नेपाळमध्ये चिनी कामगार आणि स्थानिकांमध्ये संघर्ष – नेपाळी नागरिकांकडून ‘गो बॅक चायना’च्या घोषणा 

काठमांडू –  जगातील कित्येक  देशांमध्ये कोरोनाव्हारसचा फैलाव झाला असून या महामारीचे मूळ असलेल्या चीनविरोधात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. चीनविरोधातील या संतापाचा उद्रेक नेपाळमध्येही  दिसून आला. नेपाळमध्ये  जलविद्युत प्रकल्पाचे काम करत असलेल्या चिनी नागरिकांविरोधात  स्थानिक नागरिकांनी “गो बॅक ‘  च्या घोषणा दिल्या.  यावेळी चिनी नागरिक आणि नेपाळ नागरिकांमध्ये संघर्ष झाला. 

चीनी कंपनी नेपाळच्या लामजंग भागात न्यादी जलविद्युत प्रकल्प उभारत आहे. या प्रकल्पाचे काम करणाऱ्या चिनी कंपनीमधील कित्येक कर्मचारी चीनहून नुकतेच परत आले आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांनामध्ये चिंता आणि नाराजीचा सूर आहे. 

 

कोरोनाव्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी नेपाळमध्ये  लॉकडाऊन  करण्यात आले आहे.  या प्रकल्पच्या नजीकच्या गावांमधील नागरिकांनीही या भागात कोरोना पसरू नये याकरिता गावाबाहेरील नागरिकांना प्रवेश बंद केला आहे. यासाठी येथे अडथळे उभारण्यात आले आहेत. पण जलविद्युत केंद्रासाठी बांधकाम साहित्य घेऊन जाणाऱ्या दोन ट्रक्सनी  हा अडथळा दूर करून गावात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. स्थानिक प्रशासनाने याचा विरोध केला. मात्र चिनी कर्मचाऱ्यांनी तारांची जाळी तोडली.  त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. ग्रामस्थांनी निषेध करण्यास सुरूवात केली.

 

यावेळी चिनी नागरिकांनी शस्त्रे दाखवून स्थानिक नागरिकांना धमकावण्याचा प्रयत्न केला.  चीनी कंपनीचे कर्मचारी खंजीर दाखवून धमकावू लागले. त्यानंतर स्थानिक लोक अधिकच भडकले आणि दोन्ही गटात हाणामारी झाल्याचे नेपाळच्या माध्यमांनी म्हटले आहे.  

 

नेपाळमध्ये आतापर्यंत कोरोनाव्हायरसची केवळ पाच प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत.  नेपाळमधील परिस्थिती नियंत्रणात असून विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. परंतु चिनी नागरिकांकडून मनमानी  करण्यात येत असल्याने नेपाळी नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाल्याचे सांगितले जाते. 

leave a reply