पाकिस्तानचे पंतप्रधान व लष्करप्रमुखांमध्ये संघर्ष पेटणार

इस्लामाबाद – भारताचे पंतप्रधानही करू शकणार नाहीत, इतके पाकिस्तानचे नुकसान पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे, असे गंभीर आरोप करून पाकिस्तानच्या विरोधी पक्षनेत्यांनी देशात निवडणुकीची मागणी केली. ‘पाकिस्तान डेमोक्रॅटिक अलायन्स’च्या (पीडीएम) छत्राखाली एकत्र आलेल्या विरोधी पक्षनेत्यांनी केलेली ही मागणी पाकिस्तानात खळबळ माजवित आहे. इम्रान खान यांच्याशी तीव्र मतभेद झालेले पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा हे विरोधी पक्षांबरोबर सहकार्य करीत असल्याचे दावे केले जातात. त्यामुळे वरकरणी सरकार व विरोधी पक्ष, असा दिसत असलेला हा संघर्ष प्रत्यक्षात पंतप्रधान इम्रान खान आणि लष्करप्रमुख जनरल बाजवा यांच्यातच पेटलेला आहे, असे काही पत्रकारांचे म्हणणे आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान व लष्करप्रमुखांमध्ये संघर्ष पेटणारमौलाना फझलूर रेहमान व पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे माजी मुख्यमंत्री शहबाज शरीफ या दोघांनी इम्रान खान पाकिस्तानी लष्कराची फार मोठी हानी करीत असल्याचा आरोप केला. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल बाजवा यांनी आयएसआयच्या प्रमुखपदावरून लेफ्टनंट जनरल फैज हमीद यांची उचलबांगड केली होती. त्यांच्या जागी लेफ्टनंट जनरल नदीम अंजूम यांची नियुक्ती करण्यात आली. लष्करप्रमुखांना डावलून फैज हमीद यांनी अफगाणिस्तानात हस्तक्षेप केला होता. त्याची शिक्षा म्हणून त्यांना आयएसआयच्या प्रमुखपदावरून हटविण्यात आल्याची चर्चा पाकिस्तानात सुरू झाली होती. मात्र पंतप्रधान इम्रान खान लेफ्टनंट जनरल फैज हमीद यांच्या मागे उभे राहिले व त्यांनी याबाबतच्या आदेशावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला.

हा पंतप्रधान इम्रान खान यांनी लष्करप्रमुख जनरल बाजवा यांच्यावर चढविलेला थेट हल्ला ठरतो, असे पाकिस्तानी विश्‍लेषकांनी म्हटले होते. यामुळे पाकिस्तानच्या लष्करामध्येच दुफळी माजली असून आता पाकिस्तानी लष्कराचा एक गट पंतप्रधान इम्रान खान यांच्या बाजूने उभा राहिला असून दुसरा गट इम्रान खान यांच्या विरोधात गेल्याचे दिसत आहे. लवकरच हा संघर्ष तीव्र होईल, अशी दाट शक्यता वर्तविली जाते. लष्करप्रमुख जनरल बाजवा यांनी इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून खेचण्याची तयारी केली आहे, अशी माहिती पाकिस्तानच्याच काही पत्रकारांनी याआधी दिली होती. पण आयएसआयप्रमुखांच्या नियुक्तीवरून वाद निर्माण झाल्यानंतर, जनरल बाजवा यांनी इम्रान खान यांना धडा शिकविण्यासाठी विरोधी पक्षांशी हातमिळवणी केल्याचे दावे केले जातात.

म्हणूनच मौलाना फझलूर रेहमान व शाहबाज शरीफ यांनी केलेली निवडणुकीची मागणी लक्षवेधी ठरत आहे. त्यातच भारताचे पंतप्रधान करू शकणार नाहीत, इतके पाकिस्तानचे नुकसान इम्रान खान यांनी केल्याचे गंभीर आरोप करून या विरोधी पक्षनेत्यांनी इम्रान खान यांच्यावर सडकून टीका केली. परराष्ट्र धोरण, आर्थिक समस्या, अंतर्गत सुरक्षा अशा सर्वच आघाड्यांवर इम्रान खान अपयशी ठरले असून आत्ताच निवडणूक घेतली नाही, तर पाकिस्तानची अवस्था भयंकर बनेल, असे हे नेते सांगत आहेत. यामुळे पाकिस्तानचे लष्कर पुन्हा एका या देशाची सत्ता हातात घेणार का, अशी चर्चाही सुरू झाली आहे. किंवा थेट आपण सत्ता हाती घेण्याच्या ऐवजी जनरल बाजवा विरोधी पक्षांना पुढे करून इम्रान खान यांची उचलबांगडी करण्याची दाट शक्यता वर्तविली जाते.

मात्र पाकिस्तानी लष्करातील फैज हमीद सारख्या असंतुष्ट अधिकार्‍यांमुळ जनरल बाजवा यांना इम्रान खान यांच्याविरोधात कारवाई करणे सोपे राहिलेले नाही, हे ही आता समोर येऊ लागले आहे. यामुळे पाकिस्तानात हा संघर्ष पेटलाच, तर ते पाकिस्तानसाठी अंतर्गत पातळीवरील आत्तापर्यंतचे सर्वात मोठे आव्हान ठरेल.

leave a reply