अफगाणिस्तानमधील युक्रेनियन विमानाच्या अपहरणावरून गोंधळ

- रशियन वृत्तसंस्थेचे दावे युक्रेन व इराणने फेटाळले

किव्ह/काबुल – अफगाणिस्तानातील युक्रेनच्या नागरिकांच्या सुटकेसाठी आलेल्या विमानाचे अपहरण झाल्याचा दावा रशियन वृत्तसंस्था ‘तास’ने केला आहे. युक्रेनच्या मंत्र्यांच्या हवाल्याने करण्यात आलेल्या या दाव्यात सदर विमान इराणला नेण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने तसेच इराणने यासंदर्भातील वृत्त फेटाळून लावले आहे. या वृत्तामुळे काबुल विमानतळाची सुरक्षा व परदेशी नागरिकांच्या सुटकेसाठी सुरू असलेल्या मोहिमांवर सवाल उपस्थित झाले आहेत.

अफगाणिस्तानमधील युक्रेनियन विमानाच्या अपहरणावरून गोंधळ - रशियन वृत्तसंस्थेचे दावे युक्रेन व इराणने फेटाळले‘रविवारी युक्रेनच्या विमानाचे इतर लोकांनी अपहरण केले. मंगळवारी युक्रेनचे विमान चक्क आमच्याकडून पळविण्यात आले आहे. युक्रेनच्या नागरिकांना एअरलिफ्ट करण्याऐवजी अज्ञात प्रवाशांच्या गटाने ते इराणमध्ये नेले आहे. त्यानंतर युक्रेनकडून नागरिकांच्या सुटकेसाठी करण्यात आलेले तीन प्रयत्नही अपयशी ठरले आहेत. युक्रेनचे नागरिक विमानतळावर पोहोचू शकले नाहीत’, असे युक्रेनचे उपपरराष्ट्रमंत्री येव्गेनी येनिन यांनी सांगितल्याचे वृत्त ‘तास’ या रशियन वृत्तसंस्थेने दिले आहे.

विमानाचे अपहरण करणाऱ्या व्यक्तींकडे शस्त्रे होती, असेही युक्रेनच्या मंत्र्यांनी सांगितले आहे. विमानाचे पुढे काय झाले, अपहरण करणारे कोण होते यासंदर्भातील पुढील कोणतीही माहिती उपपरराष्ट्रमंत्री येव्गेनी येनिन यांनी दिलेली नाही. यावेळी त्यांनी युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रि कुलेबा यांच्यावर नाराजी व्यक्त केली. देशाची राजनैतिक व्यवस्था ‘क्रॅश टेस्ट मोड’मध्ये सुरू असल्याचे येनिन यांनी म्हटले आहे. येनिन यांच्याकडून विमानाच्या अपहरणाचे व युक्रेनच्या नागरिकांना माघारी आणण्याचे प्रयत्न अपयशी ठरल्याचे दावे होत असतानाच, परराष्ट्र विभागाकडून मात्र राजधानी किव्हमध्ये नागरिक माघारी आल्याचे सांगण्यात आले आहे.

अफगाणिस्तानमधील युक्रेनियन विमानाच्या अपहरणावरून गोंधळ - रशियन वृत्तसंस्थेचे दावे युक्रेन व इराणने फेटाळलेयुक्रेनच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते ओलेह निकोलेन्को यांनी, काबुलवरून 256 जणांना युक्रेनमध्ये आणण्यात आले असून त्यात युक्रेनच्या नागरिकांचाही समावेश असल्याची माहिती दिली. त्याचवेळी युक्रेनच्या कोणत्याही विमानाचे अपहरण झालेले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उपपरराष्ट्रमंत्री येव्गेनी येनिन यांचे वक्तव्य काबुल विमानतळावर येणाऱ्या अभूतपूर्व अडचणी सांगणारे होते, असा खुलासा परराष्ट्र विभागाकडून करण्यात आला. आतापर्यंत 100 हून अधिक युक्रेनियन्स काबुलमधून मायदेशी माघारी आले असून, सुमारे 50 जण माघारी यायचे बाकी आहेत असा दावाही परराष्ट्र प्रवक्त्यांनी केला.

इराणनेही आपल्याकडे युक्रेनचे कोणतेही विमान अशा रितीने आल्याचे फेटाळले आहे. इराणच्या सत्ताधारी राजवटीकडून चालविण्यात येणाऱ्या ‘तेहरान टाईम्स’ या दैनिकाने यासंदर्भात वृत्त दिले आहे. यासाठी दैनिकाने युक्रेनच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने दिलेल्या निवेदनाचाच आधार घेतला आहे. मात्र इराणी यंत्रणांकडून अधिकृतरित्या कोणतेही वक्तव्य करण्यात आलेले नाही. त्यामुळे यासंदर्भातील गोंधळ अधिकच वाढल्याचे मानले जाते.

गेल्या आठवड्यात तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर हजारो परदेशी नागरिक तसेच अफगाणी जनता देशातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत आहे. सुरुवातीला काही नागरिक सुरक्षित परतले असले तरी आता मात्र तालिबानने विमानतळाच्या बाहेरील भागाचा ताबा घेऊन लोकांना अडविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे विमानतळाच्या बाहेर वारंवार हिंसक चकमकी उडत असून गर्दीमुळे चेंगराचेंगरीच्या घटनाही घडल्या आहेत. यात आतापर्यंत सुमारे 20 जणांचा बळी गेल्याचे सांगण्यात येते. विमानतळाच्या धावपट्ट्यांची सुरक्षा अमेरिकी लष्कराकडे आहे.

leave a reply