पश्‍चिम बंगालमध्ये चिनी नागरिकाच्या अटकेतून धक्कादायक खुलासे

कोलकाता – पश्‍चिम बंगलाच्या मालदामध्ये भारत-बांगलादेश सीमेनजीक गुरुवारी एका चिनी नागरिकाला संशयित हालचालीवरून ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्याकडे सापडलेल्या इलेक्ट्रिक उपकरणावरून तो चीनसाठी हेरगिरी करीत असल्याचे संकेत मिळत आहेत. तसेच त्याच्या चौकशीत गेल्या दोन वर्षात त्याने तब्बल 1300 भारतीय सीमकार्ड चीनमध्ये पाठविल्याचे कबूल केल्याचे वृत्त आहे.

पश्‍चिम बंगाल

भारत-बांगलादेश सीमेवर कालिकाचक सीमा चौकीजवळ बीएसएफने एका चिनी नागरिकला ताब्यात घेतले होते. हान जुनवे असे त्याचे नाव असल्याचे चौकशीत समोर आले होते. हान जुनवे हा मुळचा हुबेई प्रांतातील आहे. बांगलादेशमार्गे त्याने भारतात प्रवेश केल्याचे सांगितले जाते. जुनवेचे गुरुग्राममध्ये स्टार स्प्रिंग नावाचे हॉटेल असल्याचे आणि तेथेही काही चिनी नागरिक काम करीत असल्याचे समोर येत आहे. गेल्या दहा वर्षात तो चार वेळा भारतात येऊन गेल्याचे सांगितले जाते. मात्र यावेळी त्याला भारताचा व्हिसा न मिळाल्याने त्याने बांगलादेशचा व्हिसा घेऊन तेथून भारतात प्रवेश केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.

चार महिन्यापूर्वी उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने सन जियांग नावाच्या एका चिनी नागरिकाला हरियाणातूनच अटक केली होती. बनावट कागदपत्राच्या आधारे सिमकार्ड खरेदी करून त्याने काही आर्थिक फसवणूक केल्याचे उघड झाले होते. या जियांगच्या चौकशीतही पश्‍चिम बंगालमध्ये पकडलेल्या हान जुनवेचे व त्याच्या पत्नीचे नाव समोर आले होते. त्यानंतर या दोघांवरही या प्रकरणात एफआयआर दाखल झाला होता. याचमुळे त्याला यावेळेला भारतीय व्हिसा मिळाला नसल्याची माहिती मिळत आहे.

हान जुनवेच्या सखोल चौकशीत काही महत्त्वाची माहिती हाती लागण्याची शक्यता आहे. चिनी गुप्तहेर संघटनेशी त्याचा संबंध असू शकतो, तसेच आथिर्र्क गुन्ह्यांशीही हान जुनवेचा संबंध असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्याच्याजवळ जे इलेक्ट्रॉनिक सामान सापडले आहे, त्यावरून तो हेर असल्याचे संकेत मिळत आहेत. तसेच उत्तर प्रदेश पोलिसांचे पथकही जियांग प्रकरणात हान याची चौकशी करण्यासाठी मालदामध्ये पोहोचल्याचे वृत्त आहे.

जुनवेजवळ तीन भारतीय सीमकार्ड आढळली होती. त्यावरून अधिकार्‍यांनी त्याची चौकशी केली. या चौकशीत त्याने गेल्या दोन वर्षांत 1300 भारतीय सीमकार्डची तस्करी चीनमध्ये केल्याची माहिती दिल्याचे वृत्त आहे.

गेल्यावर्षीही चिनी हेरगिरीचे एक रॅकेट उघड झाले होते. भारतीय अर्थव्यवस्थेला नुकसान पोहोचविण्यासाठी शेल कंपन्या स्थापन करून मनी लॉण्डरिंग केली जात होती. तसेच पंतप्रधान कार्यालयापासून ते इतर महत्त्वाच्या खात्यामध्ये व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या हेरगिरीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे समोर आले होते. या प्रकरणात दोघा चिनी नागरिकांसह चार जणांना अटक करण्यात आली होती.

तसेच जानेवारी महिन्यात बेकायदा ऑनलाईन लोन अ‍ॅप्स प्रकरण समोर आले होते. या प्रकरणात गुंतलेल्या चिनी गँगकडून बनावट कागदपत्रांच्या आधारे दोन हजार सीमकार्ड खरेदी केल्याची माहिती उघड झाली होती. झटपट कर्ज देणार्‍या या अ‍ॅप्सच्या माध्यमातून भारतीयांना कर्जाच्या जाळ्यात अडकवले जात होते. त्याच्याकडून भरमसाठ व्याज वसूल केले जात होते. कर्जाचे हफ्ते थकविणार्‍यांना अपमानीत केले जात होते. यातून काहींनी आत्महत्या केल्या होत्या. हैद्राबाद, बंगळुरू, चेन्नईमधून अशा आत्महत्यांची प्रकरणे समोर आली होती. या प्रकरणात पुण्यातून एका चिनी महिलेला अटक झाली होती. या तपासात सुमारे 40 हून अधिक बेकायदा लोन अ‍ॅप्स कार्यरत असल्याचे लक्षात आले होेते. चिनी अ‍ॅप्सच्या माध्यमातून डिजिटल हेरगिरी केली जात असल्याचे आरोप याआधी झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर आता पश्‍चिम बंगालमध्ये संशयित चिनी हेराला अटक झाली आहे.

leave a reply