कोरोनामुळे अमेरिकेत दररोज बळी जाणार्‍यांची संख्या दोन हजारांनजिक

कोरोनामुळेवॉशिंग्टन/बीजिंग – अमेरिकेतील कोरोनाची तीव्रता पुन्हा वाढत चालली आहे. गेल्या काही दिवसात अमेरिकेत कोरोनामुळे बळी जाणार्‍यांची सरासरी आकडेवारी दोन हजारांनजिक पोहोचली आहे. मार्च महिन्यानंतर पहिल्यांदाच बळींच्या संख्येत इतक्या वाढीची नोंद झाली. कोरोनामुळे दगावणार्‍यांमध्ये सर्वाधिक संख्या लस न घेतलेल्या नागरिकांची असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, कोरोना ही अमेरिकेच्या इतिहासातील सर्वाधिक जीवघेणी साथ ठरली असून या साथीने गेल्या शतकात आलेल्या ‘स्पॅनिश फ्ल्यू’पेक्षा जास्त बळी घेतल्याचे उघड झाले आहे.

अमेरिकेतील ५० टक्क्यांहून अधिक नागरिकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. मात्र तरीही दररोज कोरोनाचे एक लाखांहून अधिक रुग्ण आढळत असून दगावणार्‍यांची संख्याही दोन हजारांनजिक जाऊन पोहोचली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेत कोरोनामुळे बळी जाणार्‍यांची सरासरी १,३८७ होती. मात्र त्यात गेले दोन आठवडे सातत्याने भर पडत असून सरासरी १,९४७ वर जाउन पोहोचली आहे. गेल्या आठवड्यातील काही दिवस दोन हजारांहून अधिक बळींची नोंद झाल्याची माहितीही आरोग्य यंत्रणांकडून देण्यात आली आहे.

सर्वाधिक रुग्ण व बळींची नोंद होणार्‍या प्रांतांमध्ये फ्लोरिडा, टेक्सास व कॅलिफोर्नियाचा समावेश आहे. जॉर्जियासारख्या प्रांतातही दर दिवशी सुमारे सव्वाशे बळींची नोंद होत असल्याचे समोर आले आहे. बहुतांश रुग्ण व बळी ‘डेल्टा व्हेरिअंट’चे असल्याचेही उघड झाले आहे. त्याचवेळी कोरोनाची लस न घेतलेले अमेरिकी नागरिक साथीची तीव्रता वाढविण्यास कारणीभूत ठरत असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. अमेरिकेत अद्याप एकही लस न मिळालेल्या नागरिकांची संख्या सात कोटींहून अधिक आहे.

अमेरिकेत आतापर्यंत कोरोना साथीचे चार कोटी, २४ लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर साथीत दगावणार्‍यांची संख्या सहा लाख, ७९ हजारांवर पोहोचली आहे. ही संख्या गेल्या शतकात आलेल्या ‘स्पॅनिश फ्ल्यू’च्या साथीतील आकडेवारीला मागे टाकणारी ठरली आहे. १९१८च्या सुमारास आलेल्या ‘स्पॅनिश फ्ल्यू’च्या साथीने सहा लाखांहून अधिक बळी घेतले होते. मात्र कोरोनामुळे बळी जाणार्‍यांची संख्या त्याहून अधिक असून, कोरोना ही अमेरिकेच्या इतिहासातील सर्वाधिक जीवघेणी साथ ठरली आहे.

चीनच्या हार्बिनमध्ये सेमी शटडाऊन

आपल्याला दुसरी महासत्ता मानणार्‍या चीनच्या ईशान्य भागातील हार्बिन शहरात कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. सुमारे एक कोटी लोकसंख्या असलेल्या या शहरात ‘सेमी शटडाऊन’ लागू करण्यात आला असून अनेक सार्वजनिक जागांवर प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. शहरातील नागरिकांना शहर न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच चीनच्या फुजिअन प्रांतातील चार शहरांमध्येही कोरोनाचे नवे रुग्ण आढळले होते.

गेल्या महिन्यात चीनमध्ये आलेल्या उद्रेकानंतर चीनने अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्याचा तसेच लसीकरणाचा वेग वाढविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतरही दर आठवड्याला चीनमधील नवनव्या शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने चीनच्या उपाययोजनांवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

leave a reply