तालिबानच्या तेहरिकबरोबरील सहकार्यामुळे अफगाणिस्तानसह पाकिस्तानलाही धोका

- संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालामुळे पाकिस्तानात खळबळ

तेहरिकन्यूयॉर्क/इस्लामाबाद – अफगाणिस्तानात दहशत माजविणार्‍या तालिबानने अल कायदा आणि पाकिस्तानातील ‘तेहरिक-ए-तालिबान’ तसेच इतर दहशतवादी संघटनेबरोबरील सहकार्य कायम ठेवले आहे. असे सुमारे दहा हजार परदेशी दहशतवादी अफगाणिस्तानात तळ ठोकून असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाने आपल्या अहवालातून दिला. दहशतवादी संघटनांमधील हे सहकार्य अफगाणिस्तान तसेच पाकिस्तानच्या सुरक्षेसाठी आव्हान ठरेल, असे या अहवालात बजावण्यात आले आहे. पण हा अहवाल म्हणजे धूळफेक असून अफगाणिस्तानातील तालिबान व पाकिस्तानमध्ये अविश्‍वास निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप पाकिस्तानी विश्‍लेषक करीत आहेत.

दोन दिवसांपूर्वी ‘अ‍ॅनालिटिकल सपोर्ट अँड सँक्शन्स मॉनिटरींग टिम’ या गटाने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेला आपला अहवाल सुपूर्द केला. जगभरातील वेगवेगळ्या भागात सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांवर नजर ठेवून त्याच्या अभ्यासपूर्ण नोंदी या अहवालात मांडल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय घडामोडींचे लक्ष वेधून घेणार्‍या अफगाणिस्तानातील तालिबानविषयी या अहवालात काही विशेष उल्लेख आहे.

गेल्या वर्षी कतार येथील समझौत्यामध्ये तालिबानने अल कायदा व इतर दहशतवादी संघटनांबरोबरचे संबंध मोडीत काढण्याचे मान्य केले होते. पण तालिबानने सदर समझौत्याचे उल्लंघन करून पाकिस्तानातील वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांशी सहकार्य वाढविल्याचा आरोप यात केला आहे. तालिबानने अल कायदा आणि पाकिस्तानातील तेहरिक-ए-तालिबान या दोन दहशतवादी संघटनांबरोबर केलेल्या सहकार्यावर अहवालात चिंता व्यक्त केली.

तेहरिकमधल्या काळात तालिबान आणि तेहरिक यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. पण डिसेंबर 2019 आणि ऑगस्ट 2020 या काळात तालिबान आणि तेहरिक यांच्यात सलोखा निर्माण झाला. यासाठी अल कायदाच्या नेतृत्वाने भूमिका बजावल्याचे राष्ट्रसंघाच्या अहवालाने लक्षात आणून दिले. याच काळात पाकिस्तानातील इतर दहशतवादी संघटनाही तेहरिकमध्ये सामील झाल्या. यामध्ये लश्कर-ए-झांगवी, जमात-उल-अहरार, हिज्ब-उल-अहरार, शहरयार मेहसूदचा गट आणि अमजद फारूकीचा गट यांचा समावेश आहे. या गटांबरोबरच्या सहकार्यामुळे तेहरिक तसेच तालिबानच्या सामर्थ्यात वाढ झाल्याचा इशारा राष्ट्रसंघाने दिला.

तेहरिकचे दहशतवादी मोठ्या संख्येने पाकिस्तान सीमेजवळील अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतात तळ ठोकून आहेत. अफगाणिस्तानातील गनी सरकारविरोधातील तालिबानच्या मोहिमेला पूर्ण पाठिंबा देणारी तेहरिक पाकिस्तानविरोधी संघटना असल्याचा स्पष्ट उल्लेख या अहवालात केला आहे. त्यामुळे तालिबान व तेहरिकमधील हे सहकार्य अफगाणिस्तानबरोबरच पाकिस्तानच्या सुरक्षेसाठी देखील तितकेच आव्हान देणारे असल्याचे या अहवालातून बजावले आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला तेहरिकचा प्रमुख नूर वली मेहसूद याने अमेरिकी वृत्तवाहिनीशी बोलतानाही तालिबानच्या अफगाणिस्तानातील मोहिमेला आपले समर्थन असल्याचे स्पष्ट केले होते. ‘अफगाणिस्तानवरील तालिबानचे नियंत्रण तेहरिकला पाकिस्तानातील कारवायांसाठी सहाय्यक ठरेल. येत्या काळात हे स्पष्ट होईल’, असा इशारा नूर वली याने दिला होता. तेहरिकच्या प्रमुखाने दिलेल्या या इशार्‍यानंतर पाकिस्तानातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यातच राष्ट्रसंघाच्या अहवालाने तालिबान व तेहरिकमध्ये सहकार्य असल्याचे स्पष्ट केल्यानंतर पाकिस्तानात खळबळ उडाली आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाचा हा अहवाल म्हणजे पाकिस्तान आणि तालिबान यांच्यात संघर्ष निर्माण करण्यासाठी रचलेला एक कट असल्याचा आरोप पाकिस्तानातील तालिबानसमर्थक पत्रकार व विश्‍लेषक करीत आहेत. पाकिस्तानी यंत्रणा व तालिबानमध्ये अविश्‍वास निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे पाकिस्तानी लष्करसमर्थक विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. या अहवालामुळे पाकिस्तान व तालिबान यांच्यातील संबंधात फरक पडणार नसल्याचा दावा या विश्‍लेषकांनी केला आहे.

leave a reply