कोरोनाच्या साथीमुळे 2030 सालापर्यंत गरीबांची संख्या एक अब्जापर्यंत जाईल

- संयुक्त राष्ट्रसंघाचा इशारा

गरीबांची संख्या

न्यूयॉर्क – जगभरात फैलावलेल्या कोरोनाच्या साथीचे परिणाम दीर्घकाळपर्यंत कायम राहणार असून त्यामुळे येत्या दशकभरात गरीबांची संख्या तब्बल एक अब्जापर्यंत जाऊ शकते, अशी भीती संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात व्यक्त करण्यात आली. पुढील 10 वर्षांमध्ये अत्यंत हलाखीच्या गरीबीत जगणाऱ्यांच्या संख्येत 20 कोटी जणांची भर पडेल, अशी चिंता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख अँटोनिओ गुतेरस यांनी, कोरोना साथीमुळे झालेले नुकसान पुढील अनेक दशकांमध्येही भरून निघणार नाही, असे बजावले होते.

जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या साडेसहा कोटींवर गेली असून दररोज त्यात लाखोंची भर पडत आहे. अनेक देशांमध्ये सध्या साथीची दुसरी लाट सुरू असून तिसऱ्या लाटेबाबतही इशारे देण्यात येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ‘लॉकडाऊन’च्या अंमलबजावणीला सुरुवात झाली असून अर्थव्यवस्थेला मोठे धक्के बसण्याचे संकेत देण्यात येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघाने कोरोना साथीच्या परिणामांची शक्यता वर्तविणारे अहवाल प्रसिद्ध केले आहेत. त्यातील ‘युएनडीपी’ व अमेरिकेतील डेन्व्हर विद्यापीठाच्या ‘पार्डी सेंटर फॉर इंटरनॅशनल फ्युचर्स’ने तयार केलेल्या अहवालात गरीबांच्या संख्येत मोठी भर पडण्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

गरीबांची संख्या

‘कोरोनाच्या साथीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला गंभीर संकटाला तोंड द्यावे लागेल व त्याचा मोठा प्रभाव किमान 10 वर्षांपर्यंत कायम राहू शकतो. या काळात जागतिक स्तरावरील उत्पादनक्षमतेत मोठी घट होण्याचीही भीती आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था कोरोनाच्या पूर्वी असलेल्या स्थितीत यायला अनेक वर्षे लागू शकतात. ही बाब लक्षात घेतली तर 2030 पर्यंतच्या काळात अत्यंत हलाखीत जगणाऱ्या गरीबांच्या संख्येत 20 कोटी 70 लाख जणांची भर पडू शकते. त्यात स्त्रियांची संख्या जवळपास 10 कोटींहून अधिक असेल’, या शब्दात संयुक्त राष्ट्रसंघाने कोरोनाच्या परिणामांची जाणीव करून दिली आहे.

गरीबांची संख्या‘संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक विकासासाठी निश्‍चित केलेल्या उद्दिष्टांचा विचार करताना कोरोनाची साथ हे निर्णायक टोक ठरते. आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेतृत्त्व जे काही निर्णय घेईल त्यातून जग पूर्णपणे वेगळ्या दिशेला नेता येऊ शकते’, याकडेही अहवालाने लक्ष वेधले. ‘युएनडीपी’च्या या अहवालाबरोबरच ‘युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड ॲण्ड डेव्हलपमेंट’ने (युएनसीटीएडी) कोरोनाच्या परिणामांची माहिती देणारा स्वतंत्र अहवाल प्रसिद्ध केला आहे.

यात जगातील ‘लीस्ट डेव्हलप्ड् कंट्रीज’साठी कोरोनाची साथ अत्यंत वाईट ठरल्याचे बजावण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने ‘लीस्ट डेव्हलप्ड् कंट्रीज’च्या यादीत 47 देशांचा समावेश केला असून या देशांमधील तीन कोटींहून अधिक नागरिक दारिद्य्राच्या खाईत लोटले जातील, असा इशारा दिला आहे. कोरोनाच्या साथीमुळे या देशांमधील उत्पन्नाचा स्तर मोठ्या प्रमाणात घटणार असून त्यांना मोठ्या प्रमाणात बेकारी व वित्तीय तुटीसारख्या संकटांना तोंड द्यावे लागेल, असेही अहवालात सांगण्यात आले. या देशांमध्ये जी काही थोडीफार प्रगती सुरू होती त्याला कोरोनामुळे खीळ बसल्याचा दावाही यात करण्यात आला आहे.

कोरोनाच्या साथीमुळे गरीबांच्या संख्येत वाढ होत असतानाच अन्न, पाणी, निवारा यासारख्या मूलभूत गरजांसाठी परदेशी सहाय्यावर अवलंबून असणाऱ्यांच्या संख्येतही मोठी वाढ होणार असल्याचा अहवाल संयुक्त राष्ट्रसंघाने प्रसिद्ध केला आहे. ‘ग्लोबल ह्युमॅनिटेरिअन ओव्हरव्ह्यू 2021’ नावाच्या या अहवालात मूलभूत गरजांसाठी मानवतावादी सहाय्य आवश्‍यक असणाऱ्यांच्या संख्येत तब्बल 40 टक्क्यांची भर पडेल, असे नमूद करण्यात आले आहे.

leave a reply