इंडियन ऑईलकडून स्वयंपाकाच्या तेलापासून बनलेल्या बायोडिझेलच्या पुरवठ्याला सुरूवात

- केंद्रीय पेट्रोलियममंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

नवी दिल्ली – वापरलेल्या स्वयंपाकाच्या तेलापासून बनविण्यात आलेल्या बायोडिझेल या पर्यायी इंधनाच्या वापरास सरकारने मंजुरी दिली आहे. यानुसार इंडियन ऑईल लिमिटेडच्या टिकरिकला टर्मिनलमधून स्वयंपाकाच्या तेलापासून बनलेल्या बायोडिझेलचा पुरवठा सुरू झाला आहे. हे जैव-इंधन वाहनांमध्ये वापरता येईल. केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बायोडिझेलच्या पहिल्या पुरविठ्याला हिरवा कंदील दाखवला. सध्या अशाप्रकारचे जैवडिझेल बनविण्यासाठी इंडियन ऑईलने आणखी आठ संयंत्र उभारण्याचे कामही सुरू केले आहे. भारताला मोठ्या प्रमाणावर इंधनतेल आयात करावे लागते. त्यामुळे भविष्यात या बायोडिझेलचा वापर करून इंधन आयातीचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी करण्याची तयारी सरकारने केली आहे.

गेल्या काही वर्षात देशातील इंधनाच्या मागणीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. भारताला आवश्यक असलेल्या इंधनापैकी ८५ टक्के इंधनाची आयात करावी लागते. त्यामुळे जैवइंधनाच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. याअंतर्गत खाद्यतेलापासून बायोडिझेल तयार करण्यास सुरुवात झाली आहे. वापरलेल्या खाद्यतेलापासून हे बायोडिझेल तयार करण्यात येत असून हे बायोडिझेल पारंपरिक डिझेलप्रमाणेच वाहनांमध्ये वापरता येईल. तसेच शेती उपकरणांमध्येही याचा वापर करता येईल.

स्वयंपाक घरातील वापरण्यात येणारे तेल एकदा वापरल्यानंतर त्याचा पुन्हा वापर करणे आरोग्यासाठी चांगले नसते. प्रामुख्याने हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये काही पदार्थ तळल्यानंतर अशा तेलाचा वापर होत नाही. याच तेलाचा वापर करून जैवइंधन तयार करण्यात येत आहे. खाद्यतेलापासून बनविण्यात आलेले हे बायोडिझेल पुढील काळात भारताच्या इंधन गरजा भागविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे सिद्ध होईल, असा दावा केला जातो.

२०१९ साली सरकारने अशा प्रकारच्या बायोडिझेलच्या खरेदीत व उत्पादनात स्वारस्य दाखविले होते. इंडियन ऑईलने स्वयंपाकासाठी वापरात आलेल्या तेलापासून बायोडिझेल तयार करण्याकरिता संयंत्रासाठी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट जारी केले होते. यातूनच इंडियन ऑईलने टिकरीकला येथे असे बायोडिझेल तयार करण्यासाठी प्रकल्प उभारला होता. याच प्रकल्पातून बायोडिझेलचा पहिला पुरवठा सुरू झाला आहे. इंडियन ऑईल आणखी आठ संयंत्र उभारत आहे. उत्तर प्रदेश, गुजरात, मध्यप्रदेशमध्ये ही संयंत्र उभारली जाणार आहेत. यामुळे स्वदेशी बायोडिझेलचा पुरवठा वाढेल. तसेच मोठ्या प्रमाणावर रोजगाराचीही निर्मिती होईल असा दावा केला जातो. मार्च २०२१ ला संपलेल्या आर्थिक वर्षात देशात आठ हजार कोटी लिटर डिझेलचा वापर करण्यात आला होता. देशातील इंधनाची वाढती मागणी पाहता बायोडिझेलचे भारतात सुरू झालेले उत्पादन महत्त्वाचे ठरणार आहे.

leave a reply