कोरोनाच्या नव्या साथीमुळे चीनच्या अर्थव्यवस्थेत घसरणीचे संकेत

वॉशिंग्टन/बीजिंग – चीनमध्ये वेगाने पसरणारे कोरोनाच्या ‘डेल्टा व्हेरिअंट’चे रुग्ण व ते रोखण्यासाठी करण्यात येणााऱ्या उपाययोजनांमुळे चीनच्या अर्थव्यवस्थेत घसरण होण्याचे संकेत देण्यात आले आहेत. ‘डेल्टा व्हेरिअंट’चा उद्रेक रोखण्यासाठी चीनने गेल्या वर्षी वापरलेल्या ‘झीरो कोव्हिड स्ट्रॅटेजी’चा अवलंब सुरू केला आहे. त्याअंतर्गत एकापाठोपाठ एक शहरे लॉकडाऊन करण्यात येत असून विमानसेवा रद्द करणे तसेच व्यापारी वाहतूक थांबविण्यासारखे उपायही लागू करण्यात येत आहेत.

कोरोनाच्या नव्या साथीमुळे चीनच्या अर्थव्यवस्थेत घसरणीचे संकेतआंतरराष्ट्रीय वित्तसंस्था ‘गोल्डमन सॅक्स’ने येत्या तिमाहित चीनचा विकासदर 2.3 टक्क्यांपर्यंत घसरण्याचा इशारा दिला आहे. यापूर्वी हा दर 5.8 टक्के राहिल, असे सांगण्यात आले होते. जेपी मॉर्गन या वित्तसंस्थेनेही नव्या तिमहितील चीनचा विकासदर दोन टक्क्यांपर्यंत घसरण्याचे भाकित वर्तविले आहे. त्याचवेळी 2021 सालचा विकासदरही नऊ टक्क्यांच्या खाली येईल, असे बजावले आहे. पुढील काही महिन्यात स्थिती नियंत्रणात येईल, पण साथ रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे मागणी व सेवा या क्षेत्रांमध्ये फटका बसेल, असा दावाही जेपी मॉर्गनने केला.

मॉर्गन स्टॅन्लेच्या विश्‍लेषकांनीही चीनचा वार्षिक विकासदर 8.2 टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. गेल्या काही महिन्यात चीनच्या अर्थव्यवस्थेतील समस्या एकापाठोपाठ एक समोर येत असतानाच कोरोनाचा धक्का त्यांची तीव्रता वाढविणारा ठरेल, असे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वी चीनच्या कंपन्यांच्या बुडित कर्जासंदर्भातील अहवाल समोर आला आहे. पहिल्या सहा महिन्यात नऊ अब्ज डॉलर्सहून अधिक कर्जे बुडित गेल्याचे सांगण्यात आले आहे. हा नवा रेकॉर्ड असल्याचे आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांनी म्हंटल आहे.

चीनच्या राजवटीकडून खाजगी कंपन्यांविरोधात सुरू असणारी कारवाईही अर्थव्यवस्थेसाठी मारक ठरण्याचे संकेत देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे गुंतवणुकदारांमध्ये भीतीचे वातावरण असून बाजारपेठेलाही हादरा बसल्याचे विश्‍लेषकांनी बजावले आहे. चिनी कंपन्या व नागरिकांकडून कर्जाची मागणीही घटली असून त्याचा परिणाम रोजगार तसेच मागणी क्षेत्रावर होऊन आर्थिक विकासाला त्याचा फटका बसू शकतो, असा दावाही करण्यात आला आहे.

leave a reply