आफ्रिकेत कोरोनामुळे दगावणार्‍यांची संख्या एक लाखांवर

आदिस अबाबा – आफ्रिका खंडात कोरोनाच्या साथीमुळे दगावणार्‍यांची संख्या एक लाखावर गेली आहे. त्यातील ५० टक्के मृत्यू एकट्या दक्षिण आफ्रिकेतील असून या देशातील कोरोना विषाणूचा नवा प्रकार (स्ट्रेन) घातक ठरत असल्याचे समोर येत आहे. इतर देशांच्या तुलनेत आफ्रिकेला लसी उपलब्ध झालेल्या नसल्याने लसीकरण मोहिमेचा वेगही कमी असल्याचे उघड झाले आहे. याच पार्श्‍वभूमीवर, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी अमेरिका व युरोपिय देशांनी आपल्याकडील लसींपैकी पाच टक्के लसी आफ्रिकी देशांना पुरवाव्यात, अशी मागणी केली आहे.

नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून जगातील अनेक देशांमध्ये कोरोनावरील लसीकरणाची मोहीम सुरू झाली आहे. त्यामुळे काही देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढण्याची टक्केवारी हळुहळू घटताना दिसत आहे. मात्र आफ्रिका खंडातील बहुतांश देशांना अद्याप योग्य प्रमाणात लस उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे या देशांमध्ये लसीकरणाचा वेगही कमी आहे. अमेरिका व युरोपमधील प्रगत देशांनी लसींसाठी बड्या कंपन्यांबरोबर करार करून मोठ्या प्रमाणात साठा करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे आफ्रिकेला यावर्षी पुरेशा प्रमाणात लसी उपलब्ध होण्याची शक्यता मावळल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

या पार्श्‍वभूमीवर, आफ्रिकेतील कोरोनाच्या बळींमध्ये होणारी वाढ चिंता वाढविणारी ठरते आहे. शुक्रवारी आफ्रिकेतील ‘सीडीसी’ यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या साथीत दगावणार्‍यांची एकूण संख्या १ लाख, २९४ इतकी झाली आहे. तर, आतापर्यंत आफ्रिका खंडात कोरोनाचे ३७ लाख, ९६ हजार, ३५४ रुग्ण आढळले आहेत. आफ्रिका खंडात सध्या कोरोना साथीची दुसरी लाट सुरू असल्याची माहितीही आरोग्य यंत्रणेने दिली. या दुसर्‍या लाटेमागे दक्षिण आफ्रिकेत आढळलेला कोरोनाचा नवा प्रकार कारणीभूत ठरला असून त्याचा प्रसाराचा वेग जास्त असल्याचे सांगण्यात येते.

आफ्रिका खंडात कोरोनाच्या साथीमुळे बळी पडणार्‍यांची संख्या २.६ टक्के आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर हीच टक्केवारी २.३ टक्के असून आफ्रिकेतील वाढलेली टक्केवारी गंभीर बाब ठरली आहे. जानेवारी महिन्यात आफ्रिका खंडातील बळींची संख्या ४० टक्क्यांनी वाढली आहे. दक्षिण आफ्रिकेबरोबरच इजिप्त, नायजेरिया, झिंबाब्वे व मोझांबिक या देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण व बळींची संख्या वाढत असल्याचे उघड झाले आहे. आफ्रिकेतील अनेक देश वाढती रुग्णसंख्या व मृत्यूची वाढती टक्केवारी या वास्तवाशी मुकाबला करण्यात अपयशी ठरत आहेत, अशी चिंता ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने व्यक्त केली आहे.

आफ्रिकेतील कोरोनाच्या वाढत्या फैलावामागे लसीकरणाचा संथ वेग हेदेखील महत्त्वाचे कारण मानले जाते. आफ्रिकी महासंघाने स्थापन केलेल्या ‘टास्क फोर्स’ने आतापर्यंत ५७ कोटी लसी मिळविण्यासाठी करार व बोलणी केल्याची माहिती दिली आहे. मात्र तरीही आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, २०२२ सालच्या अखेरपर्यंत आफ्रिकेतील ६० टक्क्यांपर्यंत जनतेलाच लस मिळेल, असे सांगण्यात येते. याच पार्श्‍वभूमीवर, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी अमेरिका व युरोपिय देशांनी आपल्या साठ्यातील पाच टक्के लसी आफ्रिकी देशांना देण्याची मागणी केली आहे.

फक्त प्रगत व धनाढ्य देशातील जनतेला लसीचा लाभ मिळणे हे जागतिक असमानतेचे ठळक उदाहरण ठरते आणि हे अस्वीकारार्ह आहे, असे फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी बजावले. अमेरिका व युरोपिय देशांनी आफ्रिकेसाठी पुढाकार घेतला नाही लसींच्या मुद्यावर ‘वॉर ऑफ इन्फ्युअन्स’ भडकू शकते, असा इशाराही त्यांनी दिला. रशिया व चीन या देशांनी आफ्रिकेत आपल्या लसी पुरविण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून मॅक्रॉन यांचे वक्तव्य याकडे लक्ष वेधणारे ठरले आहे.

leave a reply