अमेरिका व चीनमधील संघर्ष टाळता येईल

- अमेरिकेच्या संरक्षण उपमंत्र्यांचा दावा

वॉशिंग्टन – चीनचे आर्थिक, लष्करी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सामर्थ्य प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यवस्था व यामध्ये असलेल्या अमेरिकेच्या हितसंबंधांना सहज आव्हान देऊ शकतो, असे अमेरिकेच्या संरक्षण उपमंत्री कॅथलीन एच. हिक्स यांनी म्हटले आहे. पण हे सारे दावे करूनही अमेरिकेचा चीनबरोबरील संघर्ष टाळता न येण्याजोगा नाही, असा दावा हिक्स यांनी केला आहे. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या चीनबाबतच्या परस्परविरोधी धोरणाचे संकेत हिक्स यांच्या या दाव्यातून मिळत आहेत.

युद्धाचे नगारे वाजत असल्याचे सांगून ऑस्ट्रेलियाचे वरिष्ठ अधिकारी पेझुलो यांनी चीनपासून असलेला धोका अधोरेखित केला होता. ऑस्ट्रेलियाला चीनबरोबर युद्धात उतरावे लागेल, हे पेझुलो यांनी नेमक्या शब्दात सांगितले होते. चीन आपल्या लष्करी क्षमतेत प्रचंड प्रमाणात वाढ करीत आहेच, त्याचवेळी वर्चस्व गाजविण्याची चीनची महत्त्वाकांक्षाही जगासमोर स्पष्टपणे येत आहे. जगातला कुठलाही जबाबदार देश त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही, असे सांगून काही ऑस्ट्रेलियन विश्‍लेषकांनी पेझुलो यांचे समर्थन केले होते.

मात्र अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने चीनचे सामर्थ्य वाढत असल्याचे व त्यापासून धोका असल्याचे मान्य करूनही चीनबाबत मवाळ धोरण स्वीकारण्याची तयारी केली आहे. बुद्धिसंपदा कायद्याची चोरी, त्याद्वारे अमेरिकेच्या तंत्रज्ञानावर डल्ला आणि अवैध व्यापारी कारवायांद्वारे चीनने अमेरिकेचे अतोनात नुकसान केले, हे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी अमेरिकन संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोरील आपल्या पहिल्याच भाषणात मान्य केले. मात्र संरक्षण उपमंत्री हिक्स चीनपासून असलेले हे सारे धोके मान्य करूनही संघर्ष टाळता येण्याजोगा नाही, असा दावा करून चीनवरील दडपण कमी करीत असल्याचे दिसते.

साऊथ चायना सी क्षेत्रातील चीनच्य कारवाया चिंताजनक प्रमाणात वाढल्या ाहेत. चीनने अवकाश व सायबर क्षेत्रातील आपले सामर्थ्य योजनाबद्धरित्या वाढविले आहे. चीन अत्यंत प्रभावी सायबरहल्ले चढवू शकतो, हे देखील कॅथलीन एच. हिक्स यांनी मान्य केले. चीनचे वाढते सामर्थ्य व कारवाया ही चिंतेत भर घालणारी बाब अली तरी चीनबरोबर सर्वच पातळ्यांवर संवाद वाढवून, राजनैतिक स्तरावर ही समस्या हाताळता येऊ शकते, असा दावा हिक्स यांनी केला आहे.

leave a reply