अमेरिकेच्या माघारीनंतर अफगाणिस्तानात गृहयुद्ध भडकेल

- आंतरराष्ट्रीय विश्‍लेषिकेची चिंता

गृहयुद्धवॉशिंग्टन – अफगाणिस्तानातून अमेरिकेची सैन्यमाघार निश्‍चित आहे. या सैन्यमाघारीचा थेट परिणाम अफगाणिस्तानातील सुरक्षेवर होईल आणि या देशात गृहयुद्धाचा भडका उडेल, अराजक माजेल. या अराजकतेचा पाकिस्तान फायदा घेईल, असा इशारा आंतरराष्ट्रीय विश्‍लेषिका ख्रिस्तिन फेअर यांनी दिला. दोन दिवसांपूर्वीच तालिबानच्या शिष्टमंडळाने पाकिस्तानचा दौरा करुन पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेतली. या पार्श्‍वभूमीवर, ख्रिस्तिन फेअर यांच्या या इशार्‍याकडे पाहिले जाते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीवर ठाम आहेत. जानेवारी महिन्याच्या पहिल्या दहा दिवसात अमेरिकेचे दोन हजार सैनिक अफगाणिस्तानातून माघारी परतणार आहेत. तालिबानबरोबरच्या शांतीकराराच्या पार्श्‍वभूमीवर, अमेरिका ही माघार घेत?आहे. पण तालिबानवर विश्‍वास ठेवून अमेरिकेने अफगाणिस्तानातून माघार घेऊ नये, अशी मागणी अफगाण सरकार तसेच लष्करी विश्‍लेषक करीत आहेत. ख्रिस्तिन फेअर यांनी देखील एका व्हर्च्युल बैठकीत बोलताना अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या सैन्यमाघारीवर चिंता व्यक्त केली.

गृहयुद्ध

दहशतवादविरोधी कारवाईसाठी अफगाणी लष्कराला हवाई सहाय्याची आवश्यकता आहे. अमेरिका अफगाणिस्तानात तैनात असताना अफगाणी लष्कराला हे सहाय्य मिळत आहे. पण अमेरिकेच्या माघारीनंतर हे हवाई सहाय्य बंद होईल व याचा परिणाम अफगाणी लष्कराच्या दहशतवादविरोधी कारवाईवर होईल, याकडे फेअर यांनी लक्ष वेधले. त्याचबरोबर अमेरिकेची सैन्यमाघार म्हणजे अफगाणिस्तान पाकिस्तानला सुपूर्द करण्यासारखे असल्याची टीका फेअर यांनी केली.

या सैन्यमाघारीसह अमेरिका अफगाणिस्तानातील लोकशाही बेकायदेशीर ठरवित आहे. येथे तकलादू लोकशाही आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप फेअर यांनी केला. ‘नेमके हेच तालिबानला हवे आहे. अफगाणिस्तानातील लोकशाही मोडीत निघाल्यानंतर या देशात अस्थैर्य निर्माण होईल आणि अस्थैर्याचा फायदा घेण्यासाठी प्रसिद्ध असलेला पाकिस्तान हीच संधी साधेल’, असा इशारा फेअर यांनी दिला. त्याचबरोबर फेअर यांनी अमेरिकेच्या पाकिस्तानविषयक धोरणांवरही ताशेरे ओढले.

गेल्या वीस वर्षात अमेरिकेने पाकिस्तानला आवर घालण्यासाठी गांभीर्याने पावले उचलली नसल्याचा ठपका फेअर यांनी ठेवला. गेल्या दोन दशकात अमेरिकेने पाकिस्तानबाबत स्वीकारलेल्या धोरणांमध्ये दोष होते. अफगाणिस्तानातील पाकिस्तानचा हस्तक्षेप आणि प्रभाव रोखण्यासाठी अमेरिकेने गांभीर्याने प्रयत्न केले नाही. तसे प्रयत्न झाले असते, तर आज अफगाणिस्तानची समस्या निर्माण झाली नसती, असा दावा फेअर यांनी केला.

leave a reply