पाकिस्तानात कोरोनाचा बॉम्ब फुटेल

पाकिस्तानच्या माध्यमांची चिंता

इस्लामाबाद, (वृत्तसंस्‍था) – पाकिस्तानातील कोरोनाव्हायरसच्या साथीने  एकाच दिवसात १७ जणांचा बळी घेतल्यानंतर या देशात घबराहट पसरली आहे. आतापर्यंत या साथीने पाकिस्तानात दोनशेहून अधिक जण दगावले आहेत. तर याची लागण झालेल्यांची संख्या साडेनऊ हजाराच्या पुढे गेली आहे. मात्र ही सरकारी आकडेवारी दिशाभूल करणारी असून प्रत्यक्षात पाकिस्तानातील कोरोनाव्हायरसने याहून कितीतरी अधिक प्रमाणात बळी घेतले आहेत,असा दावा या देशातील वृत्तवाहिन्या करू लागले आहेत . पाकिस्तानात जागोजागी  कोरोनाचे बॉम्ब फुटू लागले असून लवकरच कोरोनाच्या अणुबॉम्बचाही विस्फोट होईल,  अशी चिंता काही विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.                                

पाकिस्तानी जनतेने कोरोनाव्हायरसला घाबरू नये असे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले होते. पण आता मात्र इम्रान खान ही साथ पाकिस्तानात हाहाकार माजविल, अशी भीती व्यक्त करू लागले आहेत. त्यांना वाटणारी चिंता प्रत्यक्षात उतरू लागली असून  स्वतः इम्रान खान  यांनी कोरोनाव्हायरसची चाचणी करून घ्यावी, असा सल्ला त्यांच्या डॉक्टरांनी दिला आहे.  कोरोनाव्हायरसची साथ रोखण्यासाठी  वेळीच लॉकडाऊनचा निर्णय न घेणाऱ्या  इम्रान खान यांनी पाकिस्तानला भयंकर संकटात ढकलल्याची जोरदार टीका होत आहे. पुढच्या काळात त्याचे भयंकर परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील अशी भीती विश्लेषक व्यक्त करीत आहेत.                         

एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत  पाकिस्तानात कोरोनाव्हायरसचे पन्नास हजार रुग्ण सापडतील असे आपल्याला वाटत होते. पण तसे झाले नाही. मे महिन्यात पाकिस्तानात कोरोनाव्हायरसचे पन्नास हजार रुग्ण सापडतील, असा दावा पंतप्रधान इम्रान खान यांनी नुकताच केला होता. त्यावर विरोधी पक्ष नेत्यांपासून  सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकापर्यंत सारेजण तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.  जर ही साथ इतके भयंकर स्वरूप धारण करणार आहे, याची पंतप्रधान इम्रान खान यांना कल्पना होती तर मग त्यांनी लॉकडाऊनचा निर्णय का घेतला नाही ,असा सवाल या सर्वांकडून केला जातो. यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान अकार्यक्षम असल्याचा आरोप अधिकच तीव्र झाला आहे.                                    

याबरोबरच पाकिस्तानचे सरकार  कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या व या साथीने घेतलेल्या बळींच्या संख्येबाबत लपवाछपवी करीत असल्याचे आरोपही सुरू झाले आहेत. सांगितली जाते त्यापेक्षा कोरोनाच्या बळींची संख्या व रुग्णांची संख्या कितीतरी मोठी आहे, असा दावा काही पत्रकारांनी केला आहे. अजूनही पाकिस्तानात अगदी अत्यल्प प्रमाणात कोरोनाची चाचणी होते. ज्यावेळी या चाचण्यांची संख्या वाढेल त्यावेळेस सत्य बाहेर येईल  पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल, अशी विदारक शक्यता  पाकिस्तानच्या वृत्तवाहिन्यांवरून  मांडली जात आहे.  पाकिस्तानकडे कोरोनाच्या रुग्णांना उपचार देण्यासाठी पुरेशी हॉस्पिटल्स नाहीत. व्हेंटिलेटर्स  नाहीत.अशा परिस्थितीत ही साथ  पाकिस्तानात फैलावली तर  काय हाहाकार माजेल याचा विचारच केलेला बरा , अशा शब्दात  पत्रकार पाकिस्तानच्या जनतेला वास्तवाची जाणीव करून देत आहेत.  

leave a reply