नायजेरियातील 12 वर्षांच्या संघर्षात तीन लाखांहून अधिक मुलांचा बळी – संयुक्त राष्ट्रसंघाची चिंता

न्यूयॉर्क – गेल्या 12 वर्षांमध्ये नायजेरियाच्या ईशान्येकडील भागात पेटलेल्या संघर्षात बळी गेलेल्यांमध्ये तीन लाखांहून अधिक मुलांचा समावेश आहे. याआधी केलेल्या दाव्यापेक्षा ही संख्या दसपटीने अधिक असल्याची चिंता संयुक्त राष्ट्रसंघाच्या विभागाने आपल्या नव्या अहवालात व्यक्त केली. यासाठी बोको हराम या दहशतवादी संघटनेच्या हल्ल्यांबरोबर नायजेरियातील इतरही संघर्ष कारणीभूत असल्याचे राष्ट्रसंघाने म्हटले आहे. दरम्यान, नायजेरियातील संघर्षात दररोज 170 जणांचा बळी जात आहे.

याआधी आंतरराष्ट्रीय संघटनेने नायजेरियातील संघर्षाबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला होता. 2008 सालापासून नायजेरियात अल कायदासंलग्न दहशतवादी संघटनांच्या हल्ल्यांमध्ये 35 हजार मुलांचा बळी गेल्याची माहिती दिली होती. पण संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘युएन फूड अँड डेव्हलपमेंट-युएनडीपी’ विभाग आणि नायजेरियन अर्थमंत्रालयाने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या नव्या अहवालाने हा दावा खोडून काढला. नायजेरियाच्या ईशान्येकडील बोर्नो, अदामावा आणि योबे या तीन प्रांतातील परिस्थिती अधिकाधिक वाईट बनत चालली आहे. बोको हराम व इतर दहशतवादी संघटना आणि स्थानिक टोळ्यांच्या हल्ल्यांमध्ये दररोज 170 जणांचा बळी जात असल्याचे युएनडीपीने म्हटले आहे.

गेल्या 12 वर्षात नायजेरियाच्या ईशान्येकडील भागात अल कायदा संलग्न ‘बोको हराम’, ‘आयएसडब्ल्यूएपी’ तसेच इतर संघटनांच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हल्ल्यांमध्ये साडे तीन लाख जणांचा बळी गेला. यापैकी पाच वर्षांखालील मुलांची संख्या तीन लाख, 24 हजार इतकी असल्याचे ‘युएनडीपी’ने आपल्या अहवालात म्हटले आहे. प्रत्यक्ष हल्ल्यांपेक्षा अप्रत्यक्ष हल्ल्यांमध्ये बळी गेलेल्यांची संख्या सर्वात मोठी असल्याचा दावा युएनडीपीने केला.

अप्रत्यक्ष हल्ले म्हणजे संघर्षामुळे शेती, पाणी, व्यापार, अन्न आणि आरोग्य सुविधांचे झालेल्या नुकसानाचा थेट परिणाम नायजेरियाच्या ईशान्येकडील जनजीवनावर झाला. यामध्ये पाच वर्षांच्या खालील मुलांचा बळी गेल्याची टीका युएनडीपीने केली. त्यामुळे या अप्रत्यक्ष हल्ल्यांमधील बळींसाठी देखील दहशतवादी संघटनांचे प्रत्यक्ष हल्ले तितकेच जबाबदार असल्याचे युएनडीपीचे म्हणणे आहे. नायजेरियाच्या ईशान्येकडील संघर्षात 32 लाखांहून अधिक जण विस्थापित झाले आहेत.

leave a reply