आखाती देशांमध्ये कोरोना साथीचा फैलाव वाढला

वॉशिंग्टन – जगभरात कोरोनाचा साथीमुळे दगावणाऱ्यांची संख्या चार लाख ३० हजारांहून अधिक झाली असून २४ तासात सुमारे साडेतीन हजार बळींची भर पडली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्यांमध्ये जगभरात गेल्या २४ तासात जवळपास सव्वा लाख रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या ७९ लाखांवर जाऊन पोहोचली आहे. साथीचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला असला तरी सध्या आखातात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे समोर येत आहे. आखाती देश, कोरोना साथीचा फैलाव

कोरोना साथीचा उद्रेक कमी होत नसून उलट दर दिवशी नवनवीन देश ‘हॉटस्पॉट’ म्हणून समोर येत आहेत. गेल्या २४ तासांत जगभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत १,२४,२३७ जणांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या ७९,२५,३६४ झाल्याची माहिती ‘वर्ल्डओमीटर’ या वेबसाईटने दिली आहे. एकूण बळींची संख्या ४,३३,४२३ झाली असून २४ तासांत ३,४६७ जणांचे बळी गेले आहेत. त्याचवेळी साथीतून बरे झालेल्यांची संख्या ४०,७२,५८६ झाली आहे.आखाती देश, कोरोना साथीचा फैलाव

अमेरिकेतील रुग्णांची एकूण संख्या २१,५०,४८७ झाली असून २४ तासांत २३,९९९ जणांची भर पडली आहे. तर बळींची एकूण सख्या १,१७,५९१ वर गेली आहे. अमेरिकेतील बळीचा आलेख काही प्रमाणात घसरण्यास सुरुवात झाली असून गेल्या २४ तासांत अमेरिकेत ५६० नव्या बळींची नोंद झाली आहे. ब्राझिलमध्ये रुग्णांची संखया ८,५२,७८५ झाली असून २४ तासांत २१,७०४ जणांची भर पडली आहे. एकूण बळींची संख्या ४२,८३७ असून ही संख्या ९२७ ने वाढली आहे. अमेरिका व ब्राझीलपाठोपाठ आखाती देशांमध्ये साथीचा फैलाव भयावह रीतीने वाढत असल्याचे दिसत आहे.

आखाती देशांमधील इराण तसेच सौदी अरेबिया या दोन्ही प्रमुख देशांमधील रुग्णांची संख्याही सातत्याने वाढते आहे.  सौदी अरेबियात गेल्या चोवीस तासात  ४,२३३ रुग्णांची भर पडली असून साथ सुरू झाल्यापासूनची ही सर्वात मोठी वाढ ठरली आहे.  सौदी अरेबियात कोरोना साथीमुळे आतापर्यंत ९७२ जण दगावल्याचे सांगण्यात येते. इराणमध्ये गेल्या २४ तासांमध्ये १०७ बळींची भर पडली असून एकूण बळींची संख्या ८,८३७ झाली आहे. एकाच दिवसात १०० हून अधिक बळींची नोंद होण्याची इराणमधली ही पहिलीच वेळ आहे.

leave a reply