उत्तराखंड येथील बाराहोटी येथील सीमेत घुसखोरी करून एका पुलाची मोडतोड करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यावेळी भारतीय सैनिकांशी आपला सामना होणार नाही, याची काळजी चीनच्या जवानांनी घेतल्याचे समोर आले होते. कारण भारतीय सैनिक इथे दाखल होण्याच्या आधीच चीनच्या जवानांनी पोबारा केला होता.

गेल्या काही महिन्यांपासून लडाखच्या सीमावादात आपले लष्कर भारतासमोर कमकुवत ठरत आहे, याची जाणीव चीनला बेचैन करीत आहे. त्यातच चीनच्या नेतृत्त्वाने लडाखच्या एलएसीची जबाबदारी सोपवून त्यासाठी विशेष नियुक्ती केलेले जनरल झँग शुदॉंग यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. लडाखचे हवामान सहन न झाल्याने त्यांची प्रकृती ढासळली व त्यातच ते दगावल्याचे बोलले जाते. इतकेच नाही तर त्यांच्या जागी चिनी लष्कराच्या वेस्टर्न कमांडची सूत्रे हाती घेणारे जनरल शू किलिंग यांनाही आरोग्यविषक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्यांच्याजागी जनरल वँग हायजियांग यांची नियुक्ती होणार असल्याच्या बातम्या येत आहेत.

हे वरिष्ठ अधिकारीच नाही, तर लडाखच्या क्षेत्रात तैनात असलेले चीनच्या लष्कराचे कनिष्ठ अधिकारी व जवान देखील मोठ्या संख्येने आजारी पडल्याचे चीनचेच लष्करी विश्‍लेषक झाओ चेनमिंग यांनी मान्य केले. चीनच्याच वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही कबुली दिली. यामुळे लडाखच्या एलएसीवर भारतीय सैनिकांशी टक्कर घेण्याची कुवतच चिनी लष्कराकडे नसल्याचे जगजाहीर झाले आहे. चिनी जवानांच्या मनोधैर्यावर याचा परिणाम झाला असून यावर मात करून एलएसीवर मोठा पराक्रम केल्याचा आभास चीनच्या लष्कराला निर्माण करायचा आहे. हा चीनच्या नेतृत्त्वाच्या प्रतिष्ठेचा मुद्दा बनलेला असूनही या आघाडीवर भारताच्या विरोधात काही करून दाखविणे चीनच्या लष्कराला जमलेले नाही. म्हणूनच चीनचे लष्कर घुसखोरीचा प्रयत्न करून आपली प्रतिष्ठा परत मिळविण्यासाठी धडपडत असल्याचे दिसते.

leave a reply