अमेरिकेत कोरोनाचा कहर

चोवीस तासात दीड हजारांहून अधिक बळी

वॉशिंग्टन/मॉस्को – गेल्या चोवीस तासात कोरोनाव्हायरसने जगभरात ४२०० हून अधिक जणांचा बळी घेतला असून यात अमेरिकेतील १५०९ बळींचा समावेश आहे. तर या साथीमुळे जगभरात दगावलेल्यांपैकी ७० टक्के जण युरोपातील आहेत. दरम्यान, रशियातील या साथीचा फैलाव धोकादायकरित्या वाढत असल्याची चिंता राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी व्यक्त केली.
जगभरात या साथीने १,२१,७९३ जण दगावले असून अमेरिकेत २३,७११ जणांचा बळी गेला आहे. या साथीमुळे अमेरिकेच्या न्यूयॉर्क प्रांतात १०,८३४ जणांनी प्राण गमावल्याची माहिती जॉन हॉप्किन्स विद्यापीठाने दिली. त्याचबरोबर आशिया-पॅसिफिक महासागर क्षेत्रात तैनात असलेल्या ‘युएसएस थियोडोर रुजवेल्ट’ विमानवाहू युद्धनौकेवरील सुमारे सहाशे नौसैनिकांना या साथीची लागण झाली आहे. याव्यतिरिक्त अमेरिकेत तैनात असलेल्या युद्धनौकेवरही कोरोनाव्हायरसचे रुग्ण आढळले आहेत.
तर गेल्या चोवीस तासात ब्रिटनमध्ये ८५० तर फ्रान्समध्ये ५७४ जणांचे बळी गेले. फ्रान्समध्ये कोरोनाव्हायरसमुळे १४,९६७ जणांचा बळी गेला असून या देशात या साथीचे १,३६,७७९ रुग्ण आहेत. या साथीने ब्रिटनमध्ये १२,१०७ जण दगावले असून ९३,८७३ जणांना या साथीची लागण झाली आहे. या दोन्ही देशांनी लॉकडाउनचा कालावधी वाढविला आहे. ब्रिटनने ७ मे तर फ्रान्सने ११ मे पर्यंत लॉकडाउन वाढविण्याची घोषणा केली.
दरम्यान, रशियामध्ये या साथीने गेल्या चोवीस तासात २२ जणांचा बळी घेतला आहे. तर गेले तीन दिवस रशियातील कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढत आहे. सोमवारी अडीच हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली असून रशियातील एकूण रुग्णांची संख्या २१ हजारांवर गेली आहे. रशियातील या स्थितीवर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. तसेच या साथीच्या रुग्णांमध्ये होणारी वाढ रशियासाठी आत्तापर्यंतचे सर्वात भीषण संकट ठरू शकते, असा इशारा राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी रशियन जनतेला दिला आहे. त्याचबरोबर या साथीचा फैलाव रोखण्यासाठी लष्कर तैनात करण्याचे संकेतही राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिले आहेत.

leave a reply