‘डेल्टा’पेक्षा अधिक वेगाने फैलावणार्‍या कोरोनाच्या ‘लॅम्डा’ व्हेरियंटमुळे चिंता

नवी दिल्ली – कोरोनाच्या ‘लॅम्डा’ नावाच्या व्हेरियंटवर जगभरातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. हा व्हेरियंट आतापर्यंत 30 देशात पसरल्याचे लक्षात आले असून डेल्टापेक्षाही अधिक वेगाने संक्रमण पसरविण्याची क्षमता या ‘लॅम्डा’मध्ये असल्याने भारतातही चिंता व्यक्त होत आहेत. मात्र सुदैवाने अद्याप भारतात या व्हेरियंटचा एकही रुग्ण आढळलेला नाही.

‘डेल्टा’पेक्षा अधिक वेगाने फैलावणार्‍या कोरोनाच्या ‘लॅम्डा’ व्हेरियंटमुळे चिंताभारतात अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या कमी झाली आहे. तसेच दरदिवशी आढळत असलेल्या नव्या रुग्णांची संख्याही 40 हजाराखाली आली आहे. पण तिसर्‍या लाटेचा धोका कायम आहे. यासंदर्भात विविध अहवाल सातत्याने प्रसिद्ध होत आहे. बुधवारी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (आयसीएमआर) प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांनी कोरोनाची तिसरी लाट हे आव्हान नाही. मात्र ही लाट येणार असताना आपण कसे वागणार आहोत, हे महत्त्वाचे आहे. सध्या विविध राज्यांनी नियम शिथील केल्यावर ठिकठिकाणी उसळलेली गर्दी पाहता भार्गव यांनी या संकटाकडे लक्ष वेधले आहे. कोरोना नियमांचे पालन केले नाही, तर कोरोना पुन्हा वेगाने फैलावण्याचा धोका असून हे थोपवायचे असेल, तर घालून दिलेल्या नियमांचे पालन करा, असे भार्गव म्हणाले.

या पार्श्‍वभूमीवर ‘लॅम्डा’ या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने चिंता वाढविल्या आहेत. याआधीच भारतात डेल्टा प्लस या कोरोनाच्या आणखी एका व्हेरियंटवरून चिंता व्यक्त होत आहे. यासाठी जिनोम सिक्वेन्सिंगही वाढविण्यात आले आहे. तर दुसर्‍या लाटेस प्रामुख्याने कारणीभूत ठरणारा डेल्टा व्हेरियंट सध्या पुन्हा युरोपिय देशात वेगाने पसरू लागला आहे. यामध्ये आता ‘लॅम्डा’च्या वेगाने संक्रमणाचे वृत्त समोर आले आहे. गेल्याच आठवड्यात ब्रिटनच्या आरोग्यमंत्रालयानेही ‘लॅम्डा’ व्हेरियंटबाबत इशारा दिला होता.

पेरुमध्ये हा व्हेरियंट खूप मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. मे आणि जून महिन्यात पेरुमध्ये आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी 82 टक्के रुग्ण ‘लॅम्डा’ने संक्रमित असल्याचे समोर आले आहे. हा जगातील कोरोनाच्या कोणत्याही व्हेरियंटपासून झालेला सर्वाधिक संक्रमण दर आहे. त्यामुळे भारत ‘लॅम्डा’चा शिरकाव होऊ नये यामुळे अधिक सावध राहण्याची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.

leave a reply