दहशतवादी पाकिस्तानवर संपूर्ण बहिष्कार टाका

- बेल्जियमच्या संसद सदस्यांचे आवाहन

ब्रुसेल्स – आत्ता किंवा काही काळाने, अमेरिकेला तालिबानच्या अफगाणिस्तानातील राजवटीला मान्यता द्यावीच लागेल, असा दावा पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केला आहे. उघडपणे पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी तालिबानला दिलेल्या या समर्थनाचे आंतरराष्ट्रीय पडसाद उमटू लागले आहेत. बेल्जियमचे संसद सदस्य फिलिप डिविंटर यांनी पाकिस्तानच्या सहाय्याने तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला, ही बाब सार्‍या जगाच्या सुरक्षेसाठी धोकादायक बनल्याचा इशारा दिला.तालिबानइतकाच पाकिस्तानपासूनही जगाला धोका संभवतो आणि म्हणूनच या देशावर संपूर्ण बहिष्कार टाकण्यात यावा, अशी मागणी टिविंटर यांनी केली.

दहशतवादी पाकिस्तानवर संपूर्ण बहिष्कार टाका - बेल्जियमच्या संसद सदस्यांचे आवाहनयुरोपिय देश बेल्जियमचे सिनेटर असलेल्या फिलिप डिविंटर यांनी माध्यमांशी संवाद साधताना पाकिस्तानच्या दहशतवादावर कठोर शब्दात प्रहार केले. पाकिस्तान हा दहशतवादी देश ठरतो व आपण अशा देशांशी कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवता येणार नाही. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय दहशतवादाला पाठिंबा देत आला आहे. याआधीही असे घडले होते व यापुढेही असेच घडत राहिल, असे सांगून डिविंटर यांनी पाकिस्तानवर संपूर्ण बहिष्काराची मागणी केली. त्याचवेळी युरोपिय देशांना अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीपासून असलेला धोका यावेळी डिविंटर यांनी अधोरेखित केला.

‘अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या पराभवानंतर, हा देश तालिबानच्या ताब्यात गेला आहे. आता तालिबानकडे पैसा व दहशतवाद माजविण्याचा बराच अनुभव आलेला आहे. याचा वापर करून तालिबान युरोपिय देशांमध्ये कट्टरवाद वाढवतील. याचा फार मोठा धोका युरोपसमोर खडा ठाकलेला आहे. बेल्जियमच्या सरकारने याची गंभीर दखल घ्यायलाच हवी. या सार्‍याच्या मागे असलेल्या पाकिस्तानबरोबर आपल्याला कुठल्याही स्वरुपाचे संबंध न ठेवता या देशावर बहिष्कार टाकावाच लागेल. पाकिस्तानला तसा कठोर संदेश देणे अत्यावश्यक बनले आहे’, असे सिनेटर डिविंटर पुढे म्हणाले.

तालिबानइतकाच धोकादायक असलेल्या पाकिस्तानपासून जगाला लष्करी, दहशतवादी व सुरक्षाविषयक धोके संभवतात. त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. पाकिस्तानसारख्या दहशतवादी देशाला रोखण्यासाठी प्रयत्न करणार्‍यांसोबत आम्ही उभे राहू हा संदेश आपल्याकडून जायला हवा, असे आवाहनही यावेळी डिविंटर यांनी केले.

‘युरोपिय फाऊंडेशन फॉर साऊथ एशियन स्टडीज्-ईएफएसएएस’चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर जुनैद कुरेशी यांनीही तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर वाढलेल्या दहशतवादी कारवायांकडे लक्ष वेधले. आपल्याला हवी असलेली राजकीय व्यवस्था तालिबानला सार्‍या जगात लागू करायची आहे आणि त्यासाठी ही दहशतवादी संघटना प्रयत्न केल्यावाचून राहणार नाही, असा इशारा कुरेशी यांनी दिला. तालिबानला अफगाणिस्तानची सत्ता मिळाल्यानंतर, पाकिस्तानातील व जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी संघटनांचे बळ वाढले आहे, असा दावाही कुरेशी यांनी केला.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान तालिबानचे उघडपणे समर्थन करीत असले तरी आंतरराष्ट्रीय समुदाय तालिबानकडे अजूनही दहशतवादी म्हणूनच पाहत असल्याचे उघड होत आहे. युरोपिय देशांमध्ये याबाबत अधिक जागरूकता असल्याचे समोर आले असून युरोपिय महासंघामध्ये पाकिस्तानच्या विरोधात हालचाली सुरू झाल्या आहेत. अफगाणिस्तानातील दहशतवादविरोधी युद्धात आजवर केलेल्या सहाय्याची दखल घेऊन युरोपिय महासंघाने पाकिस्तानला ‘जनरलाईझ्ड स्किम ऑफ प्रेफरन्सेस-जीएसपी’ दर्जा दिला होता. यामुळे पाकिस्तानच्या युरोपिय देशांमधील उत्पादनांवर इतर देशांप्रमाणे कर आकारला जात नव्हता. याचा फार मोठा लाभ पाकिस्तानच्या निर्यातीला मिळाला. पण आता पाकिस्तानला मिळालेली ही जीएसपी सवलत युरोपिय महासंघ काढून घेण्याच्या तयारीत आहे.

याचा फार मोठा फटका पाकिस्तानला बसू शकतो. इतकेच नाही तर पुढच्या काळात पाकिस्तानवर कठोर निर्बंध लादण्यासाठी युरोपिय महासंघाच्या सदस्य देशांकडून पुढाकार घेतला जाण्याची दाट शक्यता आहे. तालिबानला दिलेल्या पाठिंब्याची इतकी मोठी किंमत पाकिस्तानला चुकती करावी लागेल, ही बाब या देशातील काही सुजाण विश्‍लेषक व पत्रकारांनी सरकारच्या लक्षात आणून दिली होती. पण पाकिस्तानचे सरकार त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे.

leave a reply