चीनच्या राष्ट्राध्यक्षांचा जपान दौरा रद्द करण्याची तयारी

टोकिओ/बीजिंग – हॉंगकॉंग सिक्युरिटी लॉ व ‘सेंकाकू’च्या हद्दीत सातत्याने होणारी घुसखोरी यावरून जपान-चीन संबंधामध्ये असणारा तणाव अधिकच चिघळण्याचे संकेत मिळत आहेत. हॉंगकॉंगवर लादण्यात आलेल्या कायद्याच्या पार्श्वभूमीवर, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा संभाव्य जपान दौरा रद्द करण्याची मागणी जपानच्या सत्ताधारी पक्षाकडूनच होऊ लागली आहे. कोरोनाची साथ व इतर कारवायांच्या पार्श्वभूमीवर चीनचे आंतरराष्ट्रीय समुदायाबरोबरील संबंध बिघडले असून जपान दौऱ्याचा वापर करून आपले स्थान मजबूत करण्याचा चिनी राष्ट्राध्यक्षांचा प्रयत्न होता. दौरा रद्द झाल्यास चिनी सत्ताधाऱ्यांचे हे इरादे धुळीला मिळू शकतात.

Japan-Chinaचीनच्या कम्युनिस्ट राजवटीने हॉंगकॉंगवर लादलेल्या नव्या सुरक्षा कायद्यानंतर जपान मध्ये चीनबाबतची अस्वस्थता अधिकच वाढू लागली आहे. हॉंगकॉंगमध्ये एक हजारांहून अधिक जपानी कंपन्या कार्यरत असून जपानी उत्पादनेही मोठ्या प्रमाणावर आयात केली जातात. जपानी कंपन्या, जपानी नागरिक व निर्यात यांचा विचार करता हॉंगकॉंगमध्ये होणारे बदल जपानसाठी महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे हॉंगकॉंग मुद्द्यावर जपानच्या संसदेतही तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांचा दौरा रद्द करण्याची मागणीही याच प्रतिक्रियेचा भाग आहे.

जपानचे पंतप्रधान शिन्झो ॲबे यांच्या ‘लिबरल डेमोक्रेटिक पार्टी’नेच दौरा रद्द करण्याचा प्रस्ताव आणण्याचे संकेत दिले आहेत. पार्टीच्या दोन समित्यांनी यासंदर्भातला मसुदाही तयार केल्याचे समोर आले आहे. हॉंगकॉंगमधील घटनांबाबत जपान स्वस्थ बसू शकत नाही व याबाबतची नाराजी स्पष्टपणे मांडायला हवी, अशा शब्दात जपानच्या सत्ताधारी पक्षातील संसद सदस्यांनी ठरावाबाबतची भूमिका स्पष्ट केली. ठराव मंजूर झाल्यानंतर तो जपानच्या पंतप्रधानांकडे पाठवण्यात येईल, असेही सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी सांगितले. जपानचे संरक्षणमंत्री तारो कानो यांनीही चिनी राष्ट्राध्यक्षांच्या संभाव्य दौऱ्यावर साशंकता व्यक्त केली आहे.

हॉंगकॉंग मुद्याबरोबरच ‘ईस्ट चायना सी’मधील चीनच्या वाढत्या आक्रमक कारवायादेखील जपान-चीन तणावात अधिक भर टाकणाऱ्या ठरल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी चीनच्या गस्तीनौकांनी जपानच्या सेंकाकू बेटांच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केल्याचे उघड झाले. या चिनी गस्तीनौकांनी जपानच्या मच्छीमारी बोटीला रोखण्याचा प्रयत्न केल्याचेही सांगण्यात येते. चीनच्या गस्तीनौका तसेच युद्धनौका जवळपास अडीच महिन्यांहून अधिक काळ सातत्याने जपानच्या सागरी हद्दीत घुसखोरीचे प्रयत्न करीत आहे. गेल्याच महिन्यात चीनच्या एका पाणबुडीनेदेखील जपानच्या हद्दीनजीक धोकादायकरित्या गस्त घातल्याची घटना उघड झाली होती.

Japan-Chinaचीनकडून सुरू असणाऱ्या या घुसखोरीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जपानने या हद्दीत मोठ्या प्रमाणावर संरक्षण तैनाती सुरू केली आहे. जपानने आपली प्रगत हेलिकॉप्टरवाहू युद्धनौका ‘कागो’ या क्षेत्रात तैनात केली आहे. त्यापाठोपाठ जपानने आपल्या संरक्षण तळांवर ‘पॅट्रिऑट मिसाईल डिफेन्स’ ही प्रगत हवाईसुरक्षा यंत्रणाही सज्ज ठेवली आहे. तरीही चीनच्या कारवाया सुरू राहिल्याने जपानच्या राजकीय वर्तुळातील अस्वस्थता प्रचंड वाढली आहे.

हॉंगकॉंग व ईस्ट चायना सीमधील हालचालींबरोबरच कोरोनाची साथ, साऊथ चायना सीचे लष्करीकरण, भारताबरोबरील सीमावाद आणि अमेरिका व चीनमध्ये तीव्र होत चाललेला संघर्ष या गोष्टीदेखील जपानच्या चिंतेत अधिक भर घालणाऱ्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी जपानला भेट देणे, जपानच्या अंतर्गत व बाह्य अडचणींमध्ये वाढ करणारे ठरू शकते, असा दावा विश्लेषकांकडून करण्यात येत आहे.

leave a reply