कट्टरवाद व दहशतवादाचा फैलाव रोखायचा असेल तर अफगाणिस्तानात सर्वसामावेशक सरकारची स्थापना करावीच लागेल

- भारताच्या पंतप्रधानांचे आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन

कट्टरवादनवी दिल्ली – जगातील २० प्रगत अर्थव्यवस्थांच्या ‘जी२०’ संघटनेला भारताच्या पंतप्रधानांनी अफगाणिस्तानातील घडामोडींवरून सज्जड इशारा दिला. अफगाणिस्तानातील दहशतवाद आणि कट्टरवाद या क्षेत्राबरोबरच सार्‍या जगात फैलावण्याचा धोका पत्करायचा नसेल, तर त्याविरोधात आंतरराष्ट्रीय समुदायाला एकजूट करावीच लागेल, असे पंतप्रधान मोदी यांनी बजावले. याबरोबरच उपासमार होत असलेल्या अफगाणिस्तानच्या जनतेला आवश्यक ते मानवी सहाय्य पुरविण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने त्वरित पुढाकार घ्यावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. याबरोबरच अफगाणिस्तानात महिला व अल्पसंख्यांकांना प्रतिनिधित्त्व देणार्‍या सर्वसामावेशक सरकारची स्थापना व्हावी, ही भारताची मागणी पंतप्रधान मोदी यांनी जी२०ला संबोधित करताना ठामपणे मांडली.

इटलीमध्ये जी२०ची बैठक होत असून यात अफगाणिस्तानातील घडामोडींवर स्वतंत्र चर्चा इटलीने घडवून आणली. व्हर्च्युअल माध्यमातून या परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी इटलीची प्रशंसा केली. आत्ताच्या काळात अफगाणिस्तानच्या जनतेला दारूण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे आणि अफगाणींचे मित्र असलेले भारतीय यामुळे व्यथित झाले आहेत, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. मात्र अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवाद व कट्टरवाद पसरविण्यासाठी होऊ नये अशी अपेक्षा असेल, तर त्याच्या विरोधात आंतरराष्ट्रीय समुदायाने एकजूट करायलाच हवी. आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकजुटीखेरीज अफगाणिस्तानातील कट्टरवाद, दहशतवाद व अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराच्या आव्हानाचा सामना करता येणार नाही, असा इशारा यावेळी भारताच्या पंतप्रधानांनी दिला.

अत्यावश्यक मानवी सहाय्याचा पुरवठा व सर्वसामावेशक सरकारची स्थापना या दोन्ही गोष्टी अफगाणिस्तानसाठी अत्यंत आवश्यक ठरतात, याकडे पंतप्रधान मोदी यांनी लक्ष वेधले. अफगाणिस्तानचा ताबा घेणारे तालिबानचे दहशतवादी या दोन्ही गोष्टींच्या आड येत असल्याचे उघड झाले आहे. तालिबानच्या दहशतवाद्यांपासून सुरक्षिततेची हमी नसल्याने अफगाणी जनतेपर्यंत आवश्यक ते अन्न, औषधे तसेच इतर सहाय्य पोहचविणे शक्य नाही. याआधी भारताने ही बाब लक्षात आणून दिली होती. तसेच अमेरिकेबरोबर दोहा येथे झालेल्या करारानुसार तालिबानने अफगाणिस्तानात सर्वसामावेशक सरकारची स्थापना करण्याचे आश्‍वासन दिले होते. पण आता मात्र तालिबान आपल्या सरकारमध्ये अफगाणिस्तानातील अल्पसंख्यांक व महिलांना स्थान देण्यास तयार नाही. यामुळे अफगाणी जनतेला भयंकर परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे.

अफगाणिस्तानात तालिबानची कट्टरवादी राजवट स्वीकारून अफगाणी जनतेला सहाय्य पुरविण्याचा निर्णय घ्या, असे तालिबानच्या नेत्यांसह, पाकिस्तान व चीनसारखे देश आंतरराष्ट्रीय समुदायाला सांगत आहेत. मात्र तालिबानने अफगाणिस्ताना सर्वसामावेशक सरकार स्थापन केले नाही तर तालिबानच्या राजवटीला मान्यता देण्याचा विचारही करता येणार नाही, असे भारताचे म्हणणे आहे. अफगाणिस्तानात कट्टरवाद व दहशवाद फैलावू नये, यासाठी गेल्या २० वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष वाया जाऊ द्यायचा नसेल, तर या देशात महिला आणि अल्पसंख्यांकांना प्रतिनिधित्त्व देणार्‍या सरकारची स्थापना करावीच लागेल, असे भारताच्या पंतप्रधानांनी बजावले आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने एकजुटीने पावले उचलण्याची गरज असून याखेरीज अफगाणिस्ताना अपेक्षित बदल होऊ शकणार नाहीत, याकडे पंतप्रधान मोदी यांनी लक्ष वेधले.

leave a reply