कोरोना, पोलिसांची कमतरता व वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेत बंदुकांच्या विक्रीत प्रचंड वाढ

- सहा महिन्यात दोन कोटींहून अधिक बंदुकांची विक्री

पोलिसांची कमतरतावॉशिंग्टन – अमेरिकेत यावर्षी पहिल्या सहा महिन्यात दोन कोटींहून अधिक बंदुकांची विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ 15 टक्क्यांहून अधिक असल्याचे सांगण्यात येते. कोरोनाच्या साथीचा फैलाव, पोलिसांची कमतरता व वाढत्या हिंसाचारामुळे बंदुकांची विक्री वाढत असून, त्यासाठी लागणार्‍या गोळ्यांची कमतरता भासू लागल्याचे दावे विक्रेत्यांकडून करण्यात येत आहेत.

अमेरिकी तपासयंत्रणा ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’(एफबीआय) व ‘नॅशनल रायफल्स असोसिएशन’(एनआरए) यांनी दिलेल्या माहितीतून बंदुकांच्या वाढत्या विक्रीचा ‘ट्रेंड’ समोर आला आहे. 2020 साली अमेरिकेत एकूण तीन कोटी 97 लाख बंदुकांची विक्री झाल्याचे सांगण्यात आले होते. गेल्या वर्षीच्या विक्रीमागे राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक, राजकीय स्तरावरील असंतोष, कोरोनामुळे जाहीर झालेले लॉकडाऊन व अनिश्‍चितता यासारखे घटक असल्याचे सांगण्यात आले होते.

पोलिसांची कमतरताअमेरिकेत झालेला सत्ताबदल व इतर घटक बंदुकांच्या विक्रीत अधिकच भर घालणारे ठरल्याचे नव्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. नव्या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्येच दोन कोटी, 22 लाखांहून अधिक बंदुकांची विक्री झाली आहे. बंदुकांच्या विक्रीची नोंद ठेवण्यास सुरुवात केल्यापासून, पहिल्या सहामाहीत झालेली ही ‘रेकॉर्डब्रेक’ विक्री ठरली आहे. एकट्या इलिनॉयस राज्यात 60 लाखांहून अधिक बंदुकांची विक्री झाली आहे. तर अमेरिकेतील आठ राज्यांमध्ये प्रत्येकी पाच लाखांहून अधिक बंदुका विकण्यात आल्या आहेत. यात कॅलिफोर्निया, फ्लोरिडा, टेक्सास यासारख्या प्रमुख राज्यांचा समावेश आहे.

बंदुका खरेदी करणार्‍यांमध्ये पहिल्यांदा बंदुका खरेदी करणार्‍यांचे प्रमाण मोठे असून त्यातही महिला व ज्येष्ठ नागरिकांचा हिस्सा वाढला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. अमेरिकेतील अनेक प्रमुख शहरांमध्ये हिंसक घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. या घटनांमागे पोलिसांची कमतरता हे प्रमुख कारणांपैकी एक असल्याचे दिसून आले होते.

पोलिसांची कमतरताकोरोनाच्या कालावधीत अनेक पोलिसांचा साथीत मृत्यू झाला आहे. त्याचवेळी ‘डिफंड पोलीस’सारख्या मोहिमेनेही जोर पकडला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याच्या तक्रारी पोलिस दलातूनच येेऊ लागल्या आहेत. त्यामुळे पोलिसांची ही कमतरता बंदुकांच्या वाढत्या खरेदीमागील प्रमुख घटक असल्याची माहिती यंत्रणांनी दिली. पोलीस उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना प्रबळ होत असून स्वतःच्या सुरक्षेसाठी शस्त्र गरजेचे असल्याने मोठ्या प्रमाणात बंदुकांची खरेदी होत असल्याचे समोर आले आहे.

बंदुकांच्या वाढत्या खरेदीमुळे त्यासाठी लागणार्‍या गोळ्यांचीही कमतरता भासू लागली आहे. बंदुकांची विक्री करणार्‍या विक्रेत्यांनी परदेशातून गोळ्या आयात करण्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात येते. युरोपिय देश व रशियासारख्या देशांमधून गोळ्या आयात होत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे.

leave a reply