भारत-पाकिस्तान सीमेवर शस्त्र तस्करी रोखण्यासाठी ट्रक स्कॅनर उभारणी

नवी दिल्ली – व्यापारी मालवाहतूकीच्या आडून शस्त्रास्त्रांची होणारी तस्करी रोखण्यासाठी भारताने पाकिस्तानबरोबरील अटारी सीमेवर ट्रक स्कॅनर उभारला आहे. हे देशातील पहिलेच ट्रक स्कॅनिंगसाठी रेडिएशन डिटेक्शन इक्विपमेंट (आरडीई) असून आणखी सात ठिकाणी अशा प्रकारचे स्कॅनर उभारले जाणार आहेत. अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात गेल्यावर भारतात विशेषत: जम्मू-काश्‍मीर व पंजाबमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी कारवाया वाढतील. पाकिस्ताकडून यासाठी बळ दिले जाईल, अशा शक्यता व्यक्त करण्यात येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर भारत-पाकिस्तानच्या सीमेवर व्यापारी वाहतूक चौकीवर उभारण्यात आलेला ट्रक स्कॅनर महत्त्वाचा ठरतो.

भारतीय लँड पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने अटारी सीमेवर संपूर्ण ट्रक स्कॅन करण्यासाठी स्कॅनर बसविला आहे. या स्कॅनरमुळे सीमेवरून होणारी शस्त्रास्त्रांची तस्करी रोखण्यास मदत मिळेल. प्रामुख्याने रेडिओॲक्टिव्ह सामुग्रीची तस्करी रोखण्यासाठी हे स्कॅनर खुपच महत्त्वाची भूमिका बजावतील. या उपकरणाला फुल बॉडी ट्रक स्कॅनर असे म्हटले जाते. शस्त्रास्त्रे, दारूगोळा व इतर बेकायदेशीर वस्तूंची तस्करी रोखण्यासाठी ट्रकचा एक्स-रे काढण्याचे हे उपकरण असल्याचे द लँड पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आदित्य मिश्रा म्हणाले.

भारताने पाकिस्तानबरोबरचा व्यापार बंद केला आहे. मात्र अफगाणिस्तानमधून दररोज सुमारे 30 ट्रक ड्रायफ्रुट अणि फळे घेऊन अटारी सीमेवरून भारतात येतात. सध्याची अफगाणिस्तानमधील परिस्थिती पाहता भारत कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायला तयार नाही. तालिबानला भारताबरोबर उत्तम संबंध हवे आहेत. भारताविरोधात अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करून देणार नसल्याचे देखील तालिबानने सांगितले आहे. तालिबाने ग्वाही दिली असली तरी अफगाणिस्तानमधून भारतात येणारे ट्रक हे पाकिस्तानमार्गे येतात हे विसरून चालणार नाही. त्यामुळेच खबरदारीचे उपाय योजण्यात येत आहेत.

भारताचा नेपाळ, बांगलादेश, म्यानमार, भूतान, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या शेजारी देशांशी रस्ते मार्गाने व्यापार चालतो. त्यामुळे आता भारत पाकिस्तानमधील अटारी सीमा, बांगलादेशमधील आगरताळा व सुतारकणी, म्यानमारच्या मोरह आणि नेपाळच्या रक्सौल व जोगबनी येथे आरडीई बसविण्यात येणार असल्याचे भारतीय लँड पोर्ट अथॉरिटीतर्फे सांगण्यात आहे.

leave a reply